फारूक एस. काझी
खळखळ असा आवाज आला आणि माझी झोप चाळवली. मी उठून पाहू लागलो. कुठं वाहतंय पाणी? कुठून येतोय आवाज? मी उठून अंधारात इकडे तिकडे पाहिलं, पण मला काहीच दिसलं नाही. थोडं आणखी रोखून पाहिलं आणि मला अंधारात चांदण्याच्या प्रकाशात चमचम करणारं पाणी दिसलं.
पाणी? आणि इथं? सकाळी तर नव्हतं. आताच कुठून आलं? मी उठून बाहेर आलो. घरापासून थोडय़ा अंतरावर तो प्रवाह वाहत होता. खळखळ आवाजाबरोबर मधूनच चुळूक चुळूक असा आवाज येत होता.
कुणीतरी नाव चालवत होतं का? नाव पुढं जाताना असाच तर आवाज होत असतो. मी कान देऊन ऐकत होतो. कुणीतरी गोड आवाजात गात होतं.
अरेच्चा! एवढय़ा अंधारात कोण असेल बरं? कोण गात असेल? आणि एवढय़ा रात्री नाव घेऊन कोण चाललं असेल? मला काहीच उमजेना. मी आणखी थोडं पुढं होणार इतक्यात मागून आवाज आला.
‘‘पुडं नगं जाऊ बाळा. तट हाय. पडशील.’’ मागून गजूमामा येत होता. मी माघारी वळलो.
‘‘मामा, एवढय़ा रात्रीचं कोण गातंय? नदीत सकाळी पाणी नव्हतं. आताच कुठनं आलं?’’ मामा चंद्राच्या प्रकाशात माझ्याकडे गोंधळून बघत होता.
‘‘पाणी? कुठंय? आणि पाणीच नाही तर नाव कुटनं येणार?’’ आता नवल करायची वेळ माझ्यावर आली होती. मामाकडे दिवाळी सुट्टीला आलो होतो. दिवसभर भटकलो होतो पण ना पाणी दिसलं होतं ना नाव. आणि आताच अचानक कुठून हे सगळं आलं?
मी घरात येऊन झोपलो. पण मन सारखं पाण्याचाच विचार करत होतं. रात्री कधी डोळा लागला कुणास ठाऊक.
सकाळी उठल्या उठल्या मी धावतच तटावर गेलो. पाहिलं तर सगळा मोकळा भाग. थोडीफार वाळू. बाकी खड्डे. आणि जिथं तिथं चिलार माजलेली.
काल रात्री मला इथंच तर पाणी दिसलेलं. इथंच तर कुणीतरी गात होतं आणि सकाळी सगळं गायब? असं कसं शक्य आहे?
आई आणि मी गावात जाऊन आलो. फिरून आलो. पण डोक्यात सारखंच पाणी आणि गाणं. मन लागेला.
‘‘काय झालंय? मामाकडे जायाचं म्हणून रडून आलास की. आन् आता असा घुम्यावानी का बसलाय?’’
‘‘काय न्हाय.’’ असं म्हणून मी आईला टाळलं.
माझे एक दूरचे आजोबा भेटले.
‘‘आजोबा, इथं नदी हुती का?’’ आजोबांनी माझ्याकडे पाहिलं.
‘‘हम्म.’’ एवढं बोलून ते निघून गेले.
‘‘आरे, तुला काय येड लागलंय. पाणी, नदी ..’’ आई वैतागून बोलली.
‘‘मला फक्त एवढंच इचारायचं होतं की, इथं कधी नदी होती का? तट आहे. थोडीशी वाळू आहे.’’
‘‘ते नदीचं थडगं हाय.’’ आमची सुरवंता आजी कुठून आली कुणास ठाऊक. आई तिच्या पाया पडली. मलापण पडायला लावलं.
‘‘आरं हुती इथं नदी. लय जुनी गोष्ट हाय.’’
आई आणि आजीनं खूप गप्पा मारल्या. मी मात्र अजूनही ‘थडगं’ शब्दावर अडकलो होतो.
‘‘लेकरा, नगं लय इचार करू. जग बदललं. आपुन बदललो. मग जुनं सगळं बदलणारच की!’’
मलाअजून नीटसं समजलं नाही.
‘‘हे बग. आमच्या काळात आमी झाडं लावली ते फळासाठी नव्हं, तर एक झाड म्हणजे धा-धा पक्ष्यांचं घरटं असतंय. येणाऱ्या जाणाऱ्याची सावली असतंय म्हणून.’’
आता थोडं थोडं कळायला लागलं.
‘‘मग नवीन काळ आला. कारखानं आलं. आन् जमनी, नद्या, रानं खलास झाली. पैसा मोठा झाला ना बाबा!’’
सुरवंता आजी उठून गेली. मनाला चटका लावून गेली.
‘‘इथं नदी होती. व्हायची चार सहा महिने. पण त्या पाण्यावर गाव खुश होतं. आता नदी न्हाय. नदीचं थडगं हाय. आजपण नदीचं पाणी खळखळ करतं. कुणीतरी नाव पाण्यात घालतं. आणि गाणीबी म्हणतं.’’
आजीचं बोलणं अजूनही मनात खळखळ करत होतं. माझ्या आत एक नदी वाहत होती.
पाणी चांदण्यात चमकत होतं. खळखळ आवाज मनाला ओढ लावत होतं.
चांदण्यात मीच नाव चालवत होतो आणि जुनं गाणं गात होतो. आत आत कुठेतरी ते गाणं घुमत होतं.
इथं एक नदी वाहायची.. आता ती मनात वाहते. आत आत. खोलवर.
farukskazi82@gmail.com
ढगोबा
ढगोबा भेटतो मला
रोज नव्या ढंगात
कापूस ठासून भरलाय
जणू त्याच्या अंगात
कधी होतो हत्ती
कधी होतो मासा
कधी होतो सिंह तर
कधी होतो ससा
वेगवेगळ्या आकारात
फिरतो आकाशात
चकाटय़ापिटत हिंडतो
मोठय़ा दिमाखात
कधी मात्र रमतगमत
फिरताना दिसतो
गडगडाट करून कधी
आभाळभर हसतो
हसतो तेव्हा आणतो
झिम्माड पाऊसगाणी
पाऊसगाण्यात दंग
मग होते धरतीराणी
धरतीराणीचा पाहून
हिरवा सुंदर थाट
ढगोबाची खुशीत सारे
थोपटतात मग पाठ
– एकनाथ आव्हाड