डॉ. नंदा संतोष हरम

आकाश आईला रंग बनवायला मदत करत होता. त्याचं घडय़ाळाकडे लक्ष गेलं आणि एवढय़ात बेल वाजली. ‘विवान आला वाटतं,’ असं पुटपुटत त्यानं दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच विवान म्हणाला, ‘‘हे काय आकाश, खेळायला नाही यायचं?’’
आकाश तत्परतेनं म्हणाला, ‘‘अरे, उद्या रंगपंचमी आहे ना?’’ पुढे तो काही बोलणार एवढय़ात विवान सांगू लागला.
‘‘मी उद्याची सगळी तयारी केलीय. रंग, फुगे आणून ठेवलेत दुपारीच.’’
आकाश हसून म्हणाला, ‘‘अरे मित्रा, तेच तर सांगतोय तुला. मी रंग बनवतोय म्हणजे मी आईला मदत करतोय.’’
विवान उत्सुकतेनं म्हणाला, ‘‘रंग घरी बनवतोस म्हणजे नेमकं काय करतोस? दाखव ना मला..’’
आकाशनं दार लावून घेतलं आणि दोघंही आत आले.
विवान आत आल्यावर म्हणाला, ‘‘हॅलो, काकू! आकाश म्हणत होता, तुम्ही घरी रंग बनवताय.. ते कशाला? बाजारात तर किती रंग मिळतात!’’
आकाशची आई म्हणाली, ‘‘विवान, तू म्हणतोस ते खरं आहे. पण तुला माहिती आहे का, हे बाजारात मिळणारे सर्व कृत्रिम रंग आपल्या शरीराला अपायकारक असतात.’’
‘‘म्हणजे नेमकं काय होतं?’’ विवानच्या चेहऱ्यावर बरीच प्रश्नचिन्हं उमटलेली आकाशच्या आईनं पाहिली.
ती म्हणाली, ‘‘आकाश, तुझ्या लक्षात आहे का काही? तू सांगू शकतोस?’’
आकाश थोडासा नरमून म्हणाला, ‘‘सर्व रसायनांची नावं नाही लक्षात, पण प्रयत्न करतो.’’
थोडासा विचार करून आकाश विवानला सांगू लागला, ‘‘हिरव्या रंगात कॉपर सल्फेट हे रसायन असतं. त्यामुळे डोळ्यांना सूज, तात्पुरता आंधळेपणा किंवा डोळ्यांना अॅलर्जी होऊ शकते.’’

parents stand when it comes to selecting modelling career for their children
चौकट मोडताना : कचाकड्याचे जग
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
How To Avoid White Clothes Getting Stain Of Color Dresses
Video: कपडे धुताना ‘हा’ पांढरा खडा वापरून वाचवा पैसे; बादलीत एका कपड्याचा रंग दुसऱ्याला लागणारच नाही
puppy rescue
माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video

‘‘बाप रे! आणि मग गुलाल? तो सेफ आहे का?’’ विवाननं असं विचारताच आकाश म्हणाला, ‘‘नाही ना. तोही घातक आहे. त्यात असलेल्या जड धातूंमुळे दमा, त्वचेचे विकार आणि तात्पुरता आंधळेपणा येऊ शकतो. विवान ‘आ’ वासून बघतच राहिला. काळा, निळा रंग.. त्यांच्यात कोणती रसायनं असतात? विवानच्या या प्रश्नावर आकाशनं आईकडे बघितलं. आईनं ओळखलं की रसायनांची नावं आकाशच्या लक्षात नाहीत. ती म्हणाली, ‘‘थांब, मी सांगते. काळ्या रंगात लेड ऑक्साईड असतं, ज्यामुळे मूत्र संस्थेच्या कार्यात बाधा येऊ शकते आणि निळ्या रंगातील ‘प्रुशिअन ब्ल्यू’मुळे त्वचेचे विकार होऊ शकतात.
विवान हे सारं ऐकून घाबरूनच गेला. तो म्हणाला, ‘‘बरं झालं काकू तुम्ही सांगितलं सारं. पण आता मी काय करू ?
आकाश म्हणाला, ‘‘हात्तिच्या! एवढं काय त्यात? आम्हाला तू मदत कर आणि घेऊन जा हेच रंग. चालेल ना आई?’’
‘‘बाळा, ही काय विचारायची गोष्ट आहे? घेऊ दे ना. चला.. गप्पा खूप झाल्या. काम करूया पूर्ण.’’
‘‘काकू सांगा ना हिरवा रंग कसा बनवायचा?’’ विवाननं असं विचारताच आकाशच्या आईनं मेंदीची पूड त्याच्या हातात दिली अन् म्हणाली, ‘‘विवान, घरी गेलास की जेवढी मेंदीची पूड तेवढंच त्याच्यात पीठ मिसळ की झाला रंग तयार!’’
‘‘कोणतं पीठ काकू?’’
‘‘अरे, कोणतंही चालेल. ही मेंदीची पूड पाण्यात मिसळली की ओला रंग तयार होईल.
‘‘मला वाटतं आई, मेंदीप्रमाणे दुसरीही कोणती पानं चालत असतील ना?’’ आकाशनं शंका विचारली.
‘‘अगदी बरोबर. पालक, कोथिंबीर, पुदिना किंवा टोमॅटोच्या झाडाच्या पानांची पाण्याबरोबर वाटून पेस्ट केली की झाला ओला हिरवा रंग तयार.’’ आई सांगू लागली.
‘‘लाल रंगाकरिता टोमॅटो, गाजर वापरता येईल ना काकू!’’ विवाननं डोकं लढवलं. तुझा अंदाज १०० टक्के बरोब्बर आहे. टोमॅटो आणि गाजराच्या रसापासून लाल रंग मिळेल. त्यातला चिकटपणा नाहीसा होण्याकरिता त्यात भरपूर पाणी घालायचं. आकाशची आई म्हणाली.
‘‘अन् आई, जास्वंदाच्या फुलांपासून लाल रंग येईल का बनवता?’’
‘‘हो.. का नाही? जास्वंदाची फुलं सुकवून त्याची पूड करून पीठ मिसळायचं की सुका लाल रंग तयार. ओला रंग हवा असेल तर फुलं रात्रभर पाण्यात बुडवून ठेवावी लागतील आकाश!’’
‘‘आज आपण बनवायचा का लाल रंग?’’ विवानची विचारणा. आकाशची आई म्हणाली. आज आपण टोमॅटो आणि गाजरापासून रंग बनविणार आहोत. माझ्याकडे जास्वंदाची फुलं नाहीत.’’

‘‘बरं.. विवान, आकाश तुम्ही मला सांगा, पिवळा रंग आपण सहजपणे कसा बनवू शकू? एक सुचवू? आपण स्वयंपाकघरात वापरतो रोज..’’ वाक्य पूर्ण व्हायच्या आतच दोघे जण एकसुरात ओरडले ‘‘हळद..’’
‘‘बरोब्बर!’’ आकाशच्या आईला बरं वाटलं की मुलांचं आहे लक्ष थोडं तरी स्वयंपाकघरात.. पण त्याचे डाग पडतील ना काकू!’’
‘‘विवान, हळदीच्या दुप्पट प्रमाणात बेसन घालायचं आणि हळदीचे डाग जातात धुतल्यावर.’’
‘‘हळद तोंडाला लागली की गोरं व्हायला होईल ना?’’ आकाश डोळे मिचकावत म्हणाला. सगळे जणं हसू लागले.
‘‘मुलांनो, स्मरणशक्तीला ताण द्या आणि सांगा, कोणती फुलं वापरता येतील पिवळ्या रंगाकरिता?’’ विवान आणि आकाश एका पाठोपाठ म्हणाले, ‘‘झेंडू, शेवंती.’’
‘‘सुक्या रंगाकरिता फुलं वाळवावी लागतील. मी फुलं आणली आहेत. ती आता पाण्यात उकळवूया आणि तशीच रात्रभर ठेवू. सगळा रंग पाण्यात उतरेल.’’ आई म्हणाली.
बोलता – बोलता हिरवा, लाल, पिवळा रंग तयार होत होते. एवढय़ात ओटय़ावर असलेल्या बीटाकडे लक्ष गेलं. दोघंही एकदम ओरडले, ‘‘युरेका! बीटापासून राणी कलर.. हो ना?’’ आकाशच्या आईनं लगेच बीट किसून दिलं आणि पाण्यात बुडवून ठेवायला सांगितलं.
आकाशच्या आईलाही मुलांबरोबर मजा येत होती. एवढय़ात तिचं लक्ष घडय़ाळाकडे गेलं. ‘‘चला मुलांनो, आटपा हा रंगांचा पसारा. मला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचंय.’’
विवान आणि आकाश खूप खूश होते. उद्या तर या नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी खेळतीलच, पण आज ते या रंग बनविण्याच्या आनंदात रंगून गेले होते..