scorecardresearch

बालमैफल : चिंकू आणि चांदोमामा

आईने प्रश्नांचा चेंडू बाबांकडे वळवला आणि म्हणाली, ‘‘नेहमी म्हणतोस ना माझी मुलगी अगदी चौकस बुद्धीची आहे.

बालमैफल : चिंकू आणि चांदोमामा

विशाल पोतदार

एक होती चौकस बुद्धीची छोटीशी चिंकू. तिच्या आईला ती ‘हे कसं, ते कसं?’, ‘असेच का, तसेच का?’ असे नाना प्रश्न विचारून भंडावून सोडायची. आईला मात्र चिंकूच्या प्रश्नांची उत्तरे देऊन इतके नाकीनऊ यायचे की ती सरळ चिंकूला गप्प बसायला सांगायची.

एकदा जेवल्यानंतर चिंकू आईबाबांसोबत अंगणात शतपावली करत होती. रात्रीचा थंडगार वारा येऊन चिंकूला गुदगुल्या करत होता. चिंकू मजेत पाय झोकातच टाकत चालली होती. अचानक तिची नजर चंद्राकडे गेली. चंद्राची कोर कापलेल्या नखासारखी अगदी नाजूक दिसत होती. तिच्या मनात आले, देवानेच तर आपले नख कापून टाकले नसेल? इतक्यात आईकरिता तिचा प्रश्न तयार झालाच.

‘‘आई, इतक्या रात्रीही चंद्र असा कसा गं पांढरा शुभ्र दिसतो? त्यावर लाइट लावलीय का गं? तिथे कोण राहते नक्की?’’

आईने प्रश्नांचा चेंडू बाबांकडे वळवला आणि म्हणाली, ‘‘नेहमी म्हणतोस ना माझी मुलगी अगदी चौकस बुद्धीची आहे. दे आता उत्तर.. चिंकू, बाबा सांगेल हा तुला..’’ आईच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होते.

चिंकूच्या बाबाने ते चॅलेंज स्वीकारले आणि तिला तो कडेवर घेऊन समजावू लागला.

‘‘हे बघ चिंकू.. त्या चंद्रावर ना सूर्याची किरणे येतात. आपल्याकडे कसे दिवसा सूर्यप्रकाश असतो, अगदी तस्सं.. म्हणून आपल्याला इथे तो चमकल्यासारखा वाटतो. आणि तिथे कोण राहत नाही बरं का. पण काही माहीत बुवा असेल कुणीतरी भूत वगैरे.’’ भुताचे नाव घेऊन बाबा तिला भीती दाखवू लागला.

‘‘जा बाबा.. काहीही सांगतोस तू. मग सूर्यकिरणे येताना कुठे दिसतात? चंद्राच्या आसपासही दिसले असते ना ऊन. आणि भूतबित काही नसते. मला आजी म्हटली होती तुझा बाबाच एक बकासुर आहे.’’ चिंकू खी खी हसू लागली. बाबाने तिला चिडल्यासारखे करून खाली ठेवले.

‘‘आजी, नात काय-काय नावे ठेवत असता गं मला. चला, आजचे आइस्क्रीम कॅन्सल बरं का. मी बकासुर ना. मग मीच खाणार आइस्क्रीम.’’

तरी चिंकूने बाबाला गळ घालून घालून दोन आइस्क्रीम मिळवले. आइस्क्रीममुळे पोट अगदी गारेगार झाले आणि स्वारी झोपायला गेली.. 

.. एका जत्रेत मोठे जिम्पग जपांगवाले खेळणे होते. त्यामध्ये एक ताणून बांधलेला रबर होता. त्यावर उडी मारेल तसे ती व्यक्ती आणखी उंच जायची. पुढच्या उडीला आणखी वर.. आणखी वर.. असे करत करत तिची उडी डायरेक्ट चंद्रापर्यंत गेली की हो. आणि तिला चंद्र चक्क हसताना दिसला. त्याने तिला तळहातावर उभे केले आणि तिच्याशी बोलू लागला. त्याचा आवाज अगदी गोल गुबरा होता.

‘‘बोला चिंकूराणी काय म्हणताय? आमच्याविषयी काय प्रश्न आहेत तर तुमचे?’’

‘‘तू चंद्र आहेस? पण तू तर काल अगदी नाजूक दिसत होतास. आणि तू चमकतोस तरी कसा काय रे? तुझे आईबाबा कुठे आहेत? आणि हो, तुला आम्ही चंदामामा म्हणतो मग तू आमच्या आयांचा भाऊ आहेस?’’

‘‘हो तर.. भाऊच म्हण ना.. अगं पण एवढे सारे प्रश्न मला करोडो वर्षांच्या अख्ख्या आयुष्यात कुणी विचारले नाहीत गं. प्रश्न विचारताना जरा श्वास घेत जा. थांब आता.. एकेक उत्तर देतो.’’

मग चंद्राने तिला उचलून आपल्या जमिनीवर ठेवले. एका बाजूला उंचच उंच डोंगर आणि एकीकडे सपाट असे मैदानच दिसत होते. चिंकू लगेच तिकडे हुदुडय़ा मारायला लागली. तिथे  उडी मारली तर ती त्या जिम्पग जपांगसारखी उंच जात होती. चिंकूच्या नाजूक पावलांनी चंद्र कसा अगदी मोहरून गेला.

‘‘अगं चिंकू, हळू उडय़ा मार. तुला काही लागले बिगले तर तुझी आई मला रागवायची.’’

‘‘नाही रे. इथे खेळू दे मला भरपूर. इथे तर आईपण नाही मला रागवायला. पण इथे कुणी राहत नाही का रे मामा? आणि मामी पण दिसत नाही?’’

‘‘नाही.. थांब बरे आता.’’

‘‘बरं बाबा. थांबते. थांबते. तशीही आता मी खूप दमलेय.’’

चंद्र तिला आकाशाकडे बोट दाखवत म्हणाला, ‘‘हे बघ तो निळा बॉल दिसतोय का आकाशात? ती तुमची पृथ्वी. इथून तुझं घरही दिसणार नाही बरं का? तर मी स्वत:भोवती आणि पृथ्वीताई भोवती गर्रगर्र गर्रगर्र फिरत असतो.’’ ते ऐकून चिंकूला हसूच फुटले.

‘‘अरे मग तुला चक्कर येत नाही का?’’

‘‘नाही गं येत. मला सवय झालीये आता. आणि हे बघ आता त्या तिकडे ऊनही दिसतेय ना? अगदी तुमच्यासारखेच माझ्यावरही सूर्यदादाचे ऊन पडते. आणि मग तेच तुला पृथ्वीवरून लाइट असल्यासारखे वाटते.’’

‘‘हो? आणि तू लहानमोठा कसा होतोस रे. कधीकधी तर गायबच होतोस की. आई त्या दिवसाला आमावास्या म्हणते.’’

‘‘अगं मी सदैव फिरत असल्याने माझा उन्हं असलेला भाग थोडा किंवा जास्त दिसतो एवढेच. मी आणि पृथ्वीताई लपाछपी खेळतो असे म्हण ना! बरं चला आता चिंकू मॅडम, तुमच्या आईसाहेब आता वाट पाहत असतील ना. नाहीतर फटके पडतील.’’

‘‘थांबू दे ना रे. इथे उडय़ा मारायला किती मज्जा वाटतेय.’’

‘‘अरे हो. हे सांगायचे राहिलेच की, माझ्याकडे असणारे गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीताईपेक्षा कमी असते म्हणून इकडे तुला वजनही कमी वाटते. तुझे वजन किती आहे सांग.’’

‘‘अं.. माझे वजन २४ किलो.’’

‘‘मग तुझे वजन माझ्या जमिनीवर फक्त ४ किलो असणार. आहे की नाही मज्जा!’’

‘‘कित्ती गोड आहेस रे मामा तू. अरे पण आता मी परत रे कशी जाणार? इतक्या लांब आहे घर माझे.’’

आता चिंकू थोडी चिंताग्रस्त दिसू लागली. चंद्राने आपले हात पसरले. ते लांबत लांबत अगदी चिंकूच्या घराच्या गॅलरीपर्यंत नेले.

‘‘चला.. आता मस्त माझ्या हातावरून घसरगुंडी करत जायचे.’’

‘‘हे.. हे.. हे. एवढी मोठ्ठी घसरगुंडी? मज्जाच मज्जा.’’

‘‘मी मिस करेन गं तुला चिंकूताई.’’

‘‘मीही मिस करेन मामा तुला. जेव्हा मला तुझ्याकडे यायचे असेल ना तेव्हा तू असेच हात माझ्या गॅलरीपर्यंत आण. म्हणजे मी त्यावर बसून तुझ्याकडे येईन.’’

एवढे बोलून चिंकू त्या हातावर घसरत वेगाने खाली निघाली आणि काही क्षणातच गॅलरीपर्यंत आलीदेखील. आणि इतक्यात ती स्वप्नातून जागी होऊन बेडवरून खाली पडली.

‘‘चिंके.. रविवार आहे म्हणून किती वेळ झोपायचे आणि बेडवरून खाली पडलीस की!’’  बाबाने हसत विचारले.

‘‘.. तर हे स्वप्न होते?’’ चिंकू विचारात पडली.

‘‘कसले स्वप्न?’’

‘‘सांगते.. सांगते.. चांदोमामा होता स्वप्नात.. आय लव्ह यू चांदोमामा.’’

चांदोमामाला आठवून चिंकूच्या चेहऱ्यावरचे हास्य काही विरत नव्हते.vishal6245@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या