सुचित्रा साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘किती जोरात पाऊस पडतोय गं आजी..’’ पाय उंच करून पाऊस हातात पकडण्याचा रमाचा जोरदार प्रयत्न चालू होता.

‘‘पावसाळा ऋतू आहे ना, मग पाऊस पडणारच.’’ आराध्यने आपला अभ्यास दाखवला.

‘‘पण किती छान हिरवंगार दिसतंय ना सगळीकडे. झाडं अगदी टवटवीत झाली आहेत. मला या दिवसांत प्रवास करायला खूप आवडतो.’’ अपूर्वदादाचे डोळे लकाकले.

‘‘निसर्गसान्निध्य सगळ्यांनाच आवडतं. प्रतिभावंत कवी ते काव्यातून व्यक्त करतात. समर्थ रामदासस्वामींनी रोज नियमितपणे उगवणारा सूर्य, जिच्या भक्कम आधारावर आपण टॉवर बांधतो ती पृथ्वी, न दिसणारा, परंतु स्पर्शाने जाणवणारा वायू किंवा वारा, यज्ञयाग, पोटातली भूक जागवणारा अग्नी आणि ज्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे ते पाणी यांना श्रीमत् दासबोध या ग्रंथात स्थान दिलं आहे. पाण्याविषयी तर दोन समास आहेत. बाहेर पडणाऱ्या पावसाचं पाणी बघताना ‘‘या ग्रंथातलं पाणी बघू या का मुलांनो?’’ असं म्हणत सगळ्या वानरसेनेचा मुक्काम आता इथेच राहणार होता हे ओळखून आजीने संधी साधली. नंदिनी, ईशाही जवळ येऊन बसल्या.

हेही वाचा >>> बालमैफल : जादूचे खत

‘‘मी पाणी पिता पिता ऐकतो हं.’’ आराध्यने हळूच सांगितलं.

‘‘समर्थाची भाषा थोडी वेगळी, पाणीदार, डौलदार आहे. पाणी सर्वाचे जन्मस्थान आहे. पाण्यावर सर्वाचं जीवन अवलंबून असतं म्हणून समर्थानी त्याला ‘आपोनारायण’ म्हटलं आहे. पावसाचे पाणी तर आहेच, पण वाहते पाणीसुद्धा खूप आहे. सांग बघू नंदिनी, कुठे कुठे पाणी आढळतं?’’

‘‘नद्या, नाले, ओढे, डोह, धबधबे, झरे वाहताना दिसतात.’’ नंदिनीने विचारपूर्वक सांगितले.

‘‘या नद्यांची वर्णने करताना समर्थाचं शब्दवैभव, निरीक्षण आणि त्यांच्याविषयीचं प्रेम दिसून येतं.

‘वळणे बाकाणे भोवरे। उकळ्या तरंग झरे।

लाहा लाटा कादरे। ठाई ठाई।

शुष्क जळाचे चळाळ। धारा धबाबे खळाळ।

चिपळ्या, चळका, भळाळ। चपळ पाणी।।’ वाचताना उडय़ा माराव्याशा वाटतात ना!’’

रमा खरोखरच उडय़ा मारत राहिली.

‘‘ हे पावसाचं पाणी जातं कुठं सांगा बघू.’’ आजीने प्रश्न टाकला.

‘‘काही समुद्रात जातं. उरलेलं सगळं जमिनीत मुरतं. मग झाडांची मुळं ते पाणी शोषून घेतात आणि झाडाच्या शेंडय़ापर्यंत पाठवतात. त्यावर झाडं वाढतात.’’ ईशाने पटकन् सांगून टाकलं.

म्हणजे समुद्रात न जाता ते जास्तीत जास्त जमिनीत साठायला हवं, तरच विहिरी खोदल्या की पाणी लागेल. शेतीला त्याचा उपयोग करून घेता येईल. ही महत्त्वाची गोष्ट सांगताना समर्थ म्हणतात- ‘पृथ्वीतळी पाणी भरले। पृथ्वीमध्ये पाणी खेळे। पृथ्वीवरी प्रगटले उदंड पाणी ।। ’ त्यासाठी नुसती जमीन शिल्लक ठेवायला हवी. घराच्या आजूबाजूला आपण काय करतो? तर सगळीकडे लाद्या व फरशा बसवून टाकतो. खरं ना!’’

‘‘आजी, आपण सगळ्या झाडांना एकच पाणी घालतो; पण उसात ते गोड होतं, तर लबात आंबट होतं, हो ना!’’ अपूर्वदादाने आपलं अभ्यासपूर्ण निरीक्षण नोंदवलं.

पाण्याचा हा महत्त्वाचा गुणधर्म आहे- कोणातही सहज मिसळून जायचा. ‘जे जे बीजी मिश्रीत झाले। तो तो स्वाद घेऊन उठिले। उसामध्ये गोडीस आले। परम सुंदर।। गुणी अवगुणी मिळे।। ज्याचे त्यापरी निवळे। त्या उदकाचा महिमा न कळे। उदकेविण।।’  ज्या घरात, परिस्थितीत, वातावरणात आपण जातो तिथलंच होऊन जावं असं आपण म्हणतो ना, तेच समर्थानी पाण्याच्या उदाहरणातून सुचवलंय.’’ – इति आजी.

‘‘आजी, आपल्या देवघरात गंगा आहे ना गं.’’ रोज पूजा करताना विचारल्यामुळे पाठ झालेला प्रश्न रमाने विचारून टाकला.

हेही वाचा >>> बालमैफल : खोटे बोलू नका!

‘‘हो. आपण नद्यांना पवित्र, पूजनीय मानतो. त्यांच्या काठावर वसाहती, गावं, शहरं वसतात. संस्कृती बहरते. तीर्थक्षेत्रं होतात. नर्मदा परिक्रमा करतो ना आपण.. हे सांगताना समर्थ कौतुकाने म्हणतात, ‘तीर्थे येकाहून येक। माहां पवित्र पुण्यदायक। अगाध महिमा शास्त्रकारक। बोलोनि गेले।।’ काही ठिकाणी पाणी थंडगार असतं, तर काही ठिकाणी गरम पाण्याची कुंडे असतात. ‘तैसीच नाना उष्णेदके ठाई ठाई।’’ आजीने सविस्तर सांगितले.

‘‘अरे, पाऊस थांबला म्हणून इतकं शांत वाटतंय.’’ आराध्यला बाहेर खेळायला जायचं होतं, त्यामुळे त्याचं पावसाकडे लक्ष होतं. म्हणजे पावसाला नाद असतो. म्हणून समर्थ म्हणतात, ‘भूमंडळी धांवे नीर। नाना ध्वनी त्या सुंदर। धबाबा धबा थोर। रिचवती धारा।। ’ समर्थाना पाण्याच्या विविध रूपांचं इतकं आकर्षण होतं की दासबोध लेखनासाठी त्यांनी शिवथरघळीची निवड केली, कारण त्या निसर्गरम्य ठिकाणी धबधबा आहे. त्याचा नाद अव्याहत चालू असतो. ‘गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनि चालली बळे। धबाबा लोटल्या धारा। धबाबा तोय आढळे।। ’असं त्याचं नादमय शब्दचित्रही लोभस आहे.’’

आजी थोडी नादावली होती.

‘‘पण कधी कधी या पावसाची संततधार बघितली की २६ जुलैची आठवण येते.’’ ईशा जरा गंभीर झाली.

‘‘म्हणूनच समर्थ म्हणतात- ‘उदक तारक उदक मारक। उदक नाना सौख्यदायेक। पाहाता उदकाचा विवेक। अलोकिक आहे।। ’ म्हणून विवेकाने त्याचा वापर केला पाहिजे. पाण्याचे सौंदर्य, स्वभाव सांगत जलसाक्षरतेचा विचार रुजवणाऱ्या समर्थाना वंदन करायला शिवथरघळीत कोण कोण येणार सांगा बघू. अपूर्व प्रवास करायला आवडतो ना तुला, मग येणार का?’’

धबधब्याच्या आकर्षणाने सगळ्यांनीच मोठा होऽऽऽकार दिला.

suchitrasathe52@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interesting story for kids funny story for kids moral story for kids zws 70
First published on: 07-08-2022 at 01:07 IST