मृणाल तुळपुळे

बागेतल्या प्लास्टिकच्या लहान टबाला भोक पडल्यामुळे माळीदादांनी तो टब पेरूच्या झाडाखाली नेऊन ठेवला. तो लाल रंगाचा टब बघून बाजूच्या गवतातला नाकतोडा टुणकन् उडी मारून त्या टबावर येऊन बसला. त्याच्या मनात आलं, पावसाळय़ाचे दिवस आहेत तर आपण थोडे दिवस या टबातच राहावं. नाकतोडा टबात राहायला गेला ते बघून बागेतल्या इतर किडय़ांनादेखील त्या टबात राहावं, असं वाटू लागलं. त्यांनी तसं नाकतोडय़ाला विचारलही. नाकतोडय़ानं परवानगी दिल्यावर त्या सर्वानी आपला मुक्काम टबात हलवला. पाऊस पडायला लागला की नाकतोडा, सरडे, मुंगळे, किडे असे सगळे जण त्या टबात बसून खूप गप्पागोष्टी करत. त्या सर्वाची खूपच दोस्ती झाली होती.

happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
balmaifal story for kids why we celebrate gudi padwa as a new marathi year
बालमैफल: नवचैतन्याचा पाडवा
balmaifal story, kids, speak truth, taking care, things, plants, breaking is easy, making is hard, accept fault
बालमैफल: तोडणं सोपं, जोडणं अवघड

पेरूच्या झाडावरील पावसाचं पाणी मधूनमधून टबात पडत असे; पण ते टबाला पडलेल्या भोकातून वाहून जाई. एक दिवस काय झालं की, झाडावरचा एक पेरू त्या टबात पडला आणि घरंगळत जाऊन नेमका टबाच्या भोकावर जाऊन बसला. झाडावरचे थेंब टबात पडत होते; पण टबाच्या भोकावर पेरू अडकल्यानं पाणी बाहेर जाईना.

टबात पाणी साठायला लागलेलं पाहून लहान किडे, मुंगळे सगळे घाबरले आणि ते सरडा आणि नाकतोडय़ाला हाका मारू लागले. त्या दोघांनी तो पेरू ढकलायचा प्रयत्न केला, पण तो पेरू काही हलेना. त्या झाडावर एक पोपट बसला होता, तो वरून सगळा प्रकार बघत होता. त्यानं नाकतोडय़ाला विचारलं, ‘‘काय झालं? तुम्ही सगळे एवढे घाबरला का आहात?’’

नाकतोडय़ानं टबाच्या भोकावर अडकलेल्या पेरूबद्दल पोपटाला सांगितलं. ‘‘एवढंच ना, थांबा. मी खाली येतो आणि तो पेरू हलवतो,’’ असं म्हणून तो पोपट टबाच्या भोकावरचा पेरू हलवायचा प्रयत्न करू लागला, पण तो पेरू मोठा व जड असल्यामुळं त्यालादेखील तो हलवायला जमलं नाही.

त्यावर पोपटाला एक युक्ती सुचली. तो म्हणाला, ‘‘मी आता हा पेरू एका बाजूनं खायला लागतो.’’ निम्मा अधिक पेरू खाऊन झाल्यावर तो वजनाला हलका झाला व मग पोपटानं तो टबाच्या भोकावरून बाजूला सरकवला. त्याबरोबर टबात साठलेलं पाणी त्या भोकातून पटकन् बाहेर गेलं. टबातलं पाणी बाहेर पडल्यामुळे सगळय़ांनी आरडाओरडा करून आनंद व्यक्त केला व पोपटाचे आभार मानले.

नाकतोडा, सरडा, किडे, मुंगळे असे पहिल्यासारखे आनंदानं त्या टबात एकत्र राहू लागले. आता झाडावरचा पोपटही त्यांचा मित्र झाला होता.

mrinaltul@hotmail.com