‘‘वाहतो ही…’’ उंदीरमामा जोर लावत म्हणाले.
‘‘… दुर्वांची जुडी?’’ नारदमुनी ‘नारायण नारायण’ असा जप करत तिथे आले आणि मिश्किलपणे त्यांनी उंदीरमामांना विचारलं. नारदमुनी शब्दांची ‘गुगली’ टाकण्यात तरबेज आहेत, अर्थातच उंदीरमामांना ठाऊक होतं.
‘‘नाही, मुनिवर! वाहतो ही ‘गणाची स्वारी’! पाहा की मागे!’’ पाठोपाठ येणार्या गणोबाच्या रथाकडे नारदमुनींनी पाहिलं. उंदीरमामा आता थांबले आणि त्यांनी कपाळावरचा घाम पुसला. गणोबा रथामध्ये लोडाला टेकून गाढ झोपले होते. ‘लंबोदर’असल्यामुळे उंदीरमामांना त्यांचा रथ ओढणं अजूनच कठीण जात होतं.
‘‘हा रथाचा उपद्व्याप तुला कुणी करायला सांगितला मूषका?’’ प्रगाढ ज्ञान असलेले नारदमुनी उंदीरमामांचा उल्लेख नेहमीच ‘मूषक’ म्हणून करत.
‘‘माझ्या एवढुशा पाठीवर ते व्यवस्थित झोपू शकत नाहीत म्हणून रथ! आणि आता तर गणेशोत्सव उद्यावरच आलाय! आपल्या स्वर्गनगरीमध्ये पुढचे दहा-बारा दिवस गणेशोत्सवाची नुसती चंगळ असणार आहे!’’
‘‘हो, तर!’’
‘‘मुनिवर! मी मूळचा क्रौंच, एक शापित देवता! गणोबाने त्यांचा आशीर्वाद देऊन माझ्या चुकांना पोटात घातलं आणि मला त्यांचं वाहन बनवलं. त्यामुळे त्यांचे खरं तर आभारच आहेत. पण एक अडचण आहे हो!’’
‘‘कसली?’’
‘‘त्यांची ‘लंबोदर’ असण्याची! यंदा भूतलावरचा गणेशोत्सव साजरा करून गणपतीबाप्पा स्वर्गनगरीत परत येतील तेव्हा तुम्ही त्यांना ‘डाएट’ करायला सांगाल का प्लीज?’’
‘‘आता हे काय नवीन?’’
‘‘एकदा का ते गणेशोत्सवासाठी भूतलावर गेले की काही कंट्रोलच राहत नाही त्यांचा! उकडीचे, तळणीचे, खव्याचे असे नाना प्रकारचे मोदक खाऊन ते ‘डबल-लंबोदर’ होऊन परत येतात. बरं, त्यानंतर ‘डाएट’ करावं तर संकष्टी, अंगारकी आहेतच वर्षभर! हे ‘लंबोदर’ कधी होणार ‘फ्लॅटोदर’? त्यांना ‘ड्राइव्ह’ करून नेताना हाल होतात माझे!’’
‘‘हे मस्त आहे -फ्लॅटोदर- सपाट पोटवाला गणोबा! जरा विचित्र आहे, कारण त्यांच्या अशा रूपाची कल्पनाच करू शकत नाही. मूषका, असं वाटतं का कधी, त्यापेक्षा ‘सिंह’ किंवा ‘मोर’ ही गणपतीची वाहनंच बरी होती?’’
‘‘त्यांना पाठीवर वागवून पाठ गेलीच होती, पण हा रथ ओढताना माझे तीक्ष्ण दातही झिजणार आहेत. सत्ययुगात राक्षसांचा पराभव करण्यासाठी ‘वक्रतुंड’ या अवतारात गणपती सिंहारूढ झाले. त्रेतायुगात ‘मयूरेश्वर’ या अवतारात ते मोरावर स्वार होते. तरी या लाडक्या गणोबाचं मूषक हेच वाहन म्हणून मस्त वाटतं.’’
‘‘स्वत:चं भारीच कौतुक करतो आहेस मूषका!’’ नारदमुनी हसले,
‘‘बरं, मला सांग! उठवू का त्यांना, बर्याच दिवसांत भेट नाही झाली त्यांची!’’ गणोबाला उठवण्याच्या हेतूने नारदमुनींनी त्यांच्या वीणेवर सूर छेडले, तर गणाबा झोपेतच हसत शांतपणे दुसर्या कुशीवर वळले.
‘‘गाढ झोपलेत ते…’’ मुनिवर हे म्हणतात-न-म्हणतात तोवर…
‘‘आला, आला बाप्पा माझा,
ढोल, ताशे वाजवा झांजा,
करू धम्माल, मस्ती, मजा,
आला, लाडका गणराजा…’’ या गाण्यामुळे गणपतीबाप्पा खडबडून जागे झाले!
‘‘पोहोचलो की काय मी भूतलावर?’’ गणपतीबाप्पा घाबरून इथे-तिथे पाहू लागले.
‘‘नाही देवा, स्वर्गनगरीतच आहात अजून!’’ नारदमुनींनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
‘‘मग हा मोठाला आवाज?’’
‘‘भूतलावरूनच येतोय! आणि संपूर्ण स्वर्गनगरीला हादरून सोडलंय!’’ नारदमुनी आणि मूषकही घाबरले होते.
‘‘छ्या! आता दहा-बारा दिवस भूतलावर जायचंय आणि हेच सहन करायचंय! चोवीस तास नुसती ‘ढॅणढॅण’… डोकं आणि कान कीटून जातात हो! एरवी मी कितीतरी राक्षसांचा वध केलाय, पण या कर्णकर्कश्श आवाजरूपी राक्षसांवर अजून तरी मला तोडगा नाही सापडलाय! माझे पाश आणि अंकुश अगदी हतबल झालेत यांच्यापुढे!’’
‘‘देवा, तुम्ही खूपच ‘अपसेट’ झालाय!’’
‘‘मुनिवर, वर्षानुवर्षं हेच सहन करत आलोय मी! वाटलं होतं, भूतलावर जाण्यापूर्वी दहा-बारा दिवसांची मस्त झोप आधीच काढून घेईन. पण बघा, हा ‘कर्णकटू राक्षस’ स्वर्गनगरीपर्यंत पोहोचलाय!’’
‘‘देवा, तुमच्यासाठी एवढे मंडप वगैरे बांधतात, सजवतात ही माणसं… पण तिथे तुम्ही असता एकटेच. लाऊडस्पीकरवर एक ‘प्ले-लिस्ट’ लावून ठवलेली असते ती बडवतात. त्यात ना प्रेम असतं, ना आत्मीयता. मला वाईट वाटतं ते पाहून!’’ मूषकाने मुद्दा मांडला.
‘‘ते त्यांच्यासाठी असतं, माझ्यासाठी नव्हे! मी नसतोच मुळी तिथे!’’
अलीकडेच तुमच्या एका विशालकाय मूर्तीला ट्रेलरवरून नेताना अपघात झाल्याचं समजलं…’’ नारदमुनींना सगळीच माहिती होती.
‘‘गणपतीबाप्पाची ही अद्ययावत वाहनं! आणि त्यावर ‘ढिनचॅक लायटिंग’!’’ मूषक हसला.
‘‘तो सगळा वेगळाच विषय आहे! पर्यावरणासाठी कुठली मूर्ती चांगली- अजस्र, मोठी, मध्यम की लहान… शाडूची, प्लास्टर-ऑफ-पॅरिसची की अजून कशाची… माझ्या लहान-मोठ्या रूपांच्या विसर्जनानंतर होणारे समुद्राचे हाल, समुद्राकाठी वाहत आलेले माझे भग्न अवशेष- स्वर्गनगरीत परतण्यापूर्वी या विषयांवर अरब सागराची आणि माझी दरवर्षी होणारी चर्चा! पण उत्तर? ‘इल्ला’! पाहा, माझी अजून प्राणप्रतिष्ठा व्हायची आहे, पण आत्तापासूनच खवळलाय तो बिचारा!’’
‘‘घाबरलाय खरं तर! पण मग तोडगा?’’ मूषकाचा प्रश्न.
‘‘या माणसांनीच शोधला तर! विचारी होऊन, स्वत:च्या पलीकडे दुसर्याचा विचार केला तर तोडगा त्यांच्याच हाती आहे!’’ गणपतीबाप्पा म्हणाले.
‘‘लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांविरुद्ध जाती-धर्मापलीकडे देशवासीयांनी एकत्र यावं म्हणून घराघरांत साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्रामध्ये ‘सार्वजनिक’ केला. पण या सणाचं रूप आता एका भयावह राक्षसासारखं झालंय…’’ मूषक खेदाने म्हणाला.
‘‘तुला रे काय माहीत?’’ नारदमुनींनी आश्चर्यानं विचारलं.
‘‘देवांप्रमाणे माझेही अवतार आहेत भूतलावर!’’
‘‘अरे, हो! मी पण काय विचारतोय!’’
‘‘असो! पर्यावरण प्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि एकंदरीत हा सगळा गणेशोत्सवाचा गोंगाट पाहून वाटतं जाऊच नये त्या भूतलावर! करा नुसतीच मूर्तींची पूजा! मी नाहीच्चे तिथे!’’ गणपती रुसले आणि पुन्हा रथातच लोडाला टेकून झोपायचा प्रयत्न करू लागले. पण एवढ्यात…
‘‘प्लनम्य शिलसा देवं, गौलीपुतलं विनायकम्…’’ हे शब्द स्वर्गनगरीत घुमले, त्या कर्णकर्कश्श गोंगाटाला छेदून… गणपती उठून बसले. त्यांनी भूतलावर डोकावून पाहिलं. नुकतंच घरी आगमन झालेल्या गणपतीच्या मूर्तीला पाहून आनंदून गेलेला एक लहानगा त्याच्या बोबड्या शब्दांत ‘गणेशस्तोत्र’ म्हणत होता.
‘‘मुनिवर, तुम्ही सांगितलेला नारद पुराणातील श्लोक!’’ गणपती प्रसन्न दिसत होते.
‘‘हेच तर भिडतं देवाला! कोण सांगणार या मूर्ख मानवाला!’’ नारदमुनी म्हणाले.
‘‘यांच्यासाठी मला जायलाच हवंय भूतलावर! दरवर्षी… अगदी नित्याने! रेडी आहेस का मूषका?’’
‘‘तुमचं हे वाहन नेहमीच सज्ज असतं देवा! माझे अपराध पोटात घातलेत तसेच या माणसांचे असंख्य अपराध पोटात घालायला चला भूतलावर!’’
‘‘आता समजलंनं मूषका, मी का आहे ‘लंबोदर’? पुन्हा माझ्या ‘डाएट’विषयी बोलण्यापूर्वी विचार कर आगोदर! काय?’’
‘‘नारायण, नारायण!’’ नारदमुनींनी वीणा छेडली.
आणि स्वर्गनगरीतून आरूढ होऊन मूषकावरी, निघाली भूतलावरी, गणाची स्वारी……
umokashiprachi@gmail.com
बालमैफल : निघाली गणाची स्वारी…
गणोबा रथामध्ये लोडाला टेकून गाढ झोपले होते. ‘लंबोदर’असल्यामुळे उंदीरमामांना त्यांचा रथ ओढणं अजूनच कठीण जात होतं.
Written by प्राची मोकाशी
Updated:

First published on: 13-09-2026 at 01:02 IST | © The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganapati bappa mushak narad muni story loksatta balmaifal ganeshotsav 2026 css