ये इच्छित पुरवाया

बाबा आणि दादा लाइटच्या माळा सोडण्यात गुंतले होते. आजी वाती वळत होती. आई स्वयंपाकघरात उद्याच्या मोदकांची तयारी करीत होती, पण मनात विचार मात्र पूजेच्या तयारीचेच.

बाबा आणि दादा लाइटच्या माळा सोडण्यात गुंतले होते. आजी वाती वळत होती. आई स्वयंपाकघरात उद्याच्या मोदकांची तयारी करीत होती, पण मनात विचार मात्र पूजेच्या तयारीचेच. मनातल्या मनात उजळणी चालूच होती- लाल फुलं, सुपाऱ्या, नारळ, समई.. इतक्यात ती अथर्वला हाक मारत म्हणाली, ‘अथर्व, अरे दूर्वा राहिल्याच. जा जा दूर्वा घेऊन ये झटकन.’
 ‘आत्ता दूर्वा कुठून आणू ग आई.’
‘अरे त्या मालपेकरांचं आवार आहे ना तिथून खाली जा सरळ. दूर्वाच दूर्वा आहेत तिथे.’ आजीने लगेच मार्गही दाखवला. म्हणजे आता गेलंच पाहिजे हे ओळखून अथर्व निघाला. हिरव्या रानात चांदण्यांच्या कळ्या नि हरणाची फुलं डोलत होती. कुठं एखादा लाल मानेचा पक्षी एक नाजूकशी शीळ घालत जात होता. मधल्या मळ्यात पोसवलेली भातं डुलत होती. त्याच भाताच्या कोपऱ्यांच्या बांधावरून म्हणजेच मेरेवरून अथर्व दूर्वा आणायला निघाला.
लहानपणापासूनच अथर्व दूर्वा काढून त्याच्या जुडय़ा बांधण्यात तरबेज होता. हे काम त्याला आवडत होतं म्हणून तो टापटिपीने करीत होता, की टापटिपीने करता येत होतं म्हणून तो आवडीने करी, हे तो बाप्पाच जाणे या विचाराने अथर्वने आकाशाकडे पाहिलं. पण इतक्यात मनात विचार आला की उद्या बाप्पाच घरी येणारेय तर त्यालाच विचारू. ‘गणपती बाप्पा मोरया’ अथर्वने एकटय़ानेच पुकारा केला नि झपाझप दूर्वा काढण्याच्या कामाला लागला.
एक जुडी काढून झाली अन् तितक्यातच बाजूला काहीतरी आवाज झाला. पाहतो तो काय एक गलेलठ्ठ उंदीर तुरुतुरु चालत शेजारी असणाऱ्या गुहेसारख्या भागात गेला. अथर्वने परत आपल्या कामाला सुरुवात केली, तर पुन्हा तोच उंदीर त्या गुहेतून बाहेर, पुन्हा आत. अथर्वचे हात दूर्वा काढण्यात गुंतले होते, मात्र कान उंदराकडेच. उंदराचं आतबाहेर चाललं होतंच, पण अहो आश्चर्यम्, यावेळी त्या उंदराबरोबर एक सापही होता. साप आणि उंदीर एकत्र! ते तर एकमेकांचे कट्टर शत्रू. आता मात्र अथर्वला राहावेनाच. दबकत दबकत तो त्या गुहेपाशी पोहोचला. हळूच आत वाकून पाहू लागला तर काहीच दिसेना. आत किर्र्र अंधार, पण तिथे काहीतरी वेगळं नक्कीच असावं असं त्याला वाटलं. बरं, अथर्व हा धीट मुलगा, त्यामुळे आत काय ते पाहून छडा लावल्याशिवाय त्याला तेथून निघता येईना. तो तसाच श्वास रोखून दबकत दबकत गुहेत पुढे निघाला. काही अंतर पुढे गेला नि तिथलं दृश्य पाहून नि:स्तब्धच झाला. गुहेत एक अप्रतिम महाल होता. तो पानं, फुलं, वेलींनी सजवलेला होता. चांदण्यांचे दिवे चमचमत होते. इंद्रधनुष्यातले रंग उधळत होते. वातावरणात मंद सुगंध पसरला होता आणि त्यात बैल, मोर, उंदीर आणि साप हे चौघे जण कामात मग्न झाले होते. अथर्व झटकन एका खांबामागे लपला. इतक्यात बैलाने विचारलं, ‘निरांजन तयार आहे ना रे?’ ‘होय नंदीदादा’ उंदीर म्हणाला. म्हणजे हा बैल म्हणजे शंकराचं वाहन नंदी. मग हे कोण? मयूर, मूषक आणि नागराज! या विचारानेच अथर्व चपापला.
‘बाळ, तू असा लपून का बसलायस?’ पाठीमागून आलेल्या आवाजाने अथर्व जोरात दचकला. मागून मोर त्याला पाहूनच हा प्रश्न विचारत होता.
 ‘मी, मी..’ अथर्वची भीतीने गाळणच उडाली. ‘अरे, अथर्व तो. मी ओळखतो नं त्याला. ये, ये अथर्व असा घाबरू नकोस, ये इकडे.’ उंदीर म्हणाला.
‘पण, पण हे चाललंय तरी काय?’ नकळत अथर्वच्या ओठावर प्रश्न उमटलाच.
सगळेच जोरात हसत म्हणाले, ‘गणेशोत्सवाची तयारी..’
‘काय?’ अथर्व किंचाळलाच.
नागराजाने हळूच मान वर करत फणा काढत म्हटलं ‘बाळा, हा नंदी शंकराचं वाहन, मोर कार्तिकेयाचं. उंदीर तर गणपतीचं आणि मी शंकर आणि गजाननाचा निकटवर्ती. म्हणून आम्ही चौघे मिळून गणेशोत्सव करतो इथे.’
‘होऽऽऽ’ नंदीने होकार भरला.
‘चकचक, चकचक. बोलण्यात वेळ वाया घालवू नका रे. तयारी झाली का ते पाहा चटकन.’ मोर त्याच्या चालीने पाहून परत आला नि म्हणाला, ‘जास्वंदीची फुलं राहिलीत.’  नंदी चटकन बाहेर जाऊन फुलांनी लगडलेली एक मोठ्ठी फांदीच घेऊन आला नि डुरकला,’ घेऽऽऽ.’ ते पाहून अथर्वला हसूच फुटलं. उंदराने परत एकदा खुडबुड केली नि तो म्हणाला, ‘सगळं ओ.के.? मी जाऊ?’ आणि निघालाच.
अथर्व आ वासून पाहतच होता. इतक्यात उंदीर परत आला, पण तो त्याच्या पाठीवर असलेल्या गणराजासह. पितांबर नेसलेला तो लंबोदर पाहून, ‘उंदरावर बैसोनि दुडदुडा येती’ या ओवीची आठवण अथर्वला झाल्यावाचून राहिली नाही. नंदीने बाप्पाच्या कपाळी टिळा लावून त्याला ओवाळलं. नागराजांनी त्याच्या कटीवर बसून त्याला आभूषित केलं. मयूराने त्याला आसनापर्यंत नेलं. अथर्व अक्षरश: डोळे फाडून हे सारं दृश्य पाहत होता. किती तेजस्वी, नेत्रसुखद आणि लोभस रूप. पण एकदम त्याच्या लक्षात आलं, अरे, याला तर आभूषणंच नाहीत.
 तो मुकुट, सोनेरी सोंड, कर्णभूषणं, वाक्या, कुठे आहे सगळं?’
‘अथर्व, अथर्व..’ मोराने हळूच हाकारलं.
‘अं.. अं..’ – अथर्व
‘गणेशराज, हा अथर्व बरं का, आमचा छोटा दोस्त.’ बाप्पाच्या पायाशी बसलेला उंदीरमामा पुटपुटला.
‘ओळखलं बरं, अथर्व, टापटिपीने केलं की काम आवडतंच करायला.’  म्हणत गणराज गालातल्या गालात हसला.
‘खराखुरा गणपती!’ अथर्वचं मन हरखलं. पण असा? याची आभूषणं कुठेयत्? हा त्याच्या मनातला प्रश्न ओळखून सर्पराज म्हणाला, ‘मित्रा, देवत्व येतं ते गुणाने, तेज येतं ते शौर्याने, चमक येते ती बुद्धीने. हे सारं तर या बाप्पाकडे अमाप आहे मग दागिन्यांची गरजच काय?’
‘पण, आम्ही तर त्याला हिरेजडित मुकुट आणि अनेक अलंकार घालून आभूषित करतो,’ अथर्व म्हणाला.
त्यावर मोर उत्तरला, ‘अरे, गणेशोत्सव हा तुमच्यासाठी उत्सव असतो ना, त्या उत्सवासाठी सारेच नटतात, सजतात, मनोरंजनासाठी प्रयत्न करतात. म्हणून तुम्ही देवालाही दागदागिन्यांनी नटवता, सजवता. काय, बरोबर ना?’
‘हो, हो, अगदी बरोबर,’ अथर्व एकदम पटून चुटकी वाजवत म्हणाला.
‘ते नटणं, सजणं, ठीक आहे. पण मनोरंजन! नको रे बाबा! तो डॉल्बीचा आवाज, ते कानठळ्या बसवणारं संगीत, मिरवणुकीच्या वेळचा गोंगाट, मला तर हल्ली उत्सवासाठी यायचंच जिवावर येतं.’ गणपती म्हणाला.
 ‘म्हणजे, तू येणार नाहीयेस. मग आम्ही मज्जा कशी करणार. मोदकाचा नैवेद्य कुणाला दाखवणार, आरत्या म्हणण्याची गंमत कशी लुटणार?’
‘अरे, हो, हो, मी येणारेय. पण पाहा ना अथर्व, केवढा गोंगाट, केवढी अनागोंदी. अरे साधी माझी मिरवणूक म्हटली तरी केवढं मानपान आणि राग-रुसवे. त्यातून  माझ्यापुढे केवढी मागणी आणि सांगणी, म्हणजे नवस रे. कष्ट करणाऱ्यांच्या पाठीशी मी आहेच, पण विनाकष्टाचं मागणं मागून लोक मला अडचणीत आणतात. अशा वेळी मी काय करावं सांग तरी.’
‘पण गणपतीराया, मी आणि माझे छोटे दोस्त तरी असं काही मागणं आणत नाही तुझ्यापुढे. तू आलेला आम्हाला आवडतोस, तो तू येताना अनेक नातेवाईकांना घेऊन येतोस म्हणून. वर्षभर दुरावलेली माणसं नि मनं या निमित्ताने एकमेकांना भेटतात म्हणून. गणेशोत्सव म्हणजे समाजातील एकात्मता. अनेक लोक मंडळांच्या रूपाने एकत्र येतात, त्यांच्यातील भावबंध दृढ होतात, किल्मिषं नाहीशी होतात. आरास, रांगोळ्या, नर्तन, वादन, गायन यानिमित्ताने काही नवीन प्रयोगांना चालना मिळते. कलेच्या प्रकटीकरणाला वाव मिळतो. समाजात नवीन विचार रुजवण्याची संधी मिळते. तुझ्या रूपाने हे सारं घडतं आणि म्हणूनच तू आमचा आवडता बाप्पा आहेस.’
‘अरे, पण तुला स्वत:ला मी आवडतो की नाही?’
 ‘अरे हो तर, खूपच! कारण वर्षभर चाललेली मार्काची गणितं, त्यासाठीची ती धडपड, नकोशी स्पर्धा यातून थोडीशी का होईना विश्रांती माझ्या वाटय़ाला येते ती फक्त तुझ्यामुळेच! अरे, हा उंदीर तुझ्या पायाशी आहे पण आम्ही मात्र वर्षभर त्याच्यासारखी शर्यत म्हणजेच रॅटरेस अगदी जीव गुदमरून जाईपर्यंत लावत असतो. कधी जिंकतो, कधी हरतो, पण शर्यत सोडत नाही. तुझ्याबरोबर हाही घरात आल्याने असेल कदाचित, पण थोडा काळ त्या शर्यतीचा विसर पडतो. तुझ्यावर असलेला पूर्ण विश्वास भविष्याच्या चिंतेपासून आम्हाला बाजूला करतो. म्हणूनच बाप्पा, तू आमच्याकडे यायला असं कंटाळू नको, उलट दरवर्षी आनंदाने ये नि येतच राहा.’
‘हो, हो, गणदेवा, अथर्वसारख्या मुलांच्या आनंदासाठी, सुखासाठी तुम्ही दरवर्षी आलंच पाहिजे. आणि त्याचबरोबर समाजातील जे काही घटक आम्हा उंदरांसारखे अशक्त असतात आणि उपद्रवी म्हणून बहिष्कृत केले जातात, त्यांना प्रवाहात आणण्यासाठी तुझं येणं गरजेचं आहे.’ उंदीरमामाने जोड दिली.
‘अशक्तांचंच काय, आमच्यासारख्या ताकदवानांच्या कष्टाचा उपयोग करून घेऊन मग त्यांनाच नंदीबैल म्हणून हिणवणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी तू हवासच!’ नंदीने पुस्ती जोडली.
‘सौंदर्यापायी जीव गमावणाऱ्या मोरांचा जीव वाचवण्यासाठी आणि डूक ठेवणाऱ्या, दुष्ट म्हणून विनाकारण बदनाम होऊन सतत धास्तीत असणाऱ्या आमच्यासारख्या बांधवांचा तारणहार होण्यासाठी, बाप्पा तू यायलाच हवं..’ नागराज.
‘हो, हो, हो बाप्पा, तू यायलाच हवं, यायलाच हवं..’ सर्वानी एकच पुकारा केला.
‘अरे, हो हो! उद्या तर मी येणारच आहे आणि दरवर्षी येत राहीनच. तथास्तु!’
ल्ल मेघना जोशी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ganesh festival artical