रूप, रंग आणि गंध या सगळ्याचे वरदान लाभलेली आणि मुख्य म्हणजे वर्षांचे बाराही महिने फुले उमलतील अशी फार कमी फुलझाडे आहेत. त्यातील एक महत्त्वाचे फुलझाड म्हणजे कण्हेर. कण्हेरीच्या फुलांचे सौंदर्य, रंग इतका सुंदर की कीटकच काय, पण आपण माणसंदेखील त्याकडे आकर्षित होतो. कण्हेर किंवा कण्हेरी म्हणून ओळखली जाणारी ही भारतीय वंशाची झुडूपवर्गीय सदाहरित विषारी वनस्पती. नेरियम ओलेंडर (Nerium oleander) असे हिचे शास्त्रीय नाव आहे. भारतात सर्वत्र आढळणारी ही झुडूपवर्गीय वनस्पती असून हिची उंची ३ मीटपर्यंत असू शकते. बाराही महिने याला फुले येतात. फुले गुच्छात असून झाडाच्या शेंडय़ाला असतात. फूल नाजूक, ५ पाकळ्या असलेले तसेच रंग गडद गुलाबी, फिक्कट गुलाबी, सफेद असा असू शकतो. फुले सुगंधी असतात. फुलाच्या पाकळ्या आतिशय नाजूक आणि पातळ असतात. फुलांचा वापर हार, गजरे तसेच आरास करण्यासाठी केला जातो. फुलांपासून सुगंधी द्रव्ये देखील तयार केली जातात. अगरबत्तीसाठी त्याचा वापर केला जातो. कण्हेरीला संस्कृतात ‘करवीर’ असे म्हणतात.
कण्हेरीची पाने रुंदीला बारीक तर लांबीला मोठी असतात, पण साधारण १२-१५ सेंमी लांब असू शकते. पाने रंगाने गडद हिरवी आणि काहीशी जाड असतात. विषारी असली तरी बऱ्याच रोगांवर यापासून औषध बनविले जाते. पार्थिव महागणपती पूजनात वापरल्या जाणाऱ्या २१ गणेशपत्रींमध्ये देखील कान्हेरीच्या पानांचा समावेश केलेला आहे. कण्हेरीची विषबाधा झाली तर श्वास बंद होतो, हृदयाचे काम थांबते आणि आकडी येऊन तोंड वेडेवाकडे म्हणजेच विकट होते. त्यामुळे सावधान! याच्या पानांचा आकारदेखील सुंदर असतो. त्यात ती बाराही महिने उपलब्ध असतात. त्यामुळेच शोभेची वनस्पती म्हणून उद्याने, शाळा परिसर, रस्त्याच्या मध्ये दुभाजकाला, शाळा परिसर, मंदिर परिसरात कण्हेरीची लागवड केली जाते. कॉमन क्रो नावाचे एक सुंदर फुलपाखरू या झाडावर अंडी घालते. त्याची अळी याची पाने खाऊन आपली उपजीविका करते. तसेच इतर फुलपाखरे मध पिण्यासाठी या फुलावर येतात. त्यामुळे फुलपाखरू उद्यानात याची लागवड केली जाते.
फुले गळून पडली की त्या ठिकाणी शेंगा येतात, या शेंगांमध्ये बिया असतात. या बियांपासून कण्हेरीची नवीन रोपे तयार करता येतात. परंतु सगळीकडेच फलधारणा झालेली पाहायला दिसत नाही. थंड हवामान असेल अशा ठिकाणी फलधारणा झालेली दिसते. छाटकलमाद्वारे देखील याची नवीन रोपे तयार करता येतात.
याच्या मुळ्यादेखील औषधी असून, विशेषकरून त्वचाविकारांवर गुणकारी आहेत. कण्हेरीची पाने, साल, मुळ्या, चिक सगळचं विषारी आहे. त्यामुळे तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाशिवाय कोणत्याही प्रकारच्या औषधात त्याचा वापर करू नये, ही विनंती. बाजारात कण्हेरीच्या फुलांना मोठी मागणी आहे. त्याच्या कळ्या विकत मिळतात. शेतकरी याच्या लागवडीचा विचार करू शकतात. ही झुडूपवर्गीय असल्याने जास्त जागा लागत नाही. तसेच आजकाल हिची बुटकी जात देखील बाजारात उपलब्ध आहे. कुंडीमध्ये आपण तिची लागवड करू शकतो. हिला प्रखर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. आपल्या सोसायटी, शाळा परिसराची शोभा वाढायची असेल, त्यात फुलपाखरे पाहुणी यावीत असे वाटत असेल तर कण्हेरीचं रोप आपल्या हिरव्या धनात सामील करून घेतलेच पाहिजे.
भरत गोडांबे bharatgodambe@gmail.com