मेघश्री दळवी

‘‘अरे, खरंच आपण जंगलात जातोय का?’’ तनयने मागे वळून विचारलं.

‘‘हो रे! विश्वासच बसत नाही ना? पण ऐक, काका-काकू म्हणतात तशी तिथे धमाल करायचीय!’’ करण भारी उत्साहात होता.

रिया हसत म्हणाली, ‘‘आणि मी भरपूर फोटो आणि व्हिडीओ घेणार!’’

करणचा प्रसादकाका आणि वीणाकाकी चार वर्षांपासून भीमाशंकरच्या जंगलात संशोधन करत होते. ते नेहमी करणच्या गॅंगला चार दिवस राहायला बोलवायचे. पण तनय आणि रियाच्या घरून परवानगी काही मिळत नव्हती. शेवटी एकदाचा बेत जमला होता.

टीव्ही नाही, ट्रॅफिक नाही की आजूबाजूला खेळणार्या मुलांचा दंगा नाही. प्रसादकाकांच्या घरी एकदम शांत असेल असा करणचा अंदाज होता. पण तिथे पोहोचल्यावर त्याला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. खारींचा चुकचुकाट, पक्ष्यांचे निरनिराळे सूर आणि वार्याच्या आवाजाने आसमंत भरून गेला होता. अधूनमधून हू-हू असा आवाजदेखील ऐकू येत होता.

‘‘बाप रे! हा कोणता आवाज?’’ तनयने विचारलं.

‘‘घुबड,’’ वीणाकाकूने उत्तर दिलं.

‘‘भारीय!’’ करण म्हणाला. ‘‘मला ते घुबड बघायचं आहे. दाखवशील ना काकू?’’

‘‘हो. थोडं खाऊन घ्या आणि काकाबरोबर एक चक्कर मारून या. सगळं पाहायला मिळेल.’’

एकदा फिरून आल्यावर या गॅंगला घरात बसवेना. सतत आपले बाहेर! मातीचा ओलसर वास, सुकलेल्या पानांचा गंध आणि फुलांच्या सड्याचा मंद सुगंध घेऊन मुलं वेडावून गेली होती. रंगीबेरंगी फुलपाखरं आणि झर्रकन उडून जाणारे पक्षी पाहताना त्यांची नजर ठरत नव्हती. पानांची सळसळ आणि कीटकांची किर्रकिर्र ऐकून त्यांचं मन भरत नव्हतं. रात्री कोल्हेकुई, पहाटे मलबार कस्तुर पक्ष्यांची शीळ आणि दिवसभर वेगवेगळे सूर जंगलात घुमत असायचे. त्यातून या भागात आढळणारं शेकरूही दोनदा पाहायला मिळाल्याने तिन्ही मुलं खुशीत होती. छोटी हरणं, माकडं आणि मोर बर्याचदा लांबून दिसले.

प्रसादकाका म्हणाले तशी ही तिघं मुलं पाचही इंद्रियांनी जंगल समजून घेत होती. अगदी पहाटे दवबिंदूंनी सजलेल्या पानाचा स्पर्श गार मुलायम वाटत होता. तर मध्येच वर आलेल्या मुळांना ठेचकाळताना त्यांचा कडकपणा जाणवत होता. काकांनी काही फळं दाखवली- जंगली पेरू, आवळा अशी काही. काजूचं फळ तर मुलांनी पहिल्यांदाच पाहिलं. मग काकांनी करवंदाच्या झाडीत नेलं. तिथून थोडी करवंदं तोडून खायला दिली. त्या तुरट चवीने मुलांची जीभ थोडी चुरचुरली. पण लगेच खाल्लेल्या गोडसर जांभळांनी त्यांना थोडा दिलासा मिळाला.

‘‘तनय, अरे अशी डायरेक्ट झाडावरून तोडून आपण फळं कधीच खात नाही.’’ रिया म्हणाली. ‘‘दहा वेळा धुऊन घेतल्याशिवाय आई देणारच नाही खायला!’’

‘‘बरोबर,’’ तनय हसत म्हणाला, ‘‘रिया तशीच फळं खातेय याचा फोटो मी काढलाय, टाकतो आता इन्स्टावर!’’

‘‘तुझ्या आईचं बरोबर आहे,’’ करणने उत्तर दिलं. ‘‘आपण दुकानातून आणतो त्या फळांवर काही रसायनं असू शकतात. शिवाय गोदामात साठवून ठेवताना त्यांच्यावर धूळ, कचरा, काय काय बसत असेल. इथली गोष्ट वेगळी आहे.’’

तेवढ्यात एक मोठा पक्षी पंख फडफडवत उडून गेला. वर बघताना आदल्या रात्री पाहिलेलं आकाश सर्वांच्या डोळ्यासमोर आलं. ते चांदण्यांनी कसं खचाखच भरलं होतं, त्याची आठवण निघाली.

‘‘अरे, काजवे बघाल तर आणखी खूश व्हाल.’’ प्रसादकाका म्हणाला. ‘‘पण त्यासाठी तुम्हाला पावसाळ्यात यावं लागेल. रात्री ते इतके सुंदर चमचमत असतात की आकाशातल्या चांदण्या त्यांच्यापुढे फिक्या पडतील!’’

रात्री जेवत असताना मध्येच घुबडाचा हू-हू आवाज पुन्हा आला. तसा तनय म्हणाला, ‘‘काका, घुबड आपल्याला त्रास देतात का?’’

प्रसादकाकांनी हसत सांगितलं, ‘‘नाही रे, आपण त्यांच्या जगात आलोय, म्हणून ते फक्त आपल्याकडे बघतात. त्यांचे डोळे मोठे दिसतात म्हणून तुम्ही घाबरता. पण घुबडं फक्त निरीक्षण करत असतात. बाकी काही नाही.’’

वीणाकाकी म्हणाली, ‘‘जंगलातील प्राणी माणसांना टाळतात. पण आपल्याला ती समज नसल्याने आपल्याला भीती वाटते. जेन गुडाल माहीत आहेत ना? त्या म्हणायच्या, समज आली की भीती कमी होते.’’

भीमाशंकरच्या जंगलातले चार दिवस कसे गेले हे करण, तनय आणि रियाला कळलंच नाही. शहरात परतल्यावरही जंगल त्या सगळ्यांच्या मनात घर करून होतं. पावसाळ्यात रात्री कधी खिडकीतून पतंग आत आला की तनय हसत होता. ‘‘हा तर एक कीटक, त्याला काय घाबरायचं!’’ म्हणत होता.

तिकडे रिया आईबाबांच्या मागे लागून नॅशनल पार्कमध्ये जंगलाचा वास पुन्हा अनुभवत होती. दोनचार फोटो काढल्यावर मोबाइल खिशात ठेवून भटकत होती. आणि करण? चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला तो कान टवकारत होता. शाळेत जाताना दिसणार्या झाडांच्या खडबडीत खोडाला हात लावून बघत होता आणि पुन्हा काकाच्या घरी चांगला महिनाभर मुक्काम ठोकायच्या विचारात गर्क होता.

umeghashri@gmail.com