काऊचं घर मेणाचं!

शोधनिबंध सादरीकरणात तिला प्रथम क्रमांक मिळाला होता.

डॉ. नंदा संतोष हरम nandaharam2012@gmail.com

‘‘आई, देवाला नमस्कार केला, आता तुला करते. बाबा कुठे आहेत?’’ मिताली आईला विचारू लागली. एवढय़ात बाबा आले तिथेच.

‘‘काय बेटा, कसली गडबड?’’

‘‘बाबा, नमस्कार करते,’’ असं म्हणत मिताली वाकली.

आई-बाबा एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघू लागले. दोघेही एकदमच उद्गारले, ‘‘मिताली, आज कसली परीक्षा आहे?’’

मिताली हसत म्हणाली, ‘‘अहो, परीक्षा नाही, स्पर्धा आहे. गोष्ट सांगायची आहे.’’

आईला नवल वाटलं. ‘‘..पण तू काही बोलली नाहीस.’’

‘‘अगं आई, तुझाही अभ्यास चालू होता ना! तुलाही तुझा रिसर्च पेपर सादर करायचा आहे ना. मी विचार केला, बघू स्वत: प्रयत्न करून!’’

‘‘कोणती गोष्ट सांगणार आहेस?’’ बाबा कौतुकाने विचारू लागले. मिताली म्हणाली, ‘‘बाबा, आमच्या मॅडम म्हणाल्या की गोष्टीत काही तरी नवीन कल्पना हवी. त्याच त्या जुन्या गोष्टी नकोत.’’

‘‘मग तू कोणती गोष्ट सांगणार आहेस?’’ आईने उत्सुकतेने विचारलं. एवढय़ात मितालीचं घडय़ाळाकडे लक्ष गेलं. ‘‘आई-बाबा, सॉरी हं! संध्याकाळी सांगते गोष्ट. वेळ झाली माझ्या बसची. मी बक्षीस घेऊन येणार..’’

आई लगेच म्हणाली, ‘‘मिताली, मी तुला काय सांगते नेहमी? विसरलीस!’’

‘‘नाही.. नाही. मी छान गोष्ट सांगेन. खूप आनंद मिळवेन. बक्षीस मिळालं तर आमचं बरं. आई, तुलाही बेस्ट ऑफ लक!’’ मिताली हसत-हसत धावतच घराबाहेर पडली.

संध्याकाळी मितालीची आई खुशीत घरी आली. हातात पुष्पगुच्छ आणि चेहरा आनंदाने फुलला होता. शोधनिबंध सादरीकरणात तिला प्रथम क्रमांक मिळाला होता. दाराची बेल वाजवताच क्षणार्धात मितालीने दरवाजा उघडला. हातात छानशी ट्रॉफी आणि तोंडभर हसू घेऊन मिताली उभी होती. मायलेकी आनंदाने कडकडून भेटल्या. मितालीनेही प्रथम क्रमांक पटकावला होता. आईने विचारलं, ‘‘मिताली, आपला आनंद साजरा करायला हॉटेलमध्ये जायचं की मी बनवू काही घरात?’’

मिताली म्हणाली, ‘‘आई, मस्तपैकी बटाटेवडे बनव. बाबांना आपण आइस्क्रीम आणायला सांगू. चालेल?’’

आई म्हणाली, ‘‘चालेल काय, धावेल. मला तुझ्या गोष्टीची उत्सुकता आहे. मी तयारीला लागते. बाबा आले की पहिली गोष्ट!’’

‘‘हो आई, मलाही सांगायची आहेच तुम्हाला.’’

थोडय़ा वेळाने बाबा आल्यावर परत एकदा कौतुक सोहळा झाला. मग मिताली गोष्ट सांगू लागली.

माझ्या गोष्टीचं नाव आहे – काऊचं घर मेणाचं! हो.. मेणाचं, शेणाचं नाही. आपण अगदी पहिली-दुसरीतली मुलं किती सहजतेनं मोबाइल वापरतो. इतका बदल आपल्यात झाला! तसाच बदल आपल्याभोवती वावरणाऱ्या पशु-पक्ष्यांतही झाला. पाऊस येणार अशी चिन्हं दिसू लागली. चिऊताई काळजीत पडली. ती लगबगीने काऊदादाकडे गेली. त्याला म्हणाली, ‘‘काऊदादा, आपल्याला दोन दिवसांत घरटं बांधायला हवं. तुझ्याकडे काडय़ा, कापूस, शेण आहे ना सगळं?’’

काऊदादा म्हणाला, ‘‘आहे ना! पण चिऊताई, त्याचा काय उपयोग? ते घरटं वाहून जाईल ना पावसात..’’

चिऊताई म्हणाली, ‘‘तू नकोस करू त्याची काळजी. तू सुरुवात कर कामाला, आलेच मी.’’ काऊदादा कोडय़ात पडला. पण त्याचा चिऊताईवर विश्वास होता. तो कामाला लागला. काडय़ा, कापूस, गवत, पानं एकत्र करून घरटय़ाचा सांगाडा तयार करू लागला. थोडय़ा वेळानं चिऊताई आली. तिनं छोटय़ा छोटय़ा पिशव्यांमधून खूप सामान आणलं होतं. पण त्यात काय आहे ते बाहेरून कळत नव्हतं.

चिऊताई म्हणाली, ‘‘काऊदादा, आपण आधी घरटं आतून छान शेणानं सारवून घेऊ.’’ दोघांनी मिळून आत शेणाच्या दोन-तीन थरांनी घरटं लिंपून काढलं. नंतर चिऊताईनं काऊदादाला सांगितलं, ‘‘काऊदादा, मी भरपूर मेण घेऊन आलेय. आता आपण घरटय़ाला बाहेरून मेण लावू.’’ त्यांनी एक थर लावला.

दोघेही काम करून दमले. चिऊताई म्हणाली, ‘‘काऊदादा, उद्या आपण बाहेरून अजून दोन थर लावू.’’

दुसऱ्या दिवशी काम पूर्ण झालं. काऊदादानं चिऊताईला बक्षीस म्हणून भरपूर खाऊ दिला. तिनं केलेल्या मदतीचा मान राखला. खरोखरच चार दिवसांत पाऊस आला. पण या वेळी घरटय़ात बसून काऊदादानं पावसाची मजा अनुभवली. चिमणीनं केलेल्या थोडय़ाशा बदलामुळे काऊदादाला पावसात कुडकुडावं लागलं नाही. अश्शी ही स्मार्ट चिऊताईची गोष्ट.. आवडली का तुम्हाला?

मितालीने इतके हावभाव करत ठसक्यात गोष्ट सांगितली की आई-बाबा क्षणभर तिच्याकडे बघतच राहिले.

‘‘कधी गं एवढी मोठी झालीस?’’ दोघांना अगदी गहिवरून आलं. तिच्या कल्पनाशक्तीचं त्यांना खूप कौतुक वाटलं.

बाबा म्हणाले, ‘‘पिढय़ान् पिढय़ा ही चिऊ-काऊची गोष्ट सांगितली जाते. पण तू छान बदल केलास. व्वा!’’

आई म्हणाली, ‘‘तुम्ही गप्पा मारत बसा. मी स्वयंपाकघरात पळते.’’

बाबा म्हणाले, ‘‘मीही आइस्क्रीम घेऊन येतो. येताना बक्षीस म्हणून गोष्टींचं पुस्तकही आणतो.’’

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Interesting story for kids funny story for kids moral story for kids zws

Next Story
पोटलीबाबा : फ्रेंच मिसळपावची गोष्ट!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी