पदार्थ.. साहित्य.. कृती

‘‘बाबाच्या हाताची चवच न्यारी!’’आईनेही न बोलता एका नेत्रकटाक्षात दाद दिली.

संध्या ठाकूर sandhyajit@gmail.com

आज सुट्टी असूनही आई-बाबा अवंतीच्या वाटय़ाला फारसे येणार नव्हते. पाहुणे येणार असल्याने दोघेही स्वयंपाकात बिझी होते. तीही खारीचा वाटा उचलत कामाला हातभार लावत होती. तिचे निरीक्षण व प्रश्न चालू होते. चण्याची डाळ रात्री भिजत घातलेली होती. बाबाने ती मिक्सरमध्ये चरबरीत वाटली. अवंतीने किसून ठेवलेला कैरीचा किस त्यात घालून वर जिरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता, मिरचीची छानशी फोडणी दिली. ती ढवळताना त्यातले सगळे पदार्थ तिने निरखून पाहिले. आणि मग खमंग वाटली डाळ थोडी तोंडात..

‘‘झकास!! बाबाऽ एक नंबर झाली आहे.’’

‘‘बाबाच्या हाताची चवच न्यारी!’’आईनेही न बोलता एका नेत्रकटाक्षात दाद दिली. मग टोमॅटोचे सार, भात, आमरस, पुऱ्या, कोशिंबीर, केळ्याचे काप, फणसाची भाजी.. तिघांनी मिळून ठरवलेला बेत तयार झाला. अवंतीने टेबलवर त्यांची छान मांडणी सुचवली. पाहुणे आल्यावर पन्ह्यची ग्लासं भरली. पन्ह्यचा स्वाद घेता घेता जेवणाची वेळ झाली. सपाटून भूक लागल्याने लवकरच जेवणं आटोपली. सगळी मंडळी वयाने मोठी असल्याने अवंतीने आपल्या खोलीतच बसणं पसंत केलं. गप्पागोष्टी, आठवणी, आश्वासने आणि मग निरोप.. त्यानंतर आई-बाबांनी लाडक्या लेकीकडे मोर्चा वळवला. मनात म्हणाले, ‘‘कंटाळली असेल बिचारी.’’

तिच्या खोलीत ती लिहिण्यात मग्न दिसली. अवंतीने एका वहीत आजचे सर्व पदार्थ, प्रत्येकासाठी लागणारी सामग्री, कृती, लागणारा वेळ सर्व लिहून ठेवले होते, ते दाखविले. आई-बाबांनी काही दुरुस्त्या केल्या.

यापुढे सुटीच्या दिवशी बनणाऱ्या सर्व पदार्थाची अशा प्रकारे कृती लिहू या. ‘‘अगं, निनीकाका असंच काही शिकवतो त्याच्या केटरिंग कॉलेजमध्ये.’’ – इति आई.

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fun story for kids interesting story for kids inspirational story for kids zws

Next Story
‘फूड आर्ट’
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी