उन्हाळ्यात  गरमागरम चहा प्यायल्याने शरीर थंड का होते?
उन्हाळ्यात शरीराची दाहकता कमी करण्यासाठी शीतपेये पिण्यापेक्षा चहाचे काही घोट घ्या, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे. कडक उन्हाळ्यात चहा पिण्याचा सल्ला वरकरणी विसंगत वाटत असला तरी शरीरविज्ञानाचा विचार करता तो योग्यच आहे. गरमागरम चहा प्यायल्याने शरीराला विशेषत: चेहऱ्याला काही प्रमाणात का होईना घाम फुटतो. या घामावाटे शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर फेकली जाऊन शरीर सामान्य तापमानाला येते व तापमानातील या बदलामुळे हवेच्या झुळकीसारख्या थंडाव्याची जाणीव शरीराला होते. चहा योग्य व कमी प्रमाणात प्यायल्यास शरीराला त्याचा फायदा होतो. त्याचा अतिरेक केल्यास मात्र फायद्याच्या कित्येक पटीने आरोग्याची हानीच होते, असा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे.

वजनाच्या काटय़ावर उभे राहिल्यास काटा का थरथरतो?
वजन करताना स्थिर उभे राहा, असे सांगण्यात येते. आपले नेमके वजन समजावे यासाठी हे आवश्यक असते. पण वजनाचा काटा सूक्ष्म फरक दाखवणारा असेल तर असा फरक हमखास दिसतो. वजन करायला उभे राहिले असताना वजन दर्शवणाऱ्या सुईची वरच्या दिशेने होणारी थरथर ही नाडीच्या ठोक्याशी जुळणारी असते. हा फरक समजून घेण्यासाठी न्यूटनचे गतीविषयीचे नियम नजरेसमोर आणावे लागतील. प्रत्येक बदलाच्या विरुद्ध दिशेने तेवढेच बल कार्यरत असते.  इथे हृदयाच्या झडपेतून बाहेर पडणारे रक्त दाब देत असते. जोराने बाहेर पडणाऱ्या रक्तामुळे सुई किंचित थरथरते. हृदयाच्या झडपेच्या उघडमिट होण्याच्या क्रियेत रक्त एक तर बाहेर फेकले जात असते किंवा हृदयात शिरत असते. ही हालचाल सुईच्या थरथरण्यात दिसून येते.