उमेश मोहिते

आठवीच्या वर्गात शिकणारा मन्या तसा हुशार, पण अभ्यासाचा त्याला भारी कंटाळा होता. त्याला क्रिकेटचं भारी वेड होतं. पण गेल्या दीड-दोन वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यामुळे त्याला मोबाइलचंही खूपच वेड लागलं होतं. दुपारी एक वाजता शाळेतून आला की तो जेवण करी आणि मग काही तरी निमित्त काढून तो मोबाइल घेऊन सायकलवर घराबाहेर पडे नि सरळ पम्या व बाळय़ाकडे जात असे. मग हे तिघे जण तिथल्या एका रिकाम्या प्लॉटमध्ये  मन्याच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ गेम्स पाहत राहत. अगदी संध्याकाळी अंधार पडू लागताच मन्या घरी परत येई..

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

आजही दुपारी दोनच्या दरम्यान मन्या रोजच्यासारखा पम्या नि बाळय़ाकडं गेला; पण ते दोघंही घरी नसल्याचं समजताच घरी परतला. गेले चार दिवस हे असंच सुरू होतं. अवघ्या पंधरा मिनिटांतच तो घरी परत येत असे. त्यानं सायकलला कुलूप लावलं नि तो त्याच्या रूममध्ये जाऊन तो विचार करीत राहिला. पम्या नि बाळय़ा एवढे जिवलग मित्र असूनही आपल्याला का टाळतायेत? दोघंही पहिल्यासारखं मोकळेपणानं बोलतही नाहीत. आपण काही विचारलं तर ते तेवढय़ापुरतंच बोलतात. हे कशामुळं? या विचाराने तो अधिकच निराश झाला. नेमकं आपलं काय चुकलंय, या विचारात असतानाच आई आली नि तिनं त्याच्या चेहऱ्यावर मायेनं हात ठेवत त्याला विचारलं, ‘‘बाळा, मित्रांशी भांडणिबडण केलंस की काय?’’

‘‘नाही.’’ तो चमकून म्हणाला.

‘‘गेल्या चार दिवसांपासून बघतेय, लागलीच परत येतोस तू त्यांच्याकडून. घरी नसतात का ते दोघं दुपारी?’’

‘‘कुठं क्लासला जातात म्हणे गायनाच्या.’’  मन्या रडवेला होऊन म्हणाला.

आईनं काही वेळ त्याच्याकडं एकटक बघितलं नि म्हणाली, ‘‘बाळा, तुला त्यांनी क्लासचं खोटं कारण सांगितलंय. तुला टाळतायत ते दोघंही.’’

आईचं हे बोलणं ऐकून मन्या रडवेला झाला. त्याला जे वाटत होतं, तेच आईनं बोलून दाखवलं होतं. त्यानं आवंढा गिळला निनरडवेल्या आवाजातच आईला वचारलं, ‘‘पण आई, मी काय गुन्हा केलाय त्यांचा म्हणून ते मला टाळतायत?’’

‘‘बाळा, तू स्वत:ही अभ्यास करीत नाहीस नि त्यांनाही करू देत नाहीस. सहामाही परीक्षेत किती कमी मार्क्‍स पडलेत तुम्हाला. पम्याची आई म्हणत होती, ‘तुमचा मन्याच अभ्यास करू देत नाही पम्याला. रोज दुपारी येतो नि खेळायला घेऊन जातो बाहेर म्हणून.’  मग मला सांग, हा गुन्हा नाही, तर काय आहे?’’ आईनं विचारलं.

तिच्या या प्रश्नानं मन्या खूपच गोंधळला नि अधिकच अस्वस्थ झाला. काय बोलावं तेच त्याला समजेना झालं. एवढय़ात आईनंच पुन्हा विचारलं, ‘‘तुझा मोबाइलही उचलीत नाहीत ना आता ते?’’

मन्यानं काही न बोलता फक्त होकारार्थी मान हलवली.

‘‘बाळा, आता ते दोघंही अभ्यासाला लागलेत नि तू मात्र असाच मोबाइलवर गेम्स पाहण्यात वेळ घालवलास तर अभ्यासात मागं पडशील की नाही? नि तुझ्या या वाईट सवयीमुळंच ते तुला टाळू लागलेत. आत्ता तू काय करणार आहेस सांग?’’

तिच्या या स्पष्टीकरणानं मन्या पुरता खजील झाला नि आपलं खूपच चुकत असल्याचं त्याला जाणवलं. त्याच्या मनात खूप खळबळ माजली. थोडय़ा वेळानं तो आईला म्हणाला, ‘‘सॉरी आई, माझं चुकलं गं. माझी चूक माझ्या लक्षात आली. आता मी फार काळ मोबाइलवर टाइमपासही करणार नाही.’’ पुढं मात्र त्याला अधिक बोलता आलं नाही, कारण त्याचा कंठ दाटून आला होता..

त्याची ही चूक त्याच्या लक्षात आल्याचं पाहून आईनं मायेनं त्याला जवळ घेतलं नि त्याला थोपटत ती म्हणाली, ‘‘कित्ती शहाणंय माझं बाळ.’’ uthatkar94@gmail.com