बांगडय़ांची बहार

गावात जत्रा आली त्याला आता आठवडा होऊन गेला होता. चंदा आणि संजूलाही त्या जत्रेला जावेसे वाटत होते.

गावात जत्रा आली त्याला आता आठवडा होऊन गेला होता. चंदा आणि संजूलाही त्या जत्रेला जावेसे वाटत होते. शाळेतल्या त्यांच्या मित्र-मत्रिणींकडून रोज त्यांना जत्रेतल्या वेगवेगळ्या गमती ऐकायला मिळत. कधी कोणी जत्रेतल्या पाळण्यात बसून गरगर फिरण्याची मजा अनुभवल्याचे सांगे, तर कधी कोणी नेमबाजीच्या खेळात भाग घेऊन पटकावलेले बक्षीस दाखवे. जत्रेत चाखलेल्या भेळेचे रसभरीत वर्णन ऐकून ऐकणाऱ्यांच्या तोंडालाही पाणी सुटे. ज्यांना काही खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी साडय़ा अन् फ्रॉकपासून रंगीबेरंगी बांगडय़ांपर्यंतची भरपूर दुकाने जत्रेत होती. चंदाच्या सगळ्या मत्रिणी जत्रेला जाऊन आल्या होत्या. कुणी नवीन फ्रॉक घेतला होता, तर कुणी वेण्यांना बांधायला रंगीत रिबिनी घेतल्या होत्या. कुणी कानात नवे डूल घातले होते, तर कुणी नव्या बांगडय़ा भरल्या होत्या. जत्रेतल्या सगळ्याच वस्तू आपल्या नवलाईने उठून दिसत असल्या तरी चंदाच्या मनात भरल्या त्या मस्तपकी चमचमणाऱ्या, किणकिण वाजणाऱ्या काचेच्या रंगीबेरंगी बांगडय़ा!
रोजंदारीवर काम करणाऱ्या आपल्या आई-बाबांना जत्रेला जायला जमत नाही, हे चंदा आणि संजू पाहत होते, म्हणूनच त्या दोघांनी आजवर जत्रेला जायचा हट्ट केला नव्हता. पण आज तर जत्रा संपणार होती. शेवटी न राहवून चंदा आईला म्हणाली, ‘‘आई, आम्ही दोघं जाऊ का जत्रेला? आज संपेलही जत्रा!’’
‘‘हो, आम्हाला कामावरून सुट्टी मिळायची नाही. हे घे पसे. तू आणि संजू आज जाऊन या जत्रेला. आल्यावर आम्हाला जत्रेच्या गमती सांगा,’’ चंदाची आई म्हणाली.
आईच्या या सांगण्यावर चंदाने समजूतदारपणे मान डोलावली आणि हसऱ्या चेहऱ्याने ती संजूचा हात धरून जत्रेच्या रस्त्याला लागली.
जत्रेच्या ठिकाणी पोचल्यावर तर चंदा-संजूला काय पाहू अन् काय नको असे झाले. जत्रेतला जणू आकाशाला भिडणारा उंचच उंच पाळणा पाहून चंदाचे डोळेच विस्फारले. सिनेमा दाखवणाऱ्या तंबूभोवतीही खूप गर्दी होती. गारेगार बर्फाचे गोळे आणि कापसासारखे हलके ‘बुढ्ढी के बाल’ सगळ्यांनाच खुणावत होते.
थोडे पुढे गेल्यावर त्यांना दिसला नेमबाजीचा स्टॉल. त्या स्टॉलवर समोरच्या पडद्यावर रंगीबेरंगी फुगे गोलाकारात चिकटवलेले होते. संजूने आपले नेमबाजीचे कौशल्य अजमावायचे ठरवले. हातात बंदूक घेऊन एक डोळा मिटून बरोबर नेम साधत त्याने सगळे फुगे फोडले. बक्षीस म्हणून मिळालेले पेन त्याने मोठय़ा अभिमानाने शर्टाच्या खिशाला लावले. चंदानेही त्याच्याकडे हसून बघत मान डोलावून त्याला शाबासकी दिली. मग दोघांनीही आंबट-तिखट भेळेचा मनमुराद आस्वाद घेतला.
इतक्यात चंदाला बांगडय़ांचे दुकान दिसले. ‘‘मला बांगडय़ा घ्यायच्या आहेत,’’ ती संजूला म्हणाली.
‘‘घे ना,’’ संजू तिला बांगडय़ांच्या दुकानाकडे नेत म्हणाला.
लाल, निळ्या, हिरव्या आणि पिवळ्या बांगडय़ा पाहून चंदा हरखून गेली. सगळ्याच बांगडय़ा चंदाच्या मनात भरल्या आहेत हे ओळखून संजू म्हणाला, ‘‘तुला आवडलेल्या सगळ्या रंगांच्या बांगडय़ा घे तू!’’
‘‘खरंच?!’’ आनंदाश्चर्याने चंदाचे डोळे विस्फारले.
‘‘हे घ्या पसे,’’ असे म्हणत संजूने पसे देताच दुकानदाराने चारही रंगांच्या बांगडय़ा कागदात बांधून दिल्या. चंदाने हातातल्या पिशवीत बांगडय़ा ठेवल्या आणि दोघेही लगबगीने घरी निघाली. घरी पोचल्यावर कधी एकदा आई-बाबांना जत्रेतल्या गमती-जमती सांगतो, असे दोघांनाही झाले होते.
आपल्याच नादात घरी जात असताना रस्त्यातला एक दगड चंदाला दिसला नाही. ती त्या दगडाला अडखळली आणि तोल जाऊन खाली पडली. त्यासरशी तिच्या हातातल्या पिशवीतल्या बांगडय़ाही खालच्या दगडावर आदळून फुटल्या. पायाला ठेच लागून जखम झाल्यापेक्षा नवीन बांगडय़ा फुटल्याचे चंदाला मनस्वी दु:ख झाले. संजूने तिला हात धरून उठवले. फुटक्या बांगडय़ांची पिशवी हातात धरून घरी चाललेल्या चंदाच्या मनात दाटलेली निराशा संजूलाही अस्वस्थ करत होती.
घरी पोचल्याबरोबर चंदाने आईच्या कुशीत शिरून आपल्या दु:खाला वाट करून दिली. आई तिची समजूत घालते आहे, हे पाहून संजू बाहेर पडला. चंदाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू कसे फुलवता येईल, याच विचाराने त्याच्या मनात घर केले होते. विचार करत चालता-चालता रस्त्याच्या कडेला काहीतरी चमकलेले संजूला दिसले. आरसे आणि काचेच्या फ्रेम बनवणाऱ्या दुकानदाराने त्याला निरुपयोगी ठरलेल्या पट्टय़ा बाहेर टाकल्या होत्या. त्या पाहताच संजूला एक कल्पना सुचली. त्याचा चेहरा उजळला. हसऱ्या चेहऱ्याने तो दुकानदाराला म्हणाला, ‘‘मी यातल्या काही पट्टय़ा घेतल्या तर चालेल?’’
‘‘घे की. आमच्या काही कामाच्या नाहीत त्या,’’ दुकानदाराने परवानगी दिली.
संजूने त्यातल्या आरशाच्या तीन लांबट आकाराच्या पट्टय़ा, तसेच दुधीकाचेचा आणि पारदर्शक काचेचा एकेक गोल तुकडा निवडला. ते घेऊन तो घाई-घाईने घरी परतला. आरशाच्या त्या तीन पट्टय़ा घेऊन संजूने त्यांचा एक त्रिकोण बनवला. तो त्रिकोण नीट राहावा म्हणून त्याने त्याच्यावर एक कागद चिकटवला. मग त्याने तो त्रिकोण उदबत्तीच्या रिकाम्या नळकांडय़ात बसवला. त्या नळकांडय़ाच्या एका टोकाला त्याने दुधीकाच बसवून प्रकाश नळकांडय़ात येण्याची सोय केली. मग त्याने चंदाच्या पिशवीतल्या बांगडय़ांचे रंगीबेरंगी तुकडे त्या नळकांडय़ात घातले. नळकांडय़ाच्या दुसऱ्या टोकाला पारदर्शक काचेचा तुकडा बसवून त्याने नळकांडय़ात बघण्याची सोय केली. मग संजूने ते नळकांडे बंद केले. नळकांडय़ात बघून आपली गंमत नीट जमल्याची खात्री करून घेतली आणि उत्साहाने चंदाला हाक मारली.
काहीशा हिरमुसल्या चेहऱ्याने चंदा आली. संजूने हातातले नळकांडे तिच्यापुढे धरले. काहीच न उमजून तिने विचारले, ‘‘हे काय आहे?’’
‘‘हे घे, लाव डोळ्याला आणि तूच बघ काय आहे ते,’’ संजू म्हणाला.
चंदाने ते नळकांडे हातात घेऊन डोळ्यांना लावले आणि काय आश्चर्य! तिला बांगडय़ांच्या तुकडय़ांनी बनलेली छानशी नक्षी दिसली. चंदाच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले. तिच्याही नकळत तिने ते नळकांडे थोडेसे हलवताच नळकांडय़ांतल्या तुकडय़ांनी नवीनच नक्षी तयार केली. पुन:पुन्हा ते नळकांडे हलवून चंदा पाहत राहिली. जितक्या वेळा नळकांडे हलवावे तितक्या वेळा त्या तुकडय़ांमधून नवनवीन नक्षी साकारत होती. बांगडय़ांच्या रंगीबेरंगी तुकडय़ांमधून साकारलेली ती अद्भुत मजा चंदा हरखून जाऊन पाहत राहिली. बांगडय़ा फुटल्याचे तिचे दु:ख कुठल्या कुठे पळाले होते. फुटक्या बांगडय़ांच्या तुकडय़ांमधून इतकी छान गंमत बनवून देणाऱ्या संजूकडे पाहून ती आनंदभराने हसली. कोणत्याच मत्रिणीकडे नसलेली ही बांगडय़ाची बहारदार दुनिया ती सगळ्या मत्रिणींना अभिमानाने दाखवणार होती!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kids story