वारी.. साहित्याची!

नचिकेत घरी अशी भलीमोठ्ठी यादी सांगत होता. सोबत जमलेल्या मित्रमैत्रिणींचीही या यादीत भर पडत होती.

वारी.. साहित्याची!

मीरा कुलकर्णी

‘‘ए आई, माझा मुंजीतला तो पांढरा झब्बा-विजार काढून ठेव गं! आणि आज्जी, तुझी ती जपाची तुळशीची माळही हवीय मला. आणि पणजी आज्जी.. फुलवाती, गेजवस्त्र करताना वापरतेस नं ती विभुतीची गोळी हवीय तुझ्याकडची- कपाळावर लावायला!’’

नचिकेत घरी अशी भलीमोठ्ठी यादी सांगत होता. सोबत जमलेल्या मित्रमैत्रिणींचीही या यादीत भर पडत होती.

‘‘काय, शाळेतल्या दिंडीची तयारी वाटतं?’’ या आईच्या प्रश्नावर ‘‘बरोब्बर!’’ असं नचिकेतचं लगोलग उत्तर आलं.

‘‘आई.. आणि यावेळी मी दिंडीत वीणा घेऊन मधे आहे बरं का!’’ नचिकेत इतका खुशीत होता की काय सांगू आणि काय नको असा आनंद झाला होता त्याला.

‘‘अरे हो, पण फक्त ड्रेसचीच तयारी करायचीय की अजून काही अभंग वगैरे म्हणणार आहेस?’’ आजीनं प्रश्न विचारताच आयतीच संधी मिळाली नचीला.

‘‘अगं आज्जी, मी, केदार, रसिका, ऋजुता, आदिती, नील, राही, सानू, आर्या.. सगळे सगळे आहोत दिंडीमध्ये. आणि शाळेत जोशीबाई सगळी तयारी करून घेणार आहेत.’’

‘‘व्वा! छानच. आषाढी एकादशीच्या या वारीच्या निमित्तानं आपली भक्तिभावना, आध्यात्मिक वृत्ती समूहरूपानं पांडुरंगाच्या चरणी अर्पण करायला वारकरी हजारो मैल पायी चालत टाळ-मृदुंगाचा गजर करतात. कधी विठुनामाचा जयघोष, तर कधी ग्यानबा-तुकारामचा गजर करणारे हे वारकरी म्हणजे आध्यात्मिक लोकशाहीचं प्रतीक आहेत.’’ आई म्हणाली.

इतक्यात- ‘‘अहो मराठीच्या प्राध्यापकबाई, जरा मुलांना समजेल असं सोप्या भाषेत बोला की!’’ बाबा हसत हसत म्हणाले. तसे सगळेच हसायला लागले आणि पणजी आजीनं हसत हसत ‘‘पांडुरंग हरी ऽऽ!’’ म्हटलं.

‘‘आई, आम्ही त्या दिंडीमध्ये एकेक कलासुद्धा सादर करणार आहोत बरं का! राही तुळशीवृंदावन घेणार आहे.. खणाचं परकर- पोलकं घालून आणि मी तुकोबांचा ‘देह देवाचे मंदिर’ हा अभंग म्हणणार आहे. आणि नील एकनाथांचं ‘विंचू चावला’ हे भारुड म्हणणार आहे.’’

‘‘अरे व्वा! नचिकेत तुला सांगते, या वारीमध्ये ना संतसाहित्याचं संमेलनच असतं जणू! बघ ना, ‘ज्ञानोबा ऽऽऽ माऊली ऽऽऽ तुकारामऽऽऽ’ म्हणत पायी चालणारे वारकरी अधेमधे विश्रांती घेतात ना तेव्हा या संत-साहित्याचा जागरच करतात की! कुणी गवळण म्हणतं. कुणी आरती म्हणतं. कुणी काकडा म्हणतं. भजन, अभंग, भारूड, कीर्तन हे तर मुक्कामावर होतच असतात. पण नित्यनेमानं हरिपाठसुद्धा म्हटला जातो बरं का!’’

‘‘आई मराठी साहित्याची अभ्यासक असल्यानं छान समजावतेय रे बाळा!’’ पणजी आजी म्हणाली.

‘‘आणि बरं का आदिती, नवविधा भक्तीची रूपंसुद्धा अभंगातून पाहायला मिळतात बरं!’’

‘‘म्हणजे काय पणजी आज्जी?’’ आदिती म्हणाली.

‘‘अगं, चांगलं ऐकणं  म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण ही श्रवणभक्ती. आणि देवाला आठवणं ही स्मरणभक्ती. तशीच कीर्तन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, पादसेवन आणि आत्मनिवेदन अशी नऊ प्रकारची भक्ती असते. सांगेन हं समजावून कधीतरी.’’

पणजी आजीच्या बोलण्यावर आदितीनं मान डोलवली तशी रसिका म्हणाली, ‘‘आणि आज्जी, वारीत झिम्मा, फुगडी, फेर धरणं असे खेळ पण खेळतात ना.. मस्त मज्जाच! एवढं चालल्यामुळं शरीराला व्यायाम होतोच, पण मनोरंजन, स्वयंपाक- तोही चुलीवर.. पंक्ती वाढतात.. मी बघते ना टीव्हीवरच्या कार्यक्रमात.’’

‘‘हो ना! आणि तेव्हा वाईट रूढी, प्रथा- परंपरांच्या विरोधात अभंग, भारूडातून संतांनी जनजागृती केली ना! आत्ताही तसंच अवयवदानाचं, रक्तचंदनाचं महत्त्व सांगणारी पथनाटय़ं सादर केली जातात वारीत. या वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पायांना मालिश करणारे, अन्नदान, फळांचं वाटप करणारे, ठिकठिकाणी त्यांना नाश्ता देणं, मोफत औषधोपचार करणं, त्यांच्या चपला शिवून देणं.. अशी अनेक समाजसेवेची कामं ठिकठिकाणी लोकं करतात बरं!’’ आई सांगत होती.

तेवढय़ात खेळायला बोलवायला आलेली सानू म्हणाली, ‘‘नचिकेत, मीसुद्धा टाळ वाजवणारे आमच्या शाळेच्या दिंडीत. टाळ, मृदुंग, वीणा, पखवाज, ढोलकी, चिपळ्या.. कित्ती प्रकारची वाद्यं असतात ना वारीमध्ये.’’

आई सांगायला लागली, ‘‘अरे, वारीतला हा वारकरी शिकलेला असो वा नसो- अशा अनेक कलांमध्ये पारंगत असतो. वासुदेव, गोंधळी अशा अनेक लोककला यांनीच सांभाळल्यात बरं का रे.’’

‘‘मुलांनो! लक्षात ठेवा, या पंढरीच्या वारीच्या निमित्ताने अनेक संतांचे अभंग आणि साहित्य ऐकायला मिळतं. त्यातून प्रबोधन तर होतंच; पण नामस्मरणाचा, भक्तीत रममाण होण्याचा आनंदही मिळतो. कुठलाही भेदभाव नाही, त्यातून समूहभावना वाढते. एकमेकांना मदत करणं, प्रत्येकाची काळजी घेणं या भावना वाढतात. सगळे ताण विसरून वारकरी ‘पायी हळूहळू चाला.. मुखाने हरीनाम बोला’ म्हणत ‘ग्यानबाऽऽऽ तुकारामऽऽऽ’ ‘ग्यानबा ऽऽऽ तुकाराम ऽऽऽ’, ‘विठ्ठोब्बाऽऽऽ रखुमाई ऽऽऽ’च्या गजरात ही वारी पूर्ण करतात बरं!’’

‘‘ही पणजी आज्जी पण फुलवाती करताना सारखं ‘विठ्ठल, विठ्ठल’ पुटपुटत असते.’’ आदिती हसत हसत म्हणाली. ते ऐकून रसिका लग्गेच म्हणाली, ‘‘अगं आदु, ‘विठ्ठल, विठ्ठल’ म्हणणं हा श्वासाचा, हृदयाचा उत्तम व्यायामप्रकार आहे हं!’’ रसिकानं ‘विठ्ठला मायबापा’अशी गाण्याची झलकच म्हणून दाखवली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

पणजी आजीनं आठवणीनं ती विभुतीची गोळी आणि तुळशीची माळ नचीला दिली आणि  ‘बाळगोपाळ वारकरी विठ्ठलनामाची शाळा भरली’ असं गुणगुणायला लागली.

‘‘आई! खरंच गं! मुक्ताताई कसा पाठय़पुस्तकातल्या कविता एकत्र करून कार्यक्रम करते, तसंच वारीत संतांचं साहित्य एकत्र ऐकायला . हो ना! ठरलं तर मग- उद्या बाईंना विचारतो आणि शाळेबाहेरच्या फलकावर शीर्षक लिहितो- ‘आषाढवारी.. संत साहित्यवारी’!’’                                     

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Interesting story for kids funny story for kids moral story for kids zws 70

Next Story
बालमैफल : खोटे बोलू नका!
फोटो गॅलरी