scorecardresearch

Premium

बालमैफल : फिशू आणि गणू

‘‘तो प्राणी.. तो प्राणी.. मला खाणार..’’ त्याच्या तोंडून एवढेच शब्द फुटत होते. त्याच्या आईनं त्याला शांत करून सांगितलं, ‘‘मी असेपर्यंत कुणी खाणार नाही माझ्या फिशूला.

interesting fish and lord ganesha story
(संग्रहित छायाचित्र)

विशाल पोतदार

एका मोठ्ठाल्या समुद्रात फिशू नावाचा इवलासा मासा त्याच्या आईबाबांसोबत राहायचा. त्याचं शरीर अगदी छोटंसं आणि सुळसुळीत असल्यानं सर्रकन पळायचा. त्यांच्या कुटुंबातील सगळेच मासे पिवळय़ा धम्मक रंगाचे होते. त्याच्या टपोऱ्या डोळय़ांमुळे तर तो भलताच गोड दिसायचा.

atmapomplet
गोष्ट छोटी डोंगराएवढी..
showed the horoscope and asked how to convince an angry girlfriend they made jyotish unconscious and took away all the belongings from the house in kanpur
“रागावलेल्या प्रेयसीची समजूत काढण्याचा मार्ग सांगा” कुंडली दाखवण्याच्या बहाण्याने आले अन् ज्योतिषालाच लुटून गेले
actor shashank ketkar share feeling about ganpati bappa
चराचरांत गणपती असतो – शशांक केतकर
Men Tie Rope Around Monkey’s Neck
अत्याचाराचा कळस! माकडाच्या गळ्यात दोरी बांधून जीव जाईपर्यंत नेलं फरपटत, VIRAL व्हिडीओ पाहताच संतापले लोक

एकदा तो असाच एकटा मजेत फिरत फिरत त्यांच्या घरापासून थोडय़ा लांबच्या पाण्यात आला. तो वाकडी तिकडी वळणं घेत सुरक्या मारत तळाशी काहीतरी खाणं शोधू लागला. त्याला खायला काहीतरी सापडलंच, इतक्यात त्याला वरून आपल्या अंगावर काहीतरी वेगानं येत असलेलं दिसलं. ती गोष्ट त्याच्या अंगावर पडणारच होती इतक्यात तो बाजूला निसटला. त्याच्या बाबांपेक्षाही खूप मोठी असलेली गोष्ट तळात येऊन विसावली. घाबरून भंबेरी उडालेला फिशू आता थोडा सावरला. तो एखादा प्राणी असला तर आपल्याला गट्टम करेल असं त्याला मनात वाटतच होतं. परंतु अशा घाबरून सोडणाऱ्या गोष्टीच त्याला नेहमी खेचत असत. त्यानं धाडसानं हळूहळू त्या गोष्टीजवळ जाण्याचा प्रयत्न केला. पाहतो तो तर एक प्राणीच होता, पण तो हलतही नव्हता. झोपल्यासारखा वाटत होता. फिशूचं निरीक्षण सुरू झालं. त्या प्राण्याच्या तोंडातून एक मोठा पाइप निघाला होता. कान अगदी मोठाल्या माशांच्या कल्ल्यांसारखे दिसत होते. त्याचं मोठालं पोट पाहून वाटलं की, यानं येताना किती गडबडीत जेवण संपवलं असेल! इतक्यात फिशूला त्या प्राण्याच्या हातात एक गोल असा पदार्थ दिसला. खाण्यायोग्य काही दिसलं रे दिसलं की फिशूच्या तोंडाला पाणी सुटलंच म्हणून समजा. फिशू लगेचच तो पदार्थ खाण्यास सुरुवात करणार तोच त्याला आवाज आला- ‘‘माझा मोदक खाऊ नकोस..’’

हेही वाचा >>> बालमैफल: बिनायाका-तेन

मघापासून मज्जा करत असलेला फिशू जरा घाबरलाच! त्यानं भीत भीत मागं वळून पाहिलं तर तो प्राणी आपल्या अवयवाचा एक भाग सापासारखा हलवत होता. कान कल्ल्यांसारखे पाण्याशी खेळत होते. आता मात्र फिशूला आपण संकटात सापडलो आहोत याची जाणीव झाली. त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू येतील एवढं त्याला धडधडत होतं. फिशूनं असेल नसेल तेवढे त्राण कल्ल्यात आणून आपल्या घराकडे धूम ठोकली. आणि मागून आवाज येऊ लागला- ‘‘अरे थांब.. अरे थांब.. पळू नकोस.’’

फिशू सुळसुळ करत पळत होता आणि तो प्राणी धाडधाड करत त्याचा पाठलाग करत होता. फिशूला अजून एक ची-ची करत पाठलाग करणारा छोटासा शेपटीवाला जीव त्या प्राण्यासोबत दिसला.

फिशूला वाटलं, आता आपण संपलो. तरी आपल्याला आई किती बजावत असते की, इथेच खेळत जा. आता आपण मरणार. त्याला रडू येत होतं. त्याचे ते टपोरे डोळे इवलेसे झाले होते. आता फिशूनं आपला वेग दुप्पट केला. एक खुणेचा दगड गेल्यावर त्याला घर जवळ आल्याची जाणीव झाली आणि त्याला आनंद झाला. आता घरात शिरणार इतक्यात तो प्राणीही जवळ येऊ लागल्याचं जाणवलं.

‘‘अरे माशा थांब.. थांब..’’ पण फिशू थोडीच थांबणार होता. तो पटकन् घरात शिरला. त्याला आता चांगलीच धाप लागली होती. समोर आईला पाहताच मात्र त्याला रडू कोसळलं.

‘‘तो प्राणी.. तो प्राणी.. मला खाणार..’’ त्याच्या तोंडून एवढेच शब्द फुटत होते. त्याच्या आईनं त्याला शांत करून सांगितलं, ‘‘मी असेपर्यंत कुणी खाणार नाही माझ्या फिशूला. अरे पण कसला प्राणी? कसा दिसतो तो?’’

हेही वाचा >>> बालमैफल: पृथ्वीचं सरप्राइझ

फिशूनं घाबरत घाबरतच त्याचं वर्णन केलं आणि त्याला आश्चर्य वाटलं की आईच्या चेहऱ्यावर हसू येऊ लागलं होतं.

‘‘अरे, गणू असेल तो.. त्याला काय घाबरायचं? त्याला तर आपल्या घरी बोलवायचं.’’

आता फिशूचं डोकं चालत नव्हतं. आपली आई अशी काय बडबडतेय काही कळत नव्हतं. आईनं त्याला सोबत घेतलं. म्हणाली, ‘‘चल सांगते.’’ ते घराबाहेर आले तर गणू दमून मोठाले श्वास घेत बसला होता. त्याच्या पोटावर उंदीरमामा गुदगुल्या करत होता आणि हा प्राणी मधूनच हसत होता.

‘‘गणू, ये रे.. बाहेरच काय थांबलास असा.’’

‘‘अगं ते पिल्लू घाबरलं ना बिचारं. त्याला मी घाबरवलं मुद्दाम. हा हा हा..’’

आता फिशू आईकडे पाहत म्हणाला, ‘‘सांग आता व्यवस्थित सगळं कोण आहे हा.’’

‘‘अरे हा श्री गणेश! आपण प्रेमानं याला गणू म्हणतो. गणेशोत्सवात जमिनीवरचे लोक याची पूजा करतात आणि त्याचं पाण्यात विसर्जन करतात. मग हा मस्त पोहत पोहत आपल्याकडे येतो तळाशी. तो आहे तोपर्यंत याच्यासोबत मस्त खेळून घे. डान्स शिकून घे. आनंदी राहायला शिक. खूप काही येतं बरं का याला.’’

हेही वाचा >>> बालमैफल : कॅस्परची भक्ती

‘‘आहे तोपर्यंत म्हणजे? तो कुठे जाणार आता?’’ आईच्या चेहऱ्यावरचे अस्वस्थ भाव फिशूनं अचूक ओळखले.

‘‘अरे.. यालाही आपल्या आईकडे जायचं असतं ना रे. हळूहळू काही दिवसात पाण्यात विरघळत तो दिसेनासा होतो. आपल्याला आवडत्या गोष्टी कायमच आपल्याकडे नाही राहू शकत फिशू. आहे तोपर्यंत त्याच्याशी खेळ, बागड बरं?’’

फिशूची भीती आता निघून गेली होती. त्यानं हळूहळू जवळ येत गणूच्या हातातील मोदकावर डल्ला मारायला सुरुवात केली. आणि गणोबा छानसा हसत त्याला सोंडेनं गोंजारू लागला.

vishal6245@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Interesting fish and lord ganesha story for kids zws

First published on: 24-09-2023 at 01:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×