scorecardresearch

बालमैफल : जादूचे खत

दुसऱ्या दिवशी सारा आणि जेसन बागेत गेले तर जादूच्या खतामुळे तिथे खूप सारी भाजी आली होती.

funny story for kids
संध्याकाळी सारा स्वयंपाक करायची आणि जेसन बागेत काम करायचा.

मृणाल तुळपुळे

सारा आणि तिचा भाऊ जेसननी आपल्या घराच्या बाजूला खूप भाजी लावली होती. रोज सकाळी सारा बागेतली भाजी तोडून बाजारात विकायला घेऊन जायची आणि भाजी विकून आलेल्या पैशातून तांदूळ, ब्रेड, दूध असे घेऊन यायची. जेसन मात्र दिवसभर शाळेत जायचा. संध्याकाळी सारा स्वयंपाक करायची आणि जेसन बागेत काम करायचा.

एके दिवशी जेवताना जेसन साराला म्हणाला,

‘‘मला नवीन वर्षांची पुस्तके हवी आहेत.’’

सारा म्हणाली, ‘‘नक्की. मी उद्या बाजारातून येताना तुझ्यासाठी नवीन पुस्तके घेऊन येईन.’’

दुसऱ्या दिवशी सारा भाजी विकून आलेले पैसे घेऊन पुस्तकांच्या दुकानात गेली. पण पुस्तकांना तिच्याकडचे सगळे पैसे खर्च होणार होते. पुस्तके घेतली तर खाण्याचे पदार्थ घ्यायला पैसे उरत नव्हते. काय करावे ते न कळून साराला रडू आले.

हे ही वाचा : बालमैफल: रक्ताचं नातं

हे ही वाचा : बालमैफल: काऊचं घर मेणाचं!

त्याचवेळी तिकडून एक परी चालली होती. साराला रडताना बघून तिने पटकन् एका मुलीचे रूप घेतले आणि ती साराला म्हणाली, ‘‘माझे नाव रूथ. तू का रडते आहेस?’’ साराने तिला सगळे सांगितल्यावर रूथ म्हणाली, ‘‘तू आलेल्या पैशांतून खाण्याचे पदार्थ घे. मी तुझ्याबरोबर घरी येऊन जेसनची समजूत काढते.’’

घरी पोचल्यावर रूथ तिला व जेसनला म्हणाली, ‘‘माझ्याकडे जादूचे खत आहे. ते आपण तुमच्या बागेतील झाडांना घालू- म्हणजे बागेत उद्यापासून खूप भाजी येईल. मग ती विकून जेसनसाठी तू उद्या नवीन पुस्तके आण.’’ 

ते ऐकून जेसन खूश झाला. मग रूथने त्या झाडांना जादूचे खत घातले. तोपर्यंत साराने पुलाव आणि सूप बनवले व रूथला आग्रहाने जेवायला थांबवले.

दुसऱ्या दिवशी सारा आणि जेसन बागेत गेले तर जादूच्या खतामुळे तिथे खूप सारी भाजी आली होती. सारा अगदी खुशीत त्या भाज्या घेऊन बाजारात गेली. सगळी भाजी विकून तिला खूप पैसे मिळाले व त्यातून जेसनसाठी पुस्तके आणि खाण्याचे सामान असे दोन्ही घेता आले. नवीन पुस्तके बघून जेसन खूश झाला. साराला रूथचे आभार मानायचे होते, म्हणून तिने बाजारात रूथला शोधायचा खूप प्रयत्न केला; पण ती काही भेटली नाही.

सारा आणि जेसनला खूश बघून रूथला खूप आनंद झाला. तेव्हापासून मधूनमधून रात्री येऊन ती बागेत जादूचे खत घालून जायची; पण ते सारा आणि जेसनला कळू न देता!

mrinaltul@hotmail.com

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Funny story for kids in marathi story for kids in marathi kids best story zws