श्रीनिवास बाळकृष्ण shriba29@gmail.com

गेली कित्येक वर्ष मी एका महान संशोधनात स्वत:ला गाडून घेतलं आहे. ध्यास एकच : तो म्हणजे वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाचा प्रश्न सोडवणे. जमीन, जंगलं नष्ट होत आहेत. मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या मासेमारीमुळे अनेक समुद्री मासे कमी झालेत. मटण खर्चीक होत चाललं आहे. आणि वाढती लोकसंख्या आणखीनच गरीब होत चालली आहे.

पण मित्रांनो, मी आता शोध लावला आहे.

काय झालं, की आमच्या देशात रात्री दुकानं बंद असतात आणि मला कधीही भूक लागते. बस्स.. हेच निमित्त झालं. गरज ही शोधाची जननी असते. इथं बहिणीने मदत केली, म्हणून भूक ही शोधाची बहीण असते. दुकानं बंद, फ्रीज रिकामा अशी स्थिती इतरांवर येऊ नये म्हणून चटकन् एक उपाय सुचला. कागदापासून अन्ननिर्मिती होऊ शकते! तशी घरात रद्दी होतीच. त्यातले जुने पेपर काढून त्यातल्या एकेका पानाला वेगळं करून त्यांची पिळून फोटोत दिसते तशी वळकटी अर्थात गुंडाळी करून घेतली. त्याला मार्किंग टेपने गच्च गुंडाळले. मार्किंग टेपला कागदी सेलोटेपदेखील म्हणतात. असे कोंबडीच्या अंडय़ापेक्षा मोठय़ा अन् शहामृगाच्या अंडय़ापेक्षा छोटय़ा आकाराचे गोळे तयार केले. किती? ते तुम्ही कुठला पदार्थ तयार करणार त्यावर ठरवा. त्या आकारानुसार त्यावर टिश्यू पेपरसारखा पातळ कागद गुंडाळला.

मग गुगलवर पाहून शेम टू शेम रंग फासला. प्लेट सजवली आणि बसलो खायला. बहिणीने अचानक पोट भरल्याचे सांगून खायचं टाळलं. मग सर्व मला एकटय़ानेच फस्त करावं लागलं. दिसायला छान असलं तरी टेस्ट फार छान नव्हती आणि सकाळी पोटातही कसंसच झालं. बातम्या तिखट झाल्या असाव्यात का? दुसऱ्यांदा करून पाहावं लागेल. आता यापुढे माझंही नाव महान.. सॉरी अतिमहान शास्त्रज्ञांमध्ये जोडलं जाईल. न्यूटन, आईन्स्टाइन वगैरेंनंतर मीच. हो. अनेक पुरस्कार, सत्कार.. बस रे बस.. तुम्हालाही काही असं बनवता आलं तर थोडंफार!