मॅटिल्डा ॲटथनी डिसिल्वा
आज ईस्टर संडे. सणाचा दिवस. आनंदाचा दिवस. त्यासाठी रोहनच्या दोन्ही आत्या त्याच्या घरी आल्या होत्या. त्यामुळे घरात बच्चापार्टी गोळा झाली होती. रीटाआत्याचे झॅक आणि निक, सोनाआत्याचे सॅबी आणि रिया, घरातले रोहन व चिंगी.. सहाजणांचा गोंधळ घरात चालू होता. सगळे जण चर्चला काल मध्यरात्रीच जाऊन आले होते. त्यामुळे सकाळपासून खेळण्यातच सगळे दंग होते. आई आणि आत्यांनी मिळून छान छान पदार्थ बनवायला घेतले होते. बच्चेकंपनी अधेमधे किचनमध्ये जाऊन केक व वडय़ांचा आस्वाद घेत होती नि परत येऊन एकमेकांबरोबर मस्ती करत होती.
‘‘चला.. चला.. सगळे जण इकडे या बरं..’’ रोहनच्या आईने हाक दिली.
‘‘काय ग आई?’’ रोहनने विचारलं.
‘‘मी तुमच्यासाठी एक ‘गेम’ ठेवला आहे.’’ आई म्हणाली. गेम म्हटल्यावर सगळे एका सुरात ओरडले.. ‘‘हुर्रेऽऽऽ’’
‘‘कसला ग खेळ मामी?’’ झॅकने विचारलं.
‘‘मी आपल्या घरात व बाहेर बागेत काही बॉक्स लपवले आहेत. त्या बॉक्समध्ये अंडी (ईस्टर एग्ज) आहेत. त्याचबरोबर तुमच्यासाठी सरप्राईज गिफ्टपण आहेत. तुम्हाला ते बॉक्स शोधायचे आहेत. कळलं का?’’ आईने सागितलं.
‘‘अरे व्वा! मज्जा येणार आता.’’ सॅबी उडय़ा मारत म्हणाला.
‘‘आधी मी काय सांगते ते नीट ऐका बरं! दोघी मुलींनी घरातले बॉक्स शोधायचे. मुलांनी बाहेर बागेत जायचं. पण.. पण.. कोणीही बागेतल्या झाडांना इजा करायची नाही. सांभाळून शोधायचे बॉक्स. आणि तुम्ही दोघींनीदेखील उलथापालथ करायची नाही. कळलं?’’ आईने समजावलं.
‘‘मामी, मला सगळे बॉक्स मिळाले तर ते सगळे मलाच का?’’ छोटय़ा निकला प्रश्न पडला.
‘‘आधी शोधा तर खरं. मग बघू या काय करायचं ते..’’ मामीने निकच्या गालावर हळूच हसत हसत चापटी मारली.
झॅक, निक, रोहन व सॅबी लगेच बाहेर धावले, तर रिया आणि चिंगी घरात शोधाशोध करू लागल्या. सगळी मोठी माणसं त्यांची गंमत पाहत होती. मोठा झॅक आणि रोहन लगबगीने सगळीकडे शोधत होते. तर दोन्ही छोटे- निक व सॅबी त्यांच्या मागेपुढे करत होते.
‘‘हेऽऽऽ मला सापडला एक बॉक्स..’’ झॅक ओरडला. त्यापाठोपाठ रोहनलाही मिळाला.
थोडय़ा वेळाने आईने सगळ्यांना घरात बोलावलं.
‘‘पाहू बरं कोणाला किती बॉक्स सापडले ते?’’
‘‘मला एक सापडला..’’ सॅबी खूप खूश झाला होता.
‘‘मला दोन मिळाले. रोहनला एक मिळाला.’’ झॅक म्हणाला.
‘‘तुम्हाला ग मुलींनो? कोणाला किती मिळाले?’’ आईने रियाला विचारले. रियाचा चेहरा उतरला होता.
‘‘दोन्ही बॉक्स मला मिळाले..’’ चिंगी उडय़ा मारत म्हणाली. तेवढय़ात छोटा निक रडत रडत आत आला.
‘‘मला एकपण नाही मिळाला.’’
‘‘असू दे हं निक. तुलापण मिळणार.’’ आईने आश्वासन दिलं.
‘‘सगळे मिळून किती बॉक्स आहेत बरे?’’ आईने विचारलं.
‘‘सहाऽऽऽ’’ सगळे ओरडले.
‘‘बरोबर.. आणि तुम्ही किती जण आहात?’’
‘‘सहाऽऽऽऽ’’
‘‘मग प्रत्येकाला एक-एक बॉक्स मिळायला हवा की नाही?’’ आईने विचारलं.
‘‘सॅबी आणि रोहनला बॉक्स मिळाला आहे. पण आपले छोटेराव निक व रिया यांना मिळालेला नाही. मग आता काय करायचं आपण? चिंगी, तू बोल बरं.. तुझ्याकडे दोन आहेत ना!’’
‘‘मी माझा एक बॉक्स निकला देईन.’’ चिंगी म्हणाली. ते ऐकून झॅकही एक बॉक्स रियाला द्यायला तयार झाला. मग काय, निक व रिया हसायला लागले.
‘‘पण आई, मला एक प्रश्न पडला आहे.’’ चिंगी म्हणाली.
‘‘कोणता ग?’’ आईने विचारलं.
‘‘ईस्टरसाठी हे ‘ईस्टर एग्ज’ का करतात?’’ – इति चिंगी.
‘‘तुम्हाला माहीत आहे ना, कोंबडीचं पिल्लू कशातून बाहेर येतं ते?’’
‘‘होऽऽऽ मला माहीत आहे.. अंडय़ातून येतं पिल्लू.’’ झॅक म्हणाला.
‘‘हो. म्हणजे नवीन जन्म होतो ना! तसेच प्रभू येशू (जीजस) ‘गुड फ्रायडे’ला मरण पावले व ईस्टरच्या दिवशी परत उठले. म्हणजे नवीन जन्म झाल्यासारखंच होतं. त्याचं प्रतीक म्हणून हे ईस्टर एग्ज!’’ आईने माहिती दिली.
‘‘ चला, आता बघा बरं कोणाला काय ‘सरप्राईज’ मिळालं आहे ते?’
सगळ्यांनी आपापले बॉक्स उघडले. प्रत्येकात एक-एक लहान खेळणं होतं, चॉकलेट होतं आणि एक-एक ईस्टर एग होतं. सगळी बच्चे कंपनी एकदम खूश झाली. परत एकदा त्यांनी जल्लोष केला..
‘‘हॅपी ईस्टरऽऽऽ’’
सगळ्यांनी ईस्टर एग्जवर ताव मारला.
matildadsilva50@yahoo.co.in

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy easter easter sunday festival baby party toys amy
First published on: 17-04-2022 at 00:05 IST