एका परिचिताच्या घरी गणपती दर्शनाला गेलो होतो. कोरीव काम केलेल्या मखरात गणपतीची स्थापना केली होती. मूर्ती खऱ्या दागिन्यांनी नटवली होती. समोर नाना तऱ्हेच्या फळांनी भरलेल्या टोपल्या मांडल्या होत्या. चांदीचं निरंजन तेवत होतं. गणपती समोर एक लखलखीत चांदीचं लहानखुरं घंगाळ केशरी पेढ्यांनी शिगोशिग भरलं होतं.
नुकतीच आरती होऊन गेली होती. हॉलमध्ये मांडलेल्या सोफ्यावर घरातली आणि बाहेरून आलेली सहा-सात आप्त मंडळी विसावली होती. गणेशमूर्तीला हात जोडून माझ्याबरोबर इतर आप्तांनीही सोबत आणलेला प्रसाद देवापुढे ठेवला. केळ्यांचा अख्खा घड, पेढ्यांचे, मलाई पेढ्यांचे, बर्फीचे, खव्याच्या मोदकांचे, त्रिकोणी रंगीत खोक्यातले एकवीस मोदक, काहींनी सफरचंदे आणली होती. एकाने सुक्यामेव्याचा भरभक्कम पुडा गणपतीसमोर ठेवला. असे नानाविध प्रसादाचे प्रकार गणपतीसमोर थोड्याच वेळात जमा झाले. जरीचा परकर पोलका घातलेल्या एका चुणचुणीत मुलीने ते पेढ्याचं घंगाळ उचलून प्रसाद वाटण्यासाठी आमच्या समोर आणलं. प्रत्येकाला ती प्रसाद देत होती. दोघांनी एकच पेढा अर्धा अर्धा वाटून घेतला. एकाने केवळ एका पेढ्याचा चिमूटभर तुकडा जिभेवर ठेवला. मी अख्खा पेढा घेऊ जाताच, सवयीप्रमाणे बायकोकडे पाहिलं. तिने डोळे वाटरताच मीही अर्धाच पेढा घेतला. घंगाळभर पेढ्यातले जेमतेम दोनतीनच पेढे संपले होते. प्रसाद अजून कोणाला द्यायचा राहिलेला नाही, याची खात्री करून तिने ते पेढ्यांचे घंगाळ जागेवर ठेवून दिलं. ठेवण्यापूर्वी एक अख्खा पेढा तोंडात टाकायला ती विसरली नाही. त्यांच्याकडचा पाहुणचार उरकून मी आणि पत्नी घरी जायला निघालो, मी पत्नीला म्हटलं, ‘‘काय गम्मत आहे बघ, एकेकाळी अख्खा पेढा प्रसाद म्हणून मिळावा म्हणून धडपडणारे आम्ही आता पेढ्यांचं घंगाळ समोर आलं तरी, त्यातला एक पेढा प्रसाद म्हणून खायलासुद्धा नको वाटतो.’’ बायको म्हणाली, ‘‘अहो तो काळच वेगळा होता.’’ तो वेगळा काळ डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटा सारखा सरकू लागला…
हेही वाचा : हात जेव्हा डोळे होतात…
मी, तीस-पस्तीस वर्षांपूर्वी ज्या वस्तीत राहायचो, तेथे गरीब मध्यमवर्गीय लोकच राहायचे. पण उत्साही आणि समाधानी. सर्व सणवार अगदी काटकसरीत, पण अमाप उत्साहात साजरा करणारी कुटुंब तेथे भांडततंडत पण एकोप्याने वास्तव्याला होती. अशा या वस्तीत बऱ्याच कुटुंबात दरवर्षी गणपतीची स्थापना होत असे. या दिवसांत, घरातून पाहुण्यांचा दिवसभर अखंड ओघ सुरू असायचा. सकाळ-संध्याकाळ आरत्यांचा नुसता दणदणाट उडून जाई. मंत्र पुष्पांजली झाल्यावर सर्वांना प्रसाद दिला जात असे, त्या प्रसादात पेढ्याचा प्रसाद म्हणजे अगदी लॉटरी, असे आम्हाला वाटत असे. त्या काळी प्रसाद असायचा तो म्हणजे, खिरापात, साखर फुटाणे, बत्तासे, फार तर घरी बनविलेल्या रवा बेसनाच्या वड्या. मात्र ज्या कुटुंबात गणपती बाप्पांनी आपला कृपा प्रसाद हात सैल सोडून दिलेला असे अशा घरी प्रसाद म्हणून मोठ्यांना अख्खा आणि लहानांना अर्धा पेढा प्रसाद म्हणून दिला जायचा. मंत्र पुष्पांजली झाली की कोणी अत्यंत हिशोबी, तगडा मुलगा पेढ्यांचे भांडे त्याच्या डोक्यावर धरून प्रसाद वाटायला दरवाजात उभा राही. घराबाहेर पडणाऱ्यांच्या हातावर एक एक पेढा, कोणीही डबल डबल घेणार नाही याची पक्की खात्री करून टेकवत राही. खिरापत, साखर फुटाणे, बत्तासे वगैरे प्रसाद वाटताना इतका बंदोबस्त करायची गरज पडत नसे. तरी तोही दोन दोनदा प्रसाद लाटणारे चलाख दर्शनार्थी असायचेच. प्रसादातल्या खिरापतीत किसलेलं-भाजलेलं सुकं खोबरं, पिठी साखर आणि किंचित वेलची पावडर, या सर्व साहित्याचा भुगा एकत्र करून खमंग तयार झालेली खिरापत चमच्यांनी वाटली जायची. खिरापत पहिल्या दिवशीच्या रात्रीच्या मोठ्या आरतीसाठी. दिवसभर दर्शनाला येणाऱ्यांसाठी साखर फुटाणे, साखरेचे पांढरेधोप बत्तासे, नाही तर पिकलेल्या केळ्याचे सालीसकट केलेले आडवे तुकडे. गम्मत म्हणजे तो प्रसादही डबल डबल घेणारे महाभाग होते.
घरगुती असोत नाहीतर सार्वजनिक असोत गणपती विसर्जन समुद्रात व्हायचे. विसर्जनासाठीचा प्रसाद वेगळा. खोबरं पेरलेली, कोथिंबीर घातलेली वाटली डाळ सढळ हातांनी वाटली जायची.ओल्या खोबऱ्याचे अगदी बारीक बारीक तुकडे करून त्यात साखर घालून केलेला प्रसाद, ओल्या खोबऱ्याचा ओलसरपणा आणि साखर याचा अपूर्व मिलाफ होऊन एक मस्त ओलसर गोड पदार्थ चमच्याने हातात पडायचा. भूतकाळात पोहचलेलो मी बायकोच्या आवाजाने त्यातून बाहेर पडलो. बायको म्हणाली, ‘‘चला, सोसायटीच्या गणपतीचं दर्शन घेऊ.’’ आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडण्याच्या तयारीत असताना मंडळाच्या कार्यकर्त्याने केशरी लाल रंगाचा एक एक मोतीचूर लाडू प्रसाद म्हणून आमच्या हातावर ठेवला. बायकोने तिच्या पर्समधला टिश्यू पेपर काढला आणि त्यात दोन्ही लाडू बांधून घेतले. म्हणाली, ‘‘मी डोळे वटारले म्हणून थांबलात, डॉक्टरने इतकं सांगूनही तुम्ही गोड खायचं कमी करू नका.’’
हेही वाचा : बुद्धिदेवता ओंकारब्रह्म
मी म्हटलं, ‘‘आता प्रसादातसुद्धा किती किती बदल झालाय गं, आता ती पूर्वीची खिरापत, साखर फुटाणे, बत्तासे वगैरे कुठे दिसतच नाहीत.’’
बायको म्हणाली, ‘‘अहो आता, सार्वजनिक उत्सवातसुद्धा येईल जाईल त्याला, मोतीचूर वाटतायत, खिरापत, साखर फुटाणे, बत्तासे आता इतिहास झाला.’’
मी म्हटलं, ‘‘हो गं, आपल्या लग्नातसुद्धा तुझ्या घरच्यांनी आमच्याकडे, मुलाकडे म्हणून सकाळच्या फराळासाठी चिवडा लाडूची ताटे देताना, साधे बुंदी लाडू तेसुद्धा अगदी मोजूनमापून दिले होते.
बायको म्हणाली, ‘‘प्रसादात खूपच बदल झालाय, पण तुमचा खवचटपणा मात्र अजून पूर्वीसारखा तोच आहे.’’
gadrekaka@gmail. com