सांताक्लॉजचे मदतनीस

नाताळची सुट्टी लागल्यामुळे जेसन आपल्या आजीकडे राहायला गेला होता. जेवताना दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. जेसन आजीला म्हणाला, ‘‘आजी, शाळेतली मुले म्हणत होती की सांताक्लॉज नसतो.

नाताळची सुट्टी लागल्यामुळे जेसन आपल्या आजीकडे राहायला गेला होता. जेवताना दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. जेसन आजीला म्हणाला, ‘‘आजी, शाळेतली मुले म्हणत होती की सांताक्लॉज नसतो. मग मला या नाताळची भेटवस्तू कोण देणार?’’ आजी म्हणाली, ‘‘शाळेतल्या मुलांवर विश्वास ठेवू नको. नाताळच्या आधी खूप मुले अशा वावडय़ा उठवतात; पण आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ नये.’’
दुसऱ्या दिवशी सकाळी आजी जेसनला तिच्या घराजवळच्या एका दुकानात घेऊन गेली. त्या दुकानात सर्व प्रकारच्या वस्तू मिळत असत. आजीने जेसनला ५० क्रोनर दिले आणि म्हणाली, ‘‘तुला कोणासाठी नाताळच्या भेटवस्तू घ्यायच्या आहेत त्या घे. वेळ लागला तरी चालेल. मी इथे पुस्तक वाचत बसते.’’ जेसन सातच वर्षांचा होता. तो आपल्या आईबरोबर नेहमी खरेदीला जायचा, पण आज आजीने त्याला एकटय़ालाच दुकानात सोडले होते. दुकान खूप मोठे होते आणि तिथे गर्दीही खूप होती. लोक आपली नाताळची खरेदी करण्यात गर्क होते. तो भांबावून गेला आणि थोडा वेळ इकडेतिकडे बघत नुसताच उभा राहिला. कोणासाठी भेटवस्तू घ्याव्या ते काही त्याला सुचेना. त्याने घरातील सर्वजण, त्याचे शेजारी, शाळेतले मित्र असे सगळे आठवून बघितले आणि त्याला एकदम त्याच्या वर्गातला बॉबी आठवला. मधल्या सुट्टीत वर्गातली सगळी मुले बाहेर खेळायला जायची, पण बॉबी वर्गातच बसून राहायचा. तो मला बरं वाटत नाही, सर्दी झाली आहे अशी कारणे सांगायचा; पण जेसनला आणि इतर मुलांना माहीत होते की त्याच्याकडे स्वेटर नाही आणि बाहेर थंडी वाजेल म्हणून तो खेळायला येत नाही.
जेसन स्वेटरच्या विभागाकडे गेला. तिथे ठेवलेला रंगीबेरंगी नक्षी असलेला लाल रंगाचा स्वेटर त्याला खूप आवडला. त्याने स्वत:ला पुरेल अशा मापाचा स्वेटर घेतला कारण बॉबी त्याच्या एवढाच होता. स्वेटरवरची किंमत बघायचे मात्र त्याच्या लक्षातच आले नाही. अगदी खुशीत पळत पळत जावून त्याने स्वेटर आणि ५० क्रोनर काउंट्रवर ठेवले. काउंटरवरच्या मुलीने स्वेटरवरचे किमतीचे लेबल आणि ५० क्रोनर बघितले आणि ती हसली. तिने जेसनला विचारले की ही तू हा स्वेटर कोणासाठी नाताळची भेट म्हणून घेतल्या आहेस का? त्यावर जेसनने तिला लगेच बॉबीकडे स्वेटर नाही म्हणून तो कसा खेळायला बाहेर येत नाही ते सगळे सांगून टाकले. काउंटरवरची मुलगी
जेसनकडे बघून कौतुकाने हसली. तिने बॅगमध्ये तो स्वेटर आणि बील घालून ती बॅग जेसनकडे दिली, आणि त्याला नाताळच्या शुभेच्छा देऊन त्याचा एक गालगुच्चा घेतला.
जेसन पळत पळत आजी बसली होती तिथे गेला व तिलाही बॉबीची कहाणी सांगितली व अगदी उत्साहात तो स्वेटर काढून दाखवला. आजीने प्रेमाने जेसनला जवळ घेऊन त्याचा एक पापा घेतला. पावती बघितल्यावर आजी हसली. ती परत दुकानात गेली आणि काउंटरवरच्या मुलीशी काही तरी बोलून तिला आणखी पसे देऊन आली. घरी आल्यावर आजीच्या मदतीने जेसनने स्वेटर रंगीत कागदात पॅक केला आणि त्यावर एक नाताळच्या शुभेच्छा असे लिहिलेली चिठ्ठी अडकवली. आजीनी त्यावर लिहिले की ‘ बॉबीसाठी सांताक्लॉज कडून नाताळची भेट.’
आजी जेसनला म्हणाली, ‘‘सांताक्लॉजला नाताळची भेटवस्तू द्यायला सगळ्या मुलांच्या घरी जाणे शक्य नसते म्हणून आता आपण त्याचे मदतनीस म्हणून बॉबीच्या घरी जाणार आहोत. तिथे पोचल्यावर ती दोघे बॉबीच्या घराचे दार दिसेल अशा जागी लपून बसली. थोडय़ा वेळाने आजी जेसनला म्हणाली ‘‘जा आता हा रंगीत कागदात गुंडाळलेला स्वेटर बॉबीच्या दरवाजाजवळ ठेव आणि घराची बेल वाजवून परत इथे ये.’’ आजीने सांगितल्या प्रमाणे जेसनने तो स्वेटर बॉबीच्या घराच्या दरवाजाजवळ ठेवला आणि दोन वेळा घंटा वाजवून पळत पळत येऊन लपला.
थोडय़ा वेळाने घराचे दार उघडले आणि बॉबी बाहेर आला. त्याच्या अंगात स्वेटर नव्हता. कुडकुडतच त्याने ती भेटवस्तू उचलली आणि त्यावरची चिठ्ठी वाचली. ती भेटवस्तू सांताक्लॉजने त्याच्यासाठी ठेवली आहे हे वाचल्यावर त्याने खुशीत एक शीळ घातली आणि आनंदाने स्वत:भोवती एक गिरकी घेतली. तो उडय़ा मारतच घरात गेला.
नाताळची सुट्टी संपली आणि शाळा सुरू झाली. बॉबीला जेव्हा नवा स्वेटर घालून शाळेत आलेले पाहिले तेव्हा जेसनला खूप आनंद झाला. मधल्या सुट्टीत तो सगळ्या मुलांबरोबर खेळायला बाहेर आला. नाताळच्या सुट्टीत काय केले, काय भेटवस्तू मिळाल्या अशा सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या. त्यावर बॉबी म्हणाला, ‘‘तुम्ही सांगत होतात ना की सांताक्लॉज नसतो, पण बघा मला सांताक्लॉजनीच हा स्वेटर नाताळसाठी भेटवस्तू म्हणून दिला आहे. हे सांगत असताना बॉबीच्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून गेले.
आपल्यापकीच काहीजण सांताक्लॉजचे मदतनीस म्हणून काम करतात ही एक नवीन गोष्ट जेसनला आपल्या आजीकडून कळली होती. तिच्यामुळेच जेसनला सांताक्लॉजचा मदतनीस होता आले. त्याला आपल्या आजीचा खूप अभिमान वाटला.
( डॅनिश कथेवर आधारित )

11
Art by kids

Art, drawing, Art by kids, kids drawing, art gallery

Art, drawing, Art by kids, kids drawing, art gallery, kids, chindren, balmaifal, balmaifal news, loksatta news, marathi, marathi news

आर्ट गॅलरी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kids story

Next Story
लढवा डोकं
ताज्या बातम्या