परीक्षा संपली आणि रोहनला बाहेर कुठे तरी फिरायला जायचे वेध लागले. आधीपासूनच तो बाबांच्या मागे लागला होता, पण तेव्हा बाबा काही बोलले नाहीत. मात्र रोहनसाठी त्यांनी एक सरप्राइज आखून ठेवलं होतं. ‘‘आपण कुठे जाणार आहोत बाबा?’’ ‘‘एक गंमत आहे ती… तू फक्त बॅग भर तुझी. टोपी घे, तुझा गॉगलपण घे बरोबर; ऊन खूप आहे सध्या.’’ बाबांनी हसत सांगितलं. तरी रोहनचं समाधान झालं नाही. तो धावत आईकडे गेला.

‘‘आई, सांग ना गं मला कुठे जायचं आहे ते… मित्रांना काय सांगू?’’ रोहननं जरा जोरातच आईला विचारलं.‘‘रोहन तुला प्राणी खूप आवडतात ना?’’
‘‘हो तर!’’ ‘‘झालं तर! आपण कान्हा अभयारण्यात जाणार आहोत.’’ आईनं खूशखबर दिली.‘‘अरे व्वा! मग तर मज्जाच येणार.’’ रोहन खूश होऊन तयारीला लागला.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दुपारी १.३० वाजता मुंबई – जबलपूर गाडी होती ती त्यांनी पकडली. दुसर्या दिवशी पहाटे पाचपर्यंत ती जबलपूरला पोहोचली. तिथून कारनं जवळपास पाच तास अंतरावर मांडला आणि बालाघाट जिल्ह्यात हे अभयारण्य पसरलं आहे. तिथे राहण्यासाठी आणि जंगल सफारीसाठी आधी मध्य प्रदेश फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवावं लागतं. बाबांनी ते सर्व आधीच त्यांच्या वेबसाइटवर आरक्षित करून ठेवलं होतं. तिथे तीन ठिकाणी राहता येते. बाबांनी मुक्की गेटचं आरक्षण केलं होतं.

तिथे पोहोचताच लिंबुपाणी देऊन त्यांचं स्वागत केलं. सभोवताली वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांनी वेढलेला परिसर पाहून रोहन खूश झाला. एवढ्या उन्हाळ्यातसुद्धा तेथे गार वाटत होते. पण रात्री कधी कधी तेथे वाघोबांची फेरी होऊ शकते हे ऐकल्यावर रोहन थोडा घाबरला आणि त्यांनी रात्री जास्त बाहेर फिरणं टाळलं. दुसर्या दिवशी पहाटेच त्यांना जंगल सफारीसाठी निघायचं होतं. पहाटे साडेपाच वाजताच जीप आली होती. त्या जीपमध्ये बसून ते मुक्की गेटकडे आले. तिथे दुसर्याही जीप येऊन उभ्या होत्या.

प्रत्येक जीपचे ड्रायव्हर काका ऑफिसमध्ये जाऊन आपल्याबरोबर कोण आहेत ते खात्री करून घेत होते. मग ऑफिसमधून त्यांच्याबरोबर प्रत्येक जीपबरोबर एकेक गाइड देत होते. रोहनच्या जीपबरोबर एक मावशी गाइड म्हणून आल्या. मावशी माहिती सांगत होत्या. ‘‘रोहन, तुला माहीत आहे का या जंगलात कोण कोण राहतं ते?’’ ‘‘हो… वाघ आहेत ना इथे? तेच पाहायला मी आईबाबांबरोबर आलो आहे.’’

‘‘अगदी बरोबर! वाघ आहेतच, पण त्याचबरोबर बाराशिंगा, गवे, रानडुकरे, हरणे, अस्वले, नीलगाय, बिबटे असे सर्व प्रकारचे प्राणी आढळतात. खूप सारे पक्षीही आढळतात. आपल्याला आज काय काय दिसतं ते पाहू या.’’ मावशी म्हणाल्या. ‘‘मला वाघच पाहायचा आहेपण…’’ रोहन उत्तरला‘‘तेसुद्धा नशिबात असावं लागतं बाळा… सगळ्यांनाच बघायला नाही मिळत…’’ मावशी म्हणाल्या.

जीप हळूहळू चालत होती. उघड्या जीपमधून जायला रोहन आधी घाबरत होता. पण मावशीनं सांगितलं की आपण काही केल्याशिवाय प्राणी आपल्यावर हल्ला करत नाहीत. जाताना बरेचसे मोर आपला पिसारा फुलवून नाचताना पाहायला मिळालं. पावसाशिवाय त्यांना नाचताना पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. पण सध्या त्यांचा विणीचा हंगाम चालू असल्यामुळे आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी ते नाचतात असं मावशीनं सांगितलं. जसजसं ते पुढे जात होते तसतसं हरणांचे कळप, रानडुकरं, कधी तरी बाराशिंगा नजरेस पडत होते.

एकदा अचानक ड्रायव्हर काकांनी जीप थांबवली. पाहतो तर काय, चारपाच धिप्पाड गवे रस्त्यावरून जाताना दिसले. ‘‘रोहन तुला ठाऊक आहे का, गवे इतके बलदंड असतात की एक गवा आपली अख्खी जीप उलटवून टाकू शकतो.’’ मावशी अगदी हळू आवाजात सांगत होती. बहुधा म्हणूनच काकांनी त्यांना आधी जाऊ दिलं असावं. ते गेल्यावर जीप पुढे चालू लागली. जीप जाण्यापुरता रस्ता सोडला तर आजूबाजूला साग आणि इतर मोठी झाडं दिसत होती. बांबूच्या बनात वानरसेना फिरताना दिसत होती.

पण ज्यासाठी आलो होतो त्याचं दर्शन मात्र कुठे होईना म्हणून सगळेच जरा नाराज झाले होते. आता पूर्ण उजाडलं होतं. ऊन अंगाला लागत होतं. पाणी प्यायला एखादं जनावर आलं असेल म्हणून काका प्रत्येक पाणवठ्यावर जीप थांबवत होते. पण हरणं आणि रानडुक्कर याशिवाय कोणी दृष्टीस पडत नव्हतं. मावशी आणि ड्रायव्हर काका प्रत्येक शक्यता पडताळून पाहत होते. रस्त्यावर काही ठिकाणी वाघीण आणि बछड्यांच्या पायांचे ठसे उमटलेले दिसत होते. जीप परत पुढे निघाली. जरा पुढे गेल्यावर आणखी एक जीप उभी होती. त्या जीपवरच्या गाइडनं मावशीला काही तरी खूण केली.

‘‘कोणी आवाज करू नका… एकदम शांत राहा…’’ मावशीनं बजावलं. जीप जरा अजून पुढे हळूच सरकली. ‘‘रोहन ते बघ… ते मोठं गवताचं पातं दिसतं ना? त्याच्या सरळ रेषेत बघ. दिसली का? वाघीण आहे तिथे.’’ मावशीनं सांगितलं. रोहन आणि आईबाबांनी त्या दिशेनं पाहिलं आणि खरंच दूरवर वाघीण त्यांच्याकडेच पाहताना त्यांना दिसली. मग मावशीनं रोहनच्या हातात दुर्बीण दिली. ‘‘हे घे, यातून तुला स्पष्ट दिसेल.’’

दुर्बीण घेतल्यावर रोहनला खरंच त्या वाघिणीचं पूर्ण दर्शन झालं. त्याचा आनंद गगनात मावेना!‘‘बाबा खरंच वाघीण…’’ रोहन जोरात ओरडला.
‘‘शू… शू… ओरडू नकोस.’’ मावशीनं दटावलं.‘‘सॉरी मावशी.’’ रोहन एकदम गप्प बसला. मग सगळ्यांनी आळीपाळीनं दुर्बिणीतून वाघिणीचं दर्शन घेतलं. थोड्याच वेळात ती तिथून उंच गवतात नाहीशी झाली. वाघिणीचं दर्शन झालं म्हणून सगळ्यांनाच आनंद झाला. त्यानंतरही ते बराच वेळ जंगलाची शोभा पाहत फिरत होते. हरणं न दचकता सामोरी येत होती, पण बाराशिंगे लपून छपून दर्शन देत होते.

रानडुकरं मस्ती करत होती, तर माकडं झाडांवर खेळत होती. मोरांचा केकारव अधूनमधून ऐकायला येत होता. सर्व गोष्टी पाहून रोहन खूश झाला. ऊन डोक्यावर आल्यावर जीप परत गेटजवळ आली. रोहननं मावशीचे आभार मानले. आज तिच्यामुळेच त्याला वाघ पाहायला मिळाला होता. नंतरचे दिवस आजूबाजूचा परिसर पाहण्यात कसे संपले ते कळलंच नाही. जंगल सफारी करून घरी परत येताना रोहनला कधी एकदा आपण पोहोचतो असं झालं होतं. मित्रांना सांगून ऐट मिरवायची होती ना!