अनेक खेळ आपण लहानपणापासून खेळतो. पण ते खेळ कुठून आले, त्या खेळांचा मूळ देश कोणता, याबाबत आपल्याला माहिती नसते. अशाच जरा हटके देशी-विदेशी खेळांविषयी मनोरंजक माहिती देणारं सदर..
आज रविवार असल्यामुळे वरच्या मजल्यावर राहणारी मुक्ताताई स्नेहकडे खेळायला आली होती. मुक्ता आणि स्नेहने खेळण्यांचा खण उघडला तर समोर रंगीबेरंगी ठोकळे किंवा ‘ब्रिक्स’ असलेला ‘लेगो’ (LEGO) दिसला! मुक्ताने लेगोचे निळ्या- हिरव्या- पिवळ्या- केशरी- लाल- काळ्या- पांढऱ्या रंगांचे सगळे ब्रिक्स काळजीपूर्वक बाहेर काढले, तर मागे आणखी तीन-चार खोकी दिसली. ‘हा प्रज्ञा आत्याने अमेरिकेहून पाठवलाय’, ‘हा नीलेश काकाने फिनलंडहून पाठवलाय’, ‘हा बाबाने डेन्मार्कहून आणलाय’ अशी कॉमेंट्री करत स्नेहने लेगोचे सगळे बॉक्सेस खणातून बाहेर काढले. लेगोचे बॉक्सेस बघता बघता मुक्ताला प्रश्न पडला, की हे सगळे लेगो वेगवेगळ्या देशांमधून आलेत, तर मग मूळचा या खेळाचा देश कुठला? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मुक्ताने जवळच पेपर वाचत बसलेल्या आजोबांकडे मोर्चा वळवला!
‘‘आजोबा, आम्ही लेगो खेळायला काढलाय, पण स्नेहने सांगितलं की ते सगळे लेगो वेगवेगळ्या देशांमधून आलेत! असं कसं काय?’’ -मुक्ता.
आजोबांना मुक्ताच्या प्रश्नांचं कौतुक वाटलं! ते म्हणाले, ‘‘लेगोचे खेळ आता अनेक देशांत मिळतात. पण या खेळाचं मूळ सापडतं डेन्मार्कमध्ये! अर्थात, लेगो हे खेळाचं नाही तर कंपनीचं नाव आहे. Ole Kirk Christiansen नावाच्या एका Danish सुताराने तीसच्या दशकात ‘लेगो’ नावाच्या कंपनीची सुरुवात केली. ‘लेगो’ हा शब्द ‘Danish ‘leg godt’ या शब्दांचं कॉम्बिनेशन करून तयार केला गेला.
‘‘म्हणजे काय आजोबा?’’ मुक्तानं विचारलं.
आजोबा म्हणाले, ‘’leg godt’ म्हणजे ‘play well’’’ किंवा ‘छान- मजेत खेळा’. पुढे मग असंही लक्षात आलं की, लॅटिन भाषेत लेगो म्हणजे “I put together”.
‘‘म्हणजे काय आजोबा?’’ स्नेहने मुक्ताची नक्कल करत विचारलं.
‘‘म्हणजे सगळं नीट एकत्र जुळवायचं,’’ आजोबांऐवजी मुक्तानेच सांगितलं.
आजोबांनी लेगोचा इतिहास पुढे सांगताना म्हटलं की, ‘‘लेगो कंपनी सुरुवातीला लाकडी गाडय़ा, लाकडी बदकं अशी खेळणी बनवत असे. पण दुसऱ्या महायुद्धानंतर डेन्मार्कमध्ये प्लास्टिक मिळायला लागलं आणि लेगोची खेळणी प्लास्टिकची झाली. लेगोचे वेगवेगळे खेळ मिळत असले तरी एकमेकांत चपखल बसणारे ब्रिक्स हे लेगो खेळण्यांचं वैशिष्टय़. ही खेळणी तशी महाग असतात. कारण लेगो कंपनी नेहमी उत्तम दर्जाची खेळणी बनवते. नंतर अनेक कंपन्यांनी या खेळण्यांची कॉपी करायला सुरुवात केली. पण लेगोचा दर्जा मात्र असामान्य असाच आहे.’’
‘‘पण आजोबा, या खोक्यांवर ३+, ६+ असं लिहिलंय, ते का?’’
मुक्ताच्या प्रश्नावर आजोबा म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या वयोगटांसाठी वेगवेगळे लेगोचे खेळ असतात. छोटय़ांसाठी मोठे ब्रिक्स असलेले, हाताळायला सोपे असतात आणि मोठय़ा मुलांसाठी बनवायला कठीण किंवा जास्त डोकं वापरायला लागणारे, छोटे छोटे भाग असलेले खेळ असतात. लहान मुलांपासून ते अगदी शंभर वर्षांच्या आजी-आजोबांपर्यंत सगळ्या वयोगटांसाठी लेगोचे खेळ असतात! ब्रिक्स एकमेकांत बसवून बिल्डिंग, घर, गाडी, ट्रेन, विमान असे वेगवेगळे आकार तयार करण्यामुळे तुमची एकाग्रता, चिकाटी, निरीक्षणशक्ती, अंदाज बांधण्याची क्षमता सगळंच वाढतं. गंमत म्हणजे लंडन आणि इतर काही देशांमध्ये Lego land पार्क्‍स किंवा डिस्कव्हरी सेन्टर्ससुद्धा आहेत. Lego land मध्ये तर लंडन शहर, लंडनची जमिनीखालची रेल्वे, सेंट पॉल कॅथ्रेडल, मोठी कार अशा गोष्टी संपूर्णपणे लेगो ब्रिक्स वापरून केलेल्या दिसतात!’’
‘‘आजोबा, आपण जाऊ या ना एकदा Lego land बघायला!’’ स्नेहने असं म्हणताच, ‘‘तिकडे जाऊ तेव्हा जाऊ पण आजोबा, लेगोच्या वेबसाइटवर या सगळ्याचे फोटो तर आत्ताही बघता येऊ शकतील ना!’’ मुक्ता म्हणाली.
आजोबांनी सांगितलेली http://www.lego.com ही वेबसाइट तिने नीट लक्षात ठेवली. तुम्हीपण लक्षात ठेवा किंवा कुठे तरी लिहून ठेवा आणि नक्की बघा!
अंजली कुलकर्णी-शेवडे – anjalicoolkarni@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lego game
First published on: 10-01-2016 at 01:03 IST