काय मग, सकाळी दूध पिऊन, नाश्ता करून वगरे झाला की नाही?  झालाच असणार! मग काय काय खाल्लं सकाळी सकाळी? काय म्हणता? आईची मत्रीण फोन केला की अशाच चौकशा करत असते.. तुम्हाला राग bal08येतो अशा चौकशा केल्या की? सॉरी बाबा, नाही विचारणार तुम्हाला मी. पण तुम्ही तर आठवू शकता ना, काय खाल्लं ते अगदी स्वत:चं आणि स्वत:पुरतं. मग वेळ का दवडताय? करा ना सुरुवात!
म्हणजे बघा हं, सकाळी दुधाबरोबर तुम्ही बिस्कीट खाल्लं असेल तर ते गव्हापासून बनलेलं असेल. मग गहू कसे असतात ते आठवायचं. गहू झाडापासून मिळतात म्हणजे वनस्पतीज आणि दूध गायीचं म्हणजे प्राणिज. नाश्त्याला पोहे खाल्ले असतील तर पोहे भातापासून मिळतात म्हणजे वनस्पतीज. पोह्य़ात कांदा किंवा बटाटा होता म्हणजेही वनस्पतीज, वर कोिथबीर म्हणजेही वनस्पतीज. पण अंडं खाल्लं असेल तर मात्र प्राणिज. आंबा असणारच खाल्लेला. मग सांगा बरं तो कशामध्ये येईल ते?
दुपारच्या जेवणात पोळी, चिकन, वरण, उसळ वगरे वगरे जे जे काही असेल, ते ते कसं आणि कुठे मिळतं याचा विचार करायला तर लागा! बिल्डिंगमधल्या मित्रांशी चर्चा करून त्यांनीही कोणकोणते पदार्थ खाल्लेत ते विचारा. ते कशाकशापासून बनलेत ते जाणून घ्या. म्हणजे आपोआप खूप माहिती मिळेल. काय म्हणताय? काही काही पदार्थ कशापासून बनलेत ते समजतच नाही? अरे, असं कसं होईल? वेष्टन नीट पाहायचं विसरलात की काय? वेष्टनावर लिहिलेलं असतं हे सगळं व्यवस्थित. ते पाहायचं. त्यावरचा मार्क काळजीपूर्वक न्याहाळायचा, की आपोआप लक्षात येईल बरं तुमच्या!

-मेघना जोशी