scorecardresearch

जलपरीच्या राज्यात : देवमासा.. मासा नाहीच मुळी!

देवमाशांना बरेच लोक ‘मासा’ समजतात, मात्र देवमाशांना सस्तन प्राण्यांसारखी फुप्फुसं असतात.

जलपरीच्या राज्यात : देवमासा.. मासा नाहीच मुळी!
भारतात २५ विविध प्रकारचे जलचर सस्तन प्राणी आहेत.

माझ्या वाचक मित्र-मैत्रिणींनो, मागच्या लेखामध्ये पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी म्हणून व्हेल- अर्थात देवमाशाची ओळख करून घेतली. आजच्या लेखामध्ये आपण देवमाशासोबतच डॉल्फिन आणि पॉर्पाईजचीदेखील माहिती करून घेऊ  या. देवमासा, डॉल्फिन आणि पॉर्पाईज या तिघांना मिळून कॅटेसिअन्स किंवा जलचर सस्तन प्राणी असं संबोधतात. भारतात २५ विविध प्रकारचे जलचर सस्तन प्राणी आहेत.

देवमाशांना बरेच लोक ‘मासा’ समजतात, मात्र देवमाशांना सस्तन प्राण्यांसारखी फुप्फुसं असतात. माशांच्या प्रजातींमध्ये फुप्फुसं नसून कल्ले असतात. अर्थातच, देवमासे आणि त्यांसोबतच इतर जलचर सस्तन प्राण्यांना श्वसनाकरता पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन हवेमध्ये श्वास घ्यावा लागतो. तुमच्या-माझ्यासारखीच त्यांनाही श्वसनाकरता हवेची गरज भासते. त्यामुळेच ते ९० मिनिटं किंवा दीड तासांपेक्षा अधिक काळ पाण्याखाली बुडी मारून राहू शकत नाहीत.

देवमासे दोन प्रकारचे असतात – दात अर्थात टीथ असलेले आणि तिम्यस्थि किंवा बलीन्स असलेले. दात असलेल्या देवमाशांना त्यांच्या नावाप्रमाणेच तोंडामध्ये दात असतात. हे देवमासे मासे स्क्वीड, ऑक्टोपस आणि खेकडय़ांसारखे प्राणी खातात. मोठे देवमासे जसे की- किलर व्हेल्स, पेंग्विन्स आणि सी लायन्सवर देखील ताव मारतात. दात असलेले व्हेल्स एको-लोकेशन अर्थात आवाजपरावर्तनाच्या आधारे आपला मार्ग शोधतात.

बलीन व्हेल्स किंवा तिम्यस्थि असलेले देवमासे प्रचंड आकाराचे असतात. यांच्या तोंडात दातांऐवजी अतिशय सूक्ष्म केसांच्या, अर्थात तिम्यस्थिंच्या पंक्ती असतात. लहान दात असलेल्या केस विंचरायच्या फणीसारख्या या तिम्यस्थि दिसतात. हे देवमासे तोंडावाटे खूप मोठय़ा प्रमाणावर पाणी आत घेतात. पाण्यासोबतच या देवमाशांचं खाद्य (क्रील, श्रिंप्स आणि छोटे मासे) तोंडामध्ये जातं. त्यानंतर  हे पाणी देवमासे जेव्हा बाहेर फेकतात तेव्हा तिम्यस्थिंमुळे खाद्य गाळलं जाऊन तोंडातच राहतं आणि देवमासे हे अन्न फस्त करतात.

आपल्याप्रमाणेच देवमाशांनाही शरीराचं तापमान उष्ण ठेवावं लागतं. पाण्यामध्ये शरीराचं तापमान राखण्याकरता देवमाशांच्या त्वचेखाली ब्लबर म्हणजेच खास प्रकारच्या चरबीचा जाड थर असतो. आपण जसे लोकरीचे कपडे घालून थंडीपासून आपला बचाव करतो, तसंच देवमाशांमध्ये पाण्यामध्येही आपल्या शरीराचं तापमान राखण्याकरता केलेली सोय आहे. देवमाशांच्या काही प्रजाती स्थलांतर करताना काहीही न खाता केवळ या चरबीच्या रूपात साठवलेली ऊर्जाच वापरतात असंही आढळलेलं आहे.

ऋषिकेश चव्हाण rushikesh@wctindia.org

शब्दांकन : श्रीपाद

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या