अदिती देवधर
यश, यतीन गणेशच्या गावाहून आल्यापासून इथून ही चौकडी आणि तिकडे गणेश आणि गॅंग अशा ऑनलाइन चर्चा सुरू झाल्या. चारऐवजी नऊ डोकी असल्यानं कल्पना सुचत होत्या. काय केलं तर कचरा कमी होईल याची यादी सुरू होती. कुठल्या गोष्टी परत वापरता येईल, कुठल्या टाळता येतील, कोणाला पर्याय शोधता येईल.
‘‘तुम्ही चौघांनी प्लॅस्टिकचा डबा वापरला नाही तर तेवढा कचरा कमी होईलच; पण जेवढे जास्ती लोक असं करतील, तेवढा बदलही जास्ती आणि निसर्गावर त्याचा चांगला परिणामही जास्ती.’’ यशचा मामेभाऊ सारंग म्हणाला. तो एका प्रवेश-परीक्षेसाठी आला होता, ‘‘एक उदाहरण : आपण पाठय़पुस्तकांना कव्हर घालतो. बऱ्याच वेळा प्लॅस्टिकची कव्हरं घातली जातात. ती नंतर कचऱ्यातच जातात. आमच्या मुख्याध्यापिकांनीच शाळेत नियम केला की, प्लॅस्टिकची कव्हरं घालायची नाहीत. ज्यांनी घातली त्यांना वर्गातच काढायला लावली. त्या वर्षीपासून आणि नंतर कधीच कोणी प्लॅस्टिक कव्हरं घातली नाहीत.’’
‘‘म्हणजे केवढा कचरा कमी झाला.’’ संपदा म्हणाली.
‘‘गणितच करू.’’ सारंगनं पाठकोरा कागद आणि पेन्सिल घेतली, ‘‘तुम्ही शाळेतल्या मुलांना प्लॅस्टिकची कव्हरं घालू नका, असं सांगितलं तर किती जण ऐकतील?’’
‘‘१०-१२?’’ यश म्हणाला.
‘‘१५-२०?’’ नेहानं सुचवलं.
‘‘२० धरू. तुम्हाला ६ विषय म्हणजे प्रत्येकी ६ पुस्तकं. २० जणांनी तुमचं ऐकलं तर (२० ७ ६) म्हणजे १२० प्लॅस्टिकची कव्हरं कमी झाली. तेवढं प्लॅस्टिक पर्यावरणात कचरा म्हणून जाणार नाही. आमच्या मुख्याध्यापिकांनी नियमच केल्यामुळे सगळय़ांना ऐकावंच लागलं.
प्रत्येक इयत्तेच्या २ तुकडय़ा म्हणजे १० ७ २ = २० वर्ग.
प्रत्येक वर्गात ४० मुले, म्हणजे २० ७ ४० म्हणजे एकूण ८०० विद्यार्थी.
दरवर्षी ८०० विद्यार्थ्यांची प्रत्येकी ६ प्लॅस्टिकची कव्हरं कचऱ्यात जात होती. ८०० ७ ६ म्हणजे ४८००.
म्हणजेच ४८०० कव्हरांना लागणारं प्लॅस्टिक आता वापरलं जात नाही आणि कचऱ्यात जात नाही.’’ सारंग गणित पूर्ण करत म्हणाला.
‘‘भारी!!!’’ यश चीत्कारला.
‘‘नियमच केल्यानं नवीन विद्यार्थी येतील तेही आपोआप हे पाळतील.’’ संपदा म्हणाली.
‘‘बरोब्बर!!’’ यतीन म्हणाला.
‘‘यंत्रणेत काहीही बदल केला तरी परिणाम होणारच आहे; पण प्रत्येक यंत्रणेत अशा जागा असतात जेथे बदल केला तर जास्त परिणाम होतो. त्याला लिव्हरेज पॉइंट म्हणतात. शाळेच्या बाबतीत मुख्याध्यापक लिव्हरेज पॉइंट आहेत.’’ सारंग म्हणाला, ‘‘जनजागृती महत्त्वाची आहे. ज्यामुळे जास्त बदल होणार आहे असं लिव्हरेज पॉइंट्स शोधून काम करणंही गरजेचं आहे.’’
‘‘मुख्याध्यापक ऐकतील?’’ नेहानं सगळय़ांच्याच मनात असलेली शंका बोलून दाखवली.
‘‘आपण केलं तसं गणित दाखवा. तुमचं म्हणणं मुद्देसूद मांडा. यात मदत लागली तर मी आहेच.’’ सारंग म्हणाला.
‘‘दादा, मला आणखी एक लिव्हरेज पॉइंट सापडला.’’ ऑनलाइन चर्चेत सामील झालेला गणेश म्हणाला. तो इतका खूश झाला होता की, आता लॅपटॉपमधून बाहेर येतो की काय असं वाटत होतं.
गणेशला काय सापडलं होतं? पुढच्या आठवडय़ात बोलू.
aditideodhar2017@gmail.com