स्वागत नववर्षांचे!

आई, या वेळी माझे मित्र- मैत्रिणी येणार आहेत ग्रीटिंग घेऊन हॅपी न्यू इयर करायला आपल्याकडे.

gudi padwa
अरे बाळांनो, सण साजरा करताना त्यामागचा अर्थ माहिती पाहिजे आपल्याला, गुढी उंच असते नं!
‘‘मेधा, उद्या दूधवाल्याकडून जास्त दूध घ्यायचं हं! श्रीखंडासाठी विरजण लावायचं आहे नं.. दही बांधायला हवं. उद्यापर्यंत चक्का व्हायला हवा.’’ शांता-आजीनं आईला सांगताना मीनलनं ऐकलं.

‘‘एऽऽ  म्हणजे आता श्रीखंड खायला मिळणार, मज्जाच मज्जा! ए आजी, गुढीपाडव्याची तयारी ना गं?’’ ओंकार उडय़ा मारत आजीला विचारू लागला.

‘हो रे बाळांनो, बरोबर ओळखलंत! पण वस्त्रगाळ श्रीखंड मिटक्या मारत खाण्याआधी मदत करायची आहे आई-बाबांना! राहील न लक्षात?’’ आजीनं ठणकावलं.

‘‘होऽऽ मला माहिती आहे. वॉचमन काकांकडून कडुनिंब काढून आणायचा आहे.’’ ओंकारनं हजेरी लावली.

‘‘आई, मीपण आवरून मंडईत चाललोय. कैरी, फुलं, हार, नारळ घेऊन येतो, अजून काही आणायचंय?’’ बाबांनी आजीला विचारलं.

‘‘अरे अंता, दरवाजाला लावायला तोरण. आंब्याचे डहाळंपण आण हो.’’ आजीनं लेकाला आठवण करून दिली.

‘‘अहोऽ साखरेची माळ, पंचांग आणायला विसरू नका हं!’’ आईनं आठवण केली.

‘‘आजी, या वेळी दारात रांगोळी मी काढणार हं!’’ मीनलनं स्वत:चं काम सांगून टाकलं.

एव्हाना सगळ्या घरात गुढीपाडव्याची तयारी सुरू झाली होती. नव्या वर्षांच्या स्वागताची जय्यत तयारी मुलांनाही तोंडपाठ होती. गुढी उभारून नव्या वर्षांचं स्वागत करायचं हे मुलांच्याही अंगवळणी पडलं होतं.

‘‘आई, या वेळी माझे मित्र- मैत्रिणी येणार आहेत ग्रीटिंग घेऊन हॅपी न्यू इयर करायला आपल्याकडे. माझी आई घरीच श्रीखंड करते असं सांगितलंय मी त्यांना. मी त्या सगळ्यांना श्रीखंड देणार आहे.’’ मीनलनं सांगितलं. तेवढय़ात ‘ए मैने, त्यांना कडुनिंबपण दे खायला.’ असं म्हणत हसत ओंकार चेष्टा करायला लागला.

‘‘आजीऽऽ बघ गं हा कसा चिडवतोय ते!’’ मीनलच्या या तक्रारीवर आजी म्हणाली, ‘‘अगं बरोबरच आहे त्याचं. मित्रांना कडुनिंबपण देऊन त्याचं महत्त्व सांग. कडुनिंब कडू असला तरी औषधी असतो ना तो. डाळ, ओवा, हिंग, कैरी, गूळ आणि कडुनिंब घालून केलेली चटणी आरोग्याला चांगली असते बाळा. गोड, आंबट, कडू, खारट अशा सगळ्या रसांनी युक्त कडुनिंब हाच खरा नैवेद्य असतो. आपल्या प्रत्येक सणासाठी केलेल्या नैवेद्यात आहारशास्त्राचा विचार खूप प्राधान्याने केलाय.’’

‘‘ए आजी, मी खणाचं परकर-पोलकं घालणार. मोत्याचं कानातलं, गळ्यातलंपण घालणार. बाबा, तुम्ही गजरे आणा हं मोगऱ्याचे.’’ मिनलनं फर्मान सोडलं.

‘‘अगं सगळ्यांनीच नवीन कपडे घालून गुढी उभारायची. तुमची टोपी काढून ठेवलीय हं!’’ आई बोलत होती. तेवढय़ात ओंकारनं विचारलं, ‘‘काठीला खण, कडुनिंब, साखरेची माळ, फुलांचा हार बांधायचा आणि वरती गडू उपडा बांधायचा. बरोबर ना आई?’’

गप्पा रंगल्या होत्या तेवढय़ात मिनलच्या मैत्रिणी तिला खेळायला बोलवायला आल्या. शिल्पा, भक्ती आणि तिचा छोटा भाऊ झंप्यापण आला होता. ‘‘या मुलांनो बसाऽऽ म्हणत आजीनं सगळ्यांच्या हातावर चार चार द्राक्षं दिली. झंपूनं दुसरापण हात पुढं केला. आणि आजीनं त्याचा गोड पापा घेतला.

आईनं आता सगळ्यांनाच विचारलं, ‘‘तुम्हाला माहिती आहे का रे? गुढीमध्ये असलेल्या या गोष्टीचा अर्थ काय?’’ सगळ्यांची तोंडं गप्प झाली.

आई म्हणाली, ‘‘अरे बाळांनो, सण साजरा करताना त्यामागचा अर्थ माहिती पाहिजे आपल्याला, गुढी उंच असते नं! तशी आपली ध्येयंसुद्धा नेहमी उंच, मोठी असावीत. औषधी कडुनिंबाशेजारी साखरेची माळ असते. म्हणजे दु:खानंतर सुख येतंच हा सकारात्मक दृष्टिकोन त्यामागे असतो. आणि वस्त्र धाग्या-धाग्यांनी विणलं जातं, तसंच आयुष्यात आपण नाती, माणसं जोडायला हवीत. फुलांचा हार सुगंधी असतो. तसं आपल्या सत्कृत्याचा सुगंध दरवळायला हवा, असं फुलांची माळ सुचविते.’’

‘‘पण काकू, गडू असा पालथा का बांधतात?’’ शिल्पानं विचारलं.

‘‘अगं, आपण अघ्र्य देतो. म्हणजे ओंजळीतलं दुसऱ्याला देतो. आपण नेहमी दुसऱ्याला मदत करावी असा दातृत्वाचा गुण उपडय़ा गडूकडून घ्यायचा.’’ सगळ्यांनी माना हलवल्या.

‘‘बाबांनी दरवाजाला तोरण बांधलं. आंब्याचे डहाळे लावले की मी दारात आणि चौरंगाभोवती रांगोळी काढणार.’’ मीनलनं मैत्रिणींना सांगून टाकलं.

‘‘पण आई, पंचांगाची पूजा का करायची?’’ ओंकारच्या प्रश्नावर आई म्हणाली, ‘‘अरे, पाडवा म्हणजे नवीन वर्षांची सुरुवात! त्या दिवशी अभ्यंगस्नान करून, देवांनासुद्धा पंचामृतासह गरम पाण्याचा अभिषेक करायचा. देवाच्या पूजेबरोबरच पंचांगाचीही पूजा करायची. वर्षभर वेगवेगळ्या महिन्यात  येणारे सण-वार, शुभकार्याचे मुहूर्त पंचांगामुळे आपल्याला कळतात ना! आपल्याला वेळेचं भान देणाऱ्या पंचांगाची म्हणूनच पूजा करायची. वेळेचं महत्त्व ओळखून आपण कामाला लागतो. म्हणून त्या दिवशी पंचांग वाचायचं!’’

‘‘आजी, थर्टीफस्टलापण जोरदार हॅपी न्यू इयर असत नं!’’ मीनलच्या या प्रश्नावर आजी समजुतीच्या स्वरात म्हणाली, ‘‘अगं, ते इंग्रजी वर्ष सुरू होतं, तेव्हा डी. जे.च्या तालावर लोक नाचतात.  पाटर्य़ा करतात, फटाके उडवतात. पण आपल्या संस्कृतीत  नववर्षांचं स्वागत आपण उत्सवाच्या रूपात मंगलमय वातावरणात करतो.’’

‘‘बाबा, नंतर आपण शोभायात्रेलाही जायचं? ए तुम्हीपण येणार नं?’’ मीनलनं मैत्रिणींना विचारलं. तेवढय़ात लेकीच्या प्रश्नावर हसून बाबा म्हणाले, ‘‘होऽऽऽ जायचं तर! अगं विजयपताका नको का मिरवायला? पारंपरिक वेशभूषेत, ढोल – ताशांच्या  गजरात आपणही सहभागी व्हायचं. त्यात पारंपरिक देखाव्यांबरोबर नव्या समस्यांवरचे देखावेही असतात. त्यामुळे प्रबोधन तर होतंच, पण सगळे एकत्र जमल्यानंतरचा समूहभावाचा आनंद काही औरच असतो.’’

‘‘झंप्या, तू पण ये हं पाडव्याला आमच्याकडे! साखरेची माळ हवी ना तुला?’’ झंप्यानं हसत मान डोलावली, तेवढय़ात शिल्पा म्हणाली, ‘‘माझी आई श्रीखंडच करणार आहे. पण मला ना कैरीचं पन्हं आणि आंब्याची डाळ खूप आवडते. आई चैत्रागौरीच्या नैवेद्याला करते!’’

‘‘अगं हो, माझी आई दारात चैत्रांगणपण काढते आणि आमच्याकडे चैत्रागौरीचं हळदी- कुंकूपण असतं. गौरीपुढचं शेत, आरास मला फार आवडते.’’भक्ती म्हणाली.

‘‘आजी, माझ्या शाळेतपण सरस्वती पूजन आहे. सोमवारी बाईंनी वहीवर सरस्वती काढायला सांगितली आहे.’’

‘‘पण येते का तुला सरस्वती काढायला?’’ असं शिल्पानं विचारल्यावर झंपूनं मुंडी हलवली आणि सगळे जोरात हसायला लागले.

‘‘आजी, मलापण बाईंनी शालिवाहन शकाची माहिती लिहून आणायला सांगितली आहे. प्रार्थनेनंतर वाचून दाखवायची आहे शाळेत.  सांग ना माहिती.’’ ओंकारला गृहपाठाची आठवण झाली.

‘‘अरे बाळांनो, शालिवाहन नावाचा राजा होता. त्याला त्याच्या शत्रूबरोबर म्हणजे शकाबरोबर युद्ध करायचे होते. पण त्याच्याकडे सैन्य नव्हतं, मग त्यानं मातीचं सैन्य  तयार केलं आणि त्यात चैतन्य भरलं. त्या सैन्याकरवी त्याने शकांचा पराभव केला. या विजयाचा  उत्सव करण्यासाठी शालिवाहन शकाची सुरुवात झाली. पण बरं का ओंकार, शालिवाहन राजा जरी जिंकला तरी त्यानं आपल्या शत्रूचं- शकाचं नाव संवत्सराला दिलं हे महत्त्वाचं लक्षात ठेव. शत्रूचाही सन्मान करावा आणि चैतन्य नसलेल्या मरगळलेल्या समाजात चैतन्य निर्माण करावं,असं या गोष्टीतून शिकायला मिळतं.’’

‘‘मैना, आमच्याकडे बाबा नवा ए. सी. आणणार आहेत.’’ झंपूनं तोंड उघडलं.

‘‘अरे, पाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त. म्हणून त्या दिवशी नवी खरेदी करायची.’’ मीनलचे बाबा म्हणाले.

‘‘आपण ओंकारला नवी मोठी सायकल आणू या!’’ – इति बाबा.

‘‘खरंच बाबा!’’ म्हणत ओंकारनं उडीच मारली.

‘‘आमच्याकडे अ‍ॅक्वागार्ड आणणार.’’ भक्ती म्हणाली.

‘‘आणि नंतर आम्ही गावाला जाणार आजीकडे. तिथं रामनवमी, हनुमान जयंती असते आणि गावाची जत्राही असते.’’

‘‘खरं हो! चैत्रपाडव्यानंतर गावोगावच्या जत्रा सुरू होतात. निसर्गातसुद्धा बदल होतो. आता जांभळं, करवंद, कैरी, फणस, रातांबे असा रानमेवा भरपूर येतो. आंब्याला मोहोर येतो, कोकिळ गाऊ लागतो, चाफ्याला भरपूर फुलं येतात.’’ आजी खूश होऊन सांगत होती.

तेवढय़ात हातात गारेगार, लालबुंद कलिंगडाच्या फोडींचं ताट घेऊन येत बाबा म्हणाले, ‘‘चला, घ्या सगळे एकेक फोड. आणि बच्चेकंपनी, सांगा बरं नवीन वर्षांत काय ठरवलाय नवा संकल्प?’’

‘‘मी आजीला रोज पेपर वाचून दाखवणार.’’  मिनल म्हणाली.

‘‘मी रोज शुभंकरोती म्हणणार.’’ झंप्या हात वर करत म्हणाला.

‘‘मी रोज न चुकता खेळणार.’’ ओंकार चेष्टेच्या सुरात म्हणाला. आणि सगळे हसायला लागले.

‘‘मी पाण्याचा वापर जपून करणार.’’ शिल्पा म्हणाली.

‘‘आणि मी माझ्या बागेला जपणार, पाणी घालणार झाडांना. आणि छोटय़ा भांडय़ात पाणी भरून ठेवणार म्हणजे पक्षी आपोआप येतील माझ्या बाल्कनीत.’’ भक्ती म्हणाली.

‘‘अरे व्वा! मुलांनो छान! अरे सणाच्या निमित्ताने आपण एकत्र जमतो. त्याच त्याच रूटीनमधनं वेगळेपणा मिळतो. सगळ्यांनी मिळून गुढी उभी करायची. देवाला जायचं, शोभायात्रेत सहभागी व्हायचं! छान पंक्तीत बसून मस्त पक्वान्नांची मेजवानी असेल.

आणि बरं का मुलांनो, गुढी म्हणजे विजयाची पताका. ती फडकत राहायला हवी. म्हणजे अहंकार, आळस अशा गोष्टींपासून लांब राहायचं आणि सगळ्यांचा आदर करत, प्रामाणिकपणे कष्ट करायचे. रावणाचा वध करून प्रभुरामचंद्र अयोध्येला परत आले. तेव्हा अशाच गुढय़ा उभारून त्यांचं स्वागत केलं प्रजेनं! आपणसुद्धा अशाच उंच ध्येयाचा संकल्प करून त्याच्या पूर्ततेसाठी आनंदाने तयार होऊ या आणि म्हणूया ‘नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!’’

कलिंगडाच्या फोडी मटकावत खूश झालेल्या मुलांना वेध लागले होते श्रीखंडाचे आणि गुढीचे!

मीरा कुलकर्णी meerackulkarni@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Inspirational story for kids welcome to the new year gudi padwa festival