प्राची मोकाशी mokashiprachi@gmail. com

दुपारी मिनू हातात दोन लहान कंदील घेऊन बाल्कनीमध्ये आली. मागोमाग तिचे बाबा एक मोठा कंदील घेऊन आले. दोघांनी मिळून कंदील लावले. इतर तयारी करायला बाबा घरात गेले. मिनू तिथेच रेंगाळली. ती बराच वेळ सगळ्या बाजूने कंदील न्याहाळत होती. एवढय़ात बाबांनी बोलावलं म्हणून ती आत पळाली.

‘‘शुभ दीपावली!’’

हे कोण बोलतंय म्हणून पाहण्याकरता नुकताच लागलेला मिनूचा मोठा कंदील इकडे तिकडे पाहू लागला. समोरच्या बाल्कनीतला कंदील हे बोलत असल्याचं त्याला दिसलं.

‘‘सेम टू यू!’’ मिनूचा कंदील उत्तरला.

‘‘काय मस्त दिसतोयेस. हिरवे त्रिकोण, लाल चौकोन.. आठ चौकोनांचा पारंपरिक चौरस कंदील! पिवळ्या करंज्या आणि शेपटय़ा, सोनेरी बॉर्डर्स, करंज्यांवर सोनेरी टिकल्या, सोनेरी नक्षी अन् रंगीत गोंडय़ांनी छान सजवलंय तुला.’’

‘‘थोडा भडक नाही वाटत?’’ मिनूचा कंदील समोरच्या काचेच्या खिडकीत स्वत:ला न्याहाळत म्हणाला.

‘‘नाही रे! क्यूट आहेस.’’

‘‘आमच्या मिनूची कृपा! तिला शाळेत ओरीगामीचे लहान आकाराचे चौरस कंदील बनवायला शिकवले. बघ नं, माझ्या दोन्ही बाजूला तिने बनवलेले निळे छोटे कंदील लावलेत. तिने बाबांकडे मग हट्टच धरला की यंदा चौरस कंदीलच हवा. त्यामुळे माझा नंबर लागला. दरवर्षी तिचा बाबा वेगवेगळ्या आकारांचे कंदील बनवतो. आर्टिस्ट आहे ना तो!’’

‘‘बरोबर आहे. गेल्या वर्षी चांदणी होती इथे.’’

‘‘तुला रे काय माहीत?’’

‘‘दोन वर्षांपासून मी इथेच तर आहे लटकलेला! तेव्हापासून हे घर बंदच आहे.’’

‘‘हो रे! अगदी रया गेलीये तुझी. किती छान गोलाकार असशील तू तेव्हा! खरं तर तूही माझ्यासारखाच पारंपरिक कंदील! दोन पुठ्ठय़ांचे दोन गोल करून त्यांना पुठ्ठय़ाच्या उभ्या पट्टय़ांनी सांधायचं. मग करंज्या आणि शेपटय़ा बनवून लावायच्या. झटपट होणारा एकदम सोप्पा कंदील. माझ्यासारखी भूमितीची कटकट नाही.’’

‘‘मला तेव्हा केशरी करंज्या आणि गुलाबी पट्टय़ा होत्या. या घरच्यांनी मला एका दुकानातून आणलं. झोपडवस्तीमधील दोघा गरजू भावा-बहिणींनी मला बनवलं. जाता जाता मला समजलं की, माझ्यासारख्याच अनेक कंदिलांच्या विक्रीतून त्या मुलीच्या कुठल्याशा क्लासचे पैसे साठवले दोघांनी मिळून.’’

‘‘ही खरी जिद्द! इच्छा असेल तर मार्ग सापडतोच.’’

‘‘पण माझा रंग आता पार उडालाय. शेपटय़ाही फाटल्याहेत. या खिडकी आणि ग्रीलमधल्या जागेत चेपून गेलोय. मित्रा, तुमच्यापेक्षा दोन पावसाळे अधिक पाहिलेत मी.’’ गोल कंदील उसासा देत म्हणाला.

‘‘खरंच. तू आपल्यातला सीनियर. नाहीतर वसुबारसेला लागलेले आपण जास्तीत जास्त त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत शोभतो बाल्कनीत. नंतर आपली रवानगी एक तर माळ्यावर तरी होते किंवा कचरापेटीत.’’

‘‘तोपर्यंत कसले फिके होतो आपण.’’

‘‘सूर्यदेव आणि बल्बदेवाची कृपा!’’

‘‘मी तर चक्क पांढरा पडलोय.’’

‘‘यंदा घरात काही हालचाल?’’

‘‘आर्यभटाचा शून्य.’’

‘‘त्यांची का बुवा एकदम आठवण?’’

‘‘कारण हे घर एका गणितज्ञाचं आहे. ते अमेरिकेला गेल्यापासून बंद आहे. त्यांची गंमत सांगू? त्यांना विषम आकडे आवडायचे. त्यांनी मला विकत घेताना माझा रंग वगैरे नाही पाहिला. माझ्या करंज्यांची बेरीज विषम आहे का, ते मोजलं.’’

‘‘हे काहीतरी भलतंच.’’

‘‘कुणाकुणाच्या असतात एक एक लहरी.’’

‘‘आमची मिनू फार गोड आहे. घरचेही. तिला चौरस कंदील हवा म्हणून तिच्या बाबाने खास कुठून बांबू शोधून आणले. त्याच्या काठय़ा तासून त्यांनी मला बनवलं. इतकी मेहनत घेतलीये म्हणजे बहुतेक मी यांच्याकडे काही काळ तरी राहीन अशी आशा आहे. दिवाळी आली की दरवर्षी फक्त वस्त्रं तेवढी बदलायची.’’

‘‘वा! काय डायलॉग आहे!’’

एवढय़ात चाहूल लागली म्हणून दोघे कंदील गप्प झाले. मिनू आणि तिच्या बाबांनी कंदिलाभोवती माळ लावली. ती ‘टेस्ट’ करण्यात दोघांचा बराच वेळ गेला. शेवटी दिवेलागणीला मिनूच्या कंदिलाचे दिवे लागले आणि तो अजूनच उठून दिसू लागला.

सीनियर गोल कंदील काहीतरी ‘कॉमेंट’ करेल म्हणून चौरस कंदील समोर पाहू लागला. पण तिथे तो नव्हता. खिडकी मात्र उघडी होती.

‘‘अरेच्च्या! गोल कंदील गेला कुठे?’’  कंदील स्वत:शीच पुटपुटत इथे तिथे पाहू लागला. बराच वेळ वाट पाहून तो कंटाळला. मंद वाऱ्याच्या झुळकीवर त्याला डुलकी लागली.

थोडय़ाच वेळात कुणीतरी ‘शुकशुक’ केलं.  कंदिलाने दचकून त्या दिशेने पाहिलं. समोरच्या बाल्कनीत फाटलेल्या कंदिलाच्या जागी आता नवा गोल कंदील लागला होता. अखंड पांढरा. आडव्या सोनेरी पट्टय़ांमुळे कंदील रेखीव दिसत होता. त्यात करंज्यांवर लावलेल्या सोनेरी टिकल्यांनी रंगत आणली होती.

‘‘कसला भारी दिसतो आहेस.’’ यावेळी चौरस कंदिलाची ‘कमेंट’!

‘‘नवी वस्त्रं बदलून आलोय!’’ गोल कंदील हसत म्हणाला. टाळ्या देण्यासाठी दोघांनी त्यांच्या शेपटय़ा पुढे केल्या खऱ्या, पण अंतर थोडं जास्त असल्याने त्यांना लांबूनच ‘हाय-फाइव्ह’ द्यावं लागलं. इतक्यात गोल कंदिलाचा दिवा घरातून कुणीतरी लावला आणि तोही उजळून निघाला.

‘‘तुमचे गणितज्ञ आलेले दिसताहेत.’’  कंदील म्हणाला.

‘‘अंहं! त्यांच्या कॉलेजमधले संस्कृत प्रोफेसर- त्यांचे मित्र काही दिवस राहायला आलेत. त्यांच्याच दोन मुलींनी मिळून मला झटपट पुन्हा नवा बनवला.’’

‘‘अत्युत्तम! पण तुझ्या आडव्या सोनेरी पट्टय़ांवर लाल स्टिकरने काहीतरी लिहिलंय. वरच्या पट्टीवर ‘शुभ दीपावली’ आणि खालच्या पट्टीवर काये.. त.म.सोमा? म्हणजे रे काय?’’

‘‘तमसो मा ज्योतिर्गमय.. अंधारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग उजळू दे.. प्रोफेसर त्यांच्या मुलींना अर्थ समजावताना मी ऐकलं.’’

‘‘आधी गणितज्ञ.. आता संस्कृत पंडित. तुमचा शैक्षणिक मार्ग छानच उजळतोय गुरूजी.’’

‘‘हो ना! तसाच ज्याचा त्याचा आवश्यक मार्गही उजळू दे, हीच या दीपावलीची सदिच्छा.’’

‘‘तथास्तु!’’ इतक्यात मिनू बाल्कनीमध्ये पणत्या ठेवायला आली. दोघे कंदील पुन्हा गप्प झाले. इतर घरांमध्ये लागलेल्या त्यांच्या विविध रंगांच्या आणि आकारांच्या मित्रांना ते आनंदाने न्याहाळू लागले. असंख्य कंदिलांच्या प्रकाशाने सारा परिसर उजळून निघाला होता.