‘‘ए… सोड… सोड माझं पेन आहे ते…’’ प्रसाद अथर्वच्या हातातलं पेन खेचत म्हणाला.
‘‘नाही. माझ्या बाबांनी ते सिंगापूरहून आणलंय. कळलं. ते माझं आहे.’’ अथर्व म्हणाला.
‘‘नाही. ते माझं आहे. हात लावशील ना तर बघ…’’
‘‘माझं पेन मला दे, नाहीतर…’’
अथर्व प्रसादच्या अंगावर धावत गेला. प्रसाद त्याच्या हातातलं पेन सोडायला तयार नव्हता. अथर्व आपल्या अंगावर धावत येतोय म्हटल्यावर प्रसादने त्याला जोरात ढकलून दिलं. अथर्व जोरात जाऊन बेंचवर आदळला. प्रसाद खूपच चिडला होता, त्याने अथर्वपाशी जाऊन त्या कंपासबॉक्समधलं पेन घेतलं आणि अथर्वच्या हातावर भोसकलं. अथर्व जोरात ओरडला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अथर्व पुन्हा तिरमिरीत उठला आणि प्रसादला ढकलणार तोच, प्रसादने सगळी शक्ती एकवटून त्याला पुन्हा बेंचवर ढकलून दिलं. आता मात्र अथर्वच्या डोक्याला चांगलंच लागलं. थोडंसं रक्त दिसू लागलं. अथर्व आणि प्रसादच्या भोवती गोळा होऊन मुलं मारामारी पाहत होती. तेव्हाच क्लास टीचर पाठक मॅडम तासासाठी वर्गात आल्या. त्यांना जे काही सुरू आहे ते लक्षात आलं. त्यांनी दोघांची मारामारी सोडवली आणि अथर्वला फर्स्ट एड घेण्यासाठी जा म्हणाल्या, तर प्रसादला वर्गाबाहेर उभं केलं. प्रसादला खूप राग आला होता. अथर्व जेव्हा फर्स्ट एडसाठी जात होता, तेव्हा प्रसाद रागाने अथर्वकडे पाहत होता. प्रसाद त्याच रागाने म्हणाला, ‘‘मी सोडणार नाही तुला. बघून घेईन.’’
पाठक मॅडमनी हे ऐकलं आणि त्या प्रसादला ओरडल्या. ‘‘तू काय गुंड आहेस? बिहेव विथ युअर लॅंग्वेज! आई-बाबा हे शिकवतात घरी?’’
प्रसादला पाठक मॅडमचाही खूप राग आला होता. पण तो तसाच रागाने त्यांच्याकडे पाहत होता. पाठक मॅडम म्हणाल्या, ‘‘संपूर्ण तास संपेपर्यंत ओणवा उभा राहा. मी तुला प्रिन्सिपल मॅडमकडेच नेते. अथर्व नाऊ यू गो.’’ अथर्व निमूटपणे निघून गेला. पाठक मॅडम क्लासमध्ये तासासाठी गेल्या, पण प्रसादच्या मनातला राग खदखदत होता.

आणखी वाचा-बालमैफल : गंधभरल्या गोष्टी

abortion pills illegally sale in vasai
बेकायदेशीर विक्री, तरुणींच्या जीवाला धोका; वसई विरार शहरात गर्भपात गोळ्यांचा काळाबाजार
uttarakhand self proclaimed baba built temple
“देवीनं स्वप्नात येऊन मला आदेश दिले”, म्हणत स्वयंघोषित बाबानं उत्तराखंडमध्ये १६५०० फुटांवर बांधलं मंदिर; पवित्र कुंडाचा स्वीमिंग पूल…
8 year old girl raped in andhra pradesh Crime news
धक्कादायक! शाळेतील मित्रांकडूनच आठ वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या; श्वान पथकाने आरोपींचा ‘असा’ काढला माग
mystery, suicide, Mehta, father,
मेहता पिता पुत्रांच्या आत्महत्येचे गूढ कायम, कर्जबाजारी नसल्याचा सुनेचा दावा
Vasco da Gama leaving the port of Lisbon, Portugal
Vasco da Gama ‘या’ गुजराती तांडेलाने ‘वास्को द गामा’ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो?
a banner holding young guy suggest to friends always be aware from people who instigate people
“चांगली मैत्री लोकांना बघवत नाही..” तरुणाने दिला मित्रांना मोलाचा सल्ला, पाहा VIDEO
Solapur bhishi fraud marathi news
सोलापुरात भिशी व फायनान्सच्या माध्यमातून २.६९ कोटींची फसवणूक, १३२ ठेवीदारांना दाम्पत्याने घातला गंडा
Boyfriend Stabs Girlfriend
“…तर आरती यादव वाचली असती”, पोलिसांवर आरोप करत पीडितेच्या आई-बहिणीने फोडला टाहो

या गोष्टीला दोन दिवस उलटून गेले. अथर्वच्या बाबांनी त्याला सिंगापूरहून आणून दिलेलं पेन प्रसादने जबरदस्तीनेच स्वत:कडे ठेवून घेतलं होतं. मारामारीबद्दल अथर्वने सगळं घरी जाऊन आई-बाबांना सांगितलं. पॅरेन्टस मिटिंगमध्ये मी टीचरशी बोलेन असं अथर्वच्या आईने त्याला समजावलं.
आपल्याला दिलेलं गिफ्ट आपल्याला वापरता येणार नाही याची खंत अथर्वला होती. त्यामुळे वर्ग सुरू असताना त्याचं प्रसादकडेच लक्ष होतं. प्रसाद मात्र स्वत:चंच पेन असल्यागत छानपैकी पेन हातात घेऊन लिहून बघत होता, आपलं अक्षर कसं मोत्यासारखं दिसतंय, यामुळे खूश होता. अथर्वच्या डोळ्यात सारखं पाणी येत होतं.
प्रसाद हा अतिशय हट्टी आणि दांडगट. अथर्व हा शांत आणि समजूतदार. प्रसाद हा अभ्यासात हुशार. पण त्याला एक वाईट सवय होती, दुसऱ्याची वस्तू आपली म्हणून हिसकावून घ्यायची. प्रसाद हा तब्येतीनेही लठ्ठ होता. त्यामुळे वर्गात त्याची दमदाटी असायची. सहावीच्या त्या वर्गात प्रसादशी कुणी भांडण करत नसे. त्याने एखादी वस्तू घेतली म्हणजे ती परत मिळणार नाही हे सगळ्यांनाच कळलं होतं. गणिताच्या बाई काय शिकवतायत याकडे अथर्वच लक्षच नव्हतं. तो दिवसही तसाच गेला आणि शाळा सुटायच्या आधी काही वेळ नोटीस आली की, शनिवारी सकाळी अकरा वाजता पॅरेन्टस-टीचर मिटिंग आहे. हे कळल्यावर अथर्व शाळेतून बाहेर पडताना ऋत्विकला म्हणाला, ‘‘मी पण येणार या मिटिंगला माझ्या आईबरोबर.’’
‘‘पण अरे आपल्याला नाही येता येणार, ती पॅरेन्टस-टीचर मिटिंग आहे ना?’’ इति ऋत्विक.
‘‘नाही मी येणार आणि प्रसादची तक्रार करणार.’’
‘‘मला माहितीय अथर्व ते तुझंच पेन आहे. मलाही माझी वस्तू कुणी घेतली तर रागच येतो. पण प्रसाद कसा आहे माहितीय ना तुला. मागे राघवला त्याने ग्राऊंडवर कसं खेळताना ढकलून दिलं.’’
‘‘हो. मलाही त्याने तसंच ढकललं, पण ते माझं पेन आहे. माझ्या बाबांनी मला ते गिफ्ट दिलंय. मी त्याची तक्रार करणारच.’’ हे बोलून अथर्व ताडताड निघून गेला.

आणखी वाचा-बालमैफल : पुस्तकात रमलेल्या राहुलची गोष्ट!

पॅरेन्टस मिटिंगच्या दिवशी प्रसादची आई गेलीच नाही. प्रसादच्या आडदांड स्वभावाबद्दल आणि दंग्यांबद्दल तिला सगळ्योसमोर यापूर्वीही ऐकावं लागलं होतं. प्रसादच्या आईला त्याची लाज वाटायची. तिने प्रसादला अनेकदा समजावलं, पण प्रसादचा स्वभाव ‘जैसे थे’च. मिटिंगनंतर तीन-चार दिवसांनी प्रसादच्या आईला फोन आला. प्रसादची आजी समोरच उभी होती. समोरून जे ऐकू येत होतं त्यामुळे प्रसादची आई पुढे काही बोलूच शकली नाही.
‘‘अहो काय? काय सांगताय? प्रसादने? कधी?’’ त्यानंतर प्रसादच्या आईला काहीच बोलता आलं नाही. ती धक्का बसल्यासारखी समोरून बोलणाऱ्या व्यक्तीचं बोलणं ऐकत होती. समोर उभी असलेली आजी मात्र काळजीत पडली. ती फोन सुरू असताना अधीरपणे प्रसादच्या आईला खुणा करून विचारतच होती. प्रसादच्या आईने फोन कट केला. आजी म्हणाली, ‘‘अगं काय झालं? प्रसादने आता काय केलंय?’’
‘‘प्रसाद अथर्वच्या घरी गेला होता.’’ प्रसादची आई म्हणाली.
‘‘काय? पुन्हा मारामारी तर…? ’’
तेव्हाच दारावरची बेल वाजली. प्रसादच्या आईने दार उघडलं. प्रसाद शाळेतून आला होता. प्रसादने आईकडे पाहिलं. तो आत आला. आजीदेखील समोरच उभी होती. आई प्रसादला म्हणाली, ‘‘तू अथर्वच्या घरी गेला होतास?’’ प्रसादने केवळ मान डोलवली.

‘‘पण अरे तू का गेला होतास प्रसाद?’’ आजीने न राहवून विचारलं.
प्रसाद एकाएकी रडायलाच लागला आणि त्याने येऊन आईला मिठीच मारली.
‘‘आई, आय अॅम सॉरी. मी पुन्हा असं करणार नाही. माझ्यामुळे तुला आमच्या क्लास टीचर पाठक मॅमकडून ऐकून घ्यावं लागलं.’’ आईच्याही डोळ्यात पाणी आलं. आजीलाही लक्षात आलं की काय झालं होतं.
‘‘पण मी तर पॅरेन्टस मिटिंगला आलेच नव्हते.’’ आई म्हणाली.
‘‘हो. पण नंतर दोन दिवसांनी तू शाळेत आली होतीस. मी वॉशरूमला आलो होतो आणि परत वर्गात जाताना मला तू स्टाफ रूमशी दिसलीस. क्लास टीचर पाठक मॅडम तुझ्याशी बोलत होत्या. त्या तुला माझ्या आणि अथर्वच्या मारामारीबद्दल बोलल्या.’’
‘‘हो. पॅरेन्टस मिटिंगनंतर पाठक मॅडमनी फोन करून मला बोलावून घेतलं. तुला अथर्वचं पेन घ्यायची काय गरज होती. तू त्याच्याकडून हिसकावून घेतलंस आणि त्याला मारलंस. त्यामध्ये अथर्वला डोक्याला खोक पडली. रक्त आलं. का करतोस तू हे असं?’’ आई काकुळतीला येत म्हणाली.
‘‘बाळा, असं नाही करायचं मी तुला सांगितलंय. तुला परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले की आई-बाबा हवं ते आणून देतात ना.’’ आजी समजुतीच्या सुरात म्हणाली.
‘‘सॉरी पण आजी दुसऱ्याकडे नवीन वस्तू आली की मला ती घ्यावीशी वाटते. ती आपल्याकडेच ठेवून द्यावीशी वाटते.’’
‘‘असं नाही करायचं बाळा. हे चुकीचं आहे.’’ इति आजी.

आणखी वाचा-सुखाचे हॅशटॅग: पूर्णपणे मन ओता..

‘‘हो. त्या दिवशी रात्री आई याविषयी बाबांशी बोलताना रडत होती. आई, सॉरी. मी कधीच असं करणार नाही. माझं चुकलं. म्हणूनच मी आज अथर्वकडे जाऊन त्याचं पेन परत केलं आणि त्याला सॉरी म्हटलं.’’
‘‘तुला तुझी चूक लक्षात आली ना हेच महत्त्वाचं आहे बाळा. आणि यापुढे जेव्हा तुला दुसऱ्याची वस्तू हातात घ्यावीशी वाटेल तेव्हा ती बघून त्या माणसाला परत करायची. मस्ती, मारामारी करून ती बळाने आपल्याकडे ठेवायची नाही.’’ आजी म्हणाली.
‘‘हो आजी… मी नक्की प्रयत्न करेन. तसं वाटलंच तर राग आल्यावर जसं शंभर ते एक असे उलटे अंक म्हणायला आईने सांगितलंय तसं करेन.’’
हे ऐकल्यावर आजी आणि आईला हसायला आलं. ‘‘माझं काही चुकलं का आजी?’’
‘‘नाही रे. आज तू शहाण्यासारखा वागलास म्हणून आज मी तुझ्यासाठी साखरभात करते.’’ त्याला जवळ घेत आजी म्हणाली. साखरभाताचं नाव ऐकून प्रसादने आजीला घट्ट मिठी मारली आणि प्रसादच्या आईलाही हसू आलं.

purnankjoshi6@gmail.com

बाबा

बाबा हे बाबाच असतात
जे मुलीच्या सर्व इच्छा पूर्ण करतात
न मागता सर्व काही आणून देतात
मला तर ते कधीकधी जादूगार वाटतात
मला नवे कपडे आणून देतात
पण स्वत: मात्र जुनेच घालतात
कुटुंबांसाठी सारखे कष्ट करतात
कौतुकापासून नेहमीच अलिप्त राहतात
त्यांच्या कौतुकासाठी मी नेहमी झटत राहीन
माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण चांगले काही करण्यात घालवीन
बाबांसाठी मी जगाशीही वैर घेईन…
त्यांना अभिमान वाटावा असे करणे हेच माझ्या
जीवनाचे ध्येय ठरवीन…
-आराध्या सुरेंद्र बेळगुंदकर श्री सरस्वती हायस्कूल, हात्तिवडे (इयत्ता ६ वी),

आपण सारे वाचू

मी वाचतो तुम्हीही वाचा
आपण सारे वाचू
पुस्तकांच्या पानांतून
ज्ञानाचे कण वेचू
वाचनाच्या साधनेतूनी
चित्र वाचू, चरित्र वाचू
मित्र वाचू, मैत्र वाचू
संकटांतूनही वाचू
वाचनाचा ध्यास घेऊनि
यशशिखरांवर पोहोचू
ज्ञानाने समृद्ध होऊनि
सारे आनंदाने नाचू
वाचनव्यासंगाने घडवू
रंजन, मंथन, चिंतन
सार्थक करू निजीजीवनाचे
बनूया राष्ट्राचे पाचू
-विनोद सिनकर