‘लोकरंग’मधील (२६ एप्रिल) अतुल देऊळगावकर यांचा ‘‘… तर, मी काय करू?’’ हा लेख वाचला. मी इंदूरचा. या शहराला सलग आठ वेळा स्वच्छता पुरस्कार मिळाला व परत निश्चित मिळेल. कारण प्लास्टिक कचरा, ओला कचरा, सुका कचरा, कॉम्प्युटर/ इल्ट्रिरकल कचरा, काच कचरा आदी वेगळा द्यायची प्रत्येक घरास सवय लागली आहे.
कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणे कठीण वाटते, पण मग ती नितांत सोपी होत जाते- जर नीट व नियमाने पालन केले तर. बाहेर निघताना कापडी पिशवी घेण्याची सवय प्रत्येक व्यक्तीस आहे आणि कापडी पिशव्या फक्त १० रुपयास एटीएम मशीनने विकल्या जातात. खाऊपिऊ गल्लीत ही सोय आवर्जून असतेच व रस्त्यावरही ओला कचरा, सुका कचरा अशा पेट्या लागल्या आहेत व खास म्हणजे त्या भरल्या की रिकाम्या होतात.
सगळे रस्ते स्वच्छ असतात. पालिकेचे कामगार पहाटे, रात्रीसुद्धा जबाबदारीने कामे करतात, हे वैशिष्ट्य. स्टेशनवर, एसटी स्टॅण्डवरसुद्धा हीच स्वच्छता आपण पाहू शकता. असा आदर्श प्रत्येक शहरात जावा, जेणेकरून आपले गाव, मोहल्ला, शहर स्वच्छ राहील. अरुंधती देवस्थळे यांच्या ‘जादूई दिवस’ या सदरातील ‘उर्वशी बुटालिया : समतेसाठी लढा’ हा लेखही अप्रतिम. जिथे ्त्रिरया अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लढा देतात आणि जिंकतात हे खरे आणि हाच इतिहास आहे.‘बालमैफल’मधील अलकानंदा पाध्ये यांची ‘खुल जा सिमसिम’ आणि ‘तुला वाटेल ते काढ’ हा श्रीनिवास बाळकृष्ण यांचा लेखही उत्तम.- सुरेश कुळकर्णी, इंदूर
कृतज्ञता
‘लोकरंग’मधील (३ मे) ‘निष्काम कर्म ‘साधना’’ हा कौस्तुभ विकास आमटे यांनी लिहिलेला लेख मनाला खूप भावला. आजीचे खूपच वास्तववादी आणि छान शब्दचित्र रेखाटले आहे. चंद्रपूरला अखिल भारतीय संमेलन भरले होते, त्यावेळेला जवळजवळ आम्ही ४० साहित्यिक मंडळींनी आनंदवनाला भेट दिली होती. त्या वेळेला डॉक्टर विकास आमटे यांनी आम्हाला त्यांच्या कामाची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी केलेल्या चित्रकृती आणि कलाकृती दाखवल्या. त्या पाहून आम्ही थक्क झालो. आम्हाला विद्यार्थ्यांची शिस्त दिसून आली. ताई-बाबांच्या पश्चात संस्थेचा संस्कार बदललेला नाही हे पाहून आम्हाला खूप खूप आनंद वाटला. त्यांच्या पश्चात त्यांनी केलेले संस्कार त्यांच्या पुढील पिढ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या रक्तामध्ये भिनलेले आहेत असे दिसून आले.- उज्ज्वला मालाडकर, पुणे
जमिनीत पाणी जिरवा
‘लोकरंग’मधील (२६ एप्रिल) अतुल देऊळगावकर यांचा ‘‘…तर, मी काय करू?’’ हा लेख वाचला. दर वर्षी उन्हाळा वाढतच आहे. शहरातील अनेक इमारतींभोवती लाद्या लावून जमीन झाकून टाकतात, परिणामी पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. साठवले जात नाही. वाहून जाते. कालांतराने बोअरवेलही कोरडी पडते. इमारतीभोवती भिंतीच्या कडेने दोन फुटाचा पट्टा मातीचा ठेवून झाडे लावली पाहिजेत. पानांचा कचरा होतो म्हणून झाडेही लावली जात नाहीत. कुंड्यांमध्ये झाडे लावून पाणी जमिनीत जिरले जाणार नाही. या सगळ्याचा गांभीर्याने विचार करावा, तसेच विकासकांना तसे करण्याची सक्ती करावी.- श्रीकांत चंद्रकांत देव, डोंबिवली
समाजप्रबोधन करणारा लेख
‘लोकरंग’मधील (२६ एप्रिल) अतुल देऊळगावकर यांचा ‘‘…तर, मी काय करू?’’ हा लेख समाजप्रबोधन करणारा आणि प्रेरणादायी असा आहे. कुठल्याही हॉटेलमध्ये जेवायला गेलात की एक दृश्य हमखास दिसते, ते म्हणजे टिश्यू पेपरचा गरजेपेक्षा जास्त वापर. हात धुतले की लगेच हात वळतो तो टिश्यू पेपर ओढायला स्टँडकडे! जेवताना जरा कुठे हात तेलकट झाला, शिंक आली, पाणी सांडले, बडीशेप न्यायची आहे… ओढा टिश्यू पेपर. हॉटेलमधील वॉश बेसिनजवळ तयार झालेला टिश्यू पेपरचा डोंगर मनाला अस्वस्थ करतो. तीच गोष्ट टॉयलेट पेपरची. त्याचा गरजेपेक्षा जास्त वापर करताना कुणालाही काहीच वाटत नाही.
आपल्या या छोट्या कृतीमुळे आपण असंख्य झाडांच्या कत्तलीला कारणीभूत होत आहोत हे कुणाच्या लक्षात येत नाही. अशी कित्येक उदाहरणं देता येतील जिथे पेपरचा वापर अनावश्यक आणि सढळपणे होतो आहे. एका बाजूला रियूज आणि रिसायकल करणारी पिढी लोप पावत चालली आहे. त्यांच्याकडून घरातील अनेक गोष्टींचा पुनर्वापर होत असे. पुढील पिढीला याचे ज्ञान नक्कीच आहे. पण त्यासाठी आजूबाजूला अजिबात पोषक वातावरण नाही. रुमाल सोबत न घेता हॉटेलमध्ये जेवायला जाताना तिथे टिश्यू पेपर असेलच हे गृहीत धरले जाते. जे प्लास्टिक पिशवीबाबतीत घडते तेच इथेही.प्रत्येक व्यक्तीने स्वत:सोबत रुमाल ठेवायला सुरू केलं तर आपण पर्यावरण समतोल राखण्यासाठी एका छोट्या कृतीद्वारे, विशेष हातभार लावू शकतो.- डॉ. रविराज खैरनार, नाशिक
माहितीपूर्ण आणि रंजक प्रवासवर्णन
‘लोकरंग’ मध्ये (१० मे) ‘‘साहेबी’ जगात’ आणि ‘साहेबाच्या देशात’ या गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या आणि राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या दोन पुस्तकांचे सई केसकर यांनी केलेले परीक्षण वाचनीय आहे. या दोन पुस्तकांची नावे एकसारखी असल्यामुळे प्रथमदर्शनी परीक्षण वाचताना गोंधळ उडतो. मात्र त्याचे स्पष्टीकरण लेखात अधोरेखित केल्यामुळे तो दूर होतो. मात्र या दोन पुस्तकांत इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या तपशिलात पुनरुक्ती असण्याची शक्यता आहे.
तसेच भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळून आता पाऊणशे वर्षांपेक्षा जास्त काळ लोटल्यामुळे भारतीयांनी आता या ‘साहेबी’ मानसिकतेतून बाहेर पडायला हवे. भारतानेही या कालखंडात पुष्कळ प्रगती केली असून, विशेषत: लोकशाही व्यवस्था टिकविली आहे. युरोप, अमेरिकेत प्रेक्षणीय स्थळे खूप आहेत. तेथील नागरिक विज्ञानवादी आणि व्यवहारवादी आहेत. त्यामुळे गिरीश कुबेर यांचे प्रवासवर्णन माहितीपूर्ण आणि रंजक तर आहेच शिवाय एक ज्येष्ठ लेखक, पत्रकार या भूमिकेतून त्यांच्या लेखनात निरीक्षणे आणि बारकावा जाणवतो. विशेषत:
When in Rome behave like Romans हे त्यांचे म्हणणे पटण्यासारखे आहे. मात्र अनिवासी भारतीयांनी परदेशात ‘Ghetto System’ मध्ये राहू नये. शक्य तितके तेथील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जीवनात मिसळून जावे. मात्र लेखिकेने म्हटल्याप्रमाणे, युरोप, अमेरिकेत होत असलेला अतिरिक्त उजव्या विचारसरणीचा उदय हा उदारमतवादाला छेद देतो. त्यामुळे जागतिकीकरणाची चाके उलटी फिरताना दिसतात. ही बाब चिंतनीय आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यात भरच पडली आहे.- डॉ. विकास इनामदार, पुणे
उत्तम लेख
‘लोकरंग’मध्ये (१० मे) अंजली चिपलकट्टी यांचा ‘निसर्गयात्री’ हा लेख वाचला. लेख खूप आवडला. लेखाच्या शेवटास केलेले निर्भय निरीक्षण तर अप्रतिम… आपल्याकडे गौरवीकरण करण्याची सवय आहे. ॲटनबरोंनी शतकी जीवन वाटचालीत सुटलेले संदर्भ अचूक नोंद करून वैज्ञानिक दृष्टिकोन कायम ठेवला. मी स्वत: त्यांच्या अनेक फिल्म न चुकता पाहतो व अनेकदा त्यात आदिम वस्ती व निसर्गाबाबत निरीक्षण ते करत नाहीत. परंतु असा मौलिक दस्तऐवज करताना सर्वसमावेशक दृष्टिकोन आवश्यक असतो.- रंजन र. इं. जोशी, ठाणे</p>
‘लोकरंग’मधील (१० मे) अंजली चिपलकट्टी यांचा सर डेव्हिड अटेनबरो यांच्यावरील ‘निसर्गयात्री’ हा छान असा माहितीपर आणि विचार करायला भाग पाडणारा लेख आवडला. लेखिकेने डेव्हिड अटेनबरो यांच्या नुसत्याच स्तुत्य कार्यावरच नाही, तर न पटणार्या गोष्टीवरही उत्तम भाष्य केले आहे. सर डेव्हिड अटेनबरो यांनी जगभरात प्रवास करूनही कधीही कार चालवली नाही, कारण बर्याच वेळेस ते ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास व्हायचे.
त्यांना आजही ईमेलपेक्षा लोकांना पत्र लिहायला जास्त आवडतं. शेवटी, डेव्हिड अटेनबरो हे केवळ एक व्यक्ती नाहीत; ते पृथ्वीच्या जिवंत अंतरात्म्याचा आवाज आहेत. त्यांनी आपल्याला शिकवलं की निसर्गावर प्रेम करणे म्हणजे स्वत:च्या भविष्यासाठी लढणं. त्यांच्या कार्यामुळे लाखो लोकांच्या मनात पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली आणि पृथ्वीबद्दल आदर वाढला. मानव जातीला जर खर्या अर्थाने टिकून राहायचे असेल तर डेव्हिड अटेनबरो यांच्यासारख्या विचारवंतांचा संदेश समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पृथ्वी आपली मालमत्ता नाही; आपण तिचे केवळ तात्पुरते पाहुणे आहोत.-मयूर कोठावळे, पवई
गावागावांत देवराई
‘लोकरंग’मध्ये (१७ मे) आसाराम लोमटे यांचा ‘उभ्या जन्माची रखरख!’ हा लेख वाचला. लेखाचा विषय, आशय, लेखनशैली आणि शब्दचित्रण वैशाखातील काहिलीला सजगतेने अधोरेखित करणारे आहे. लोमटे यांची साहित्य आणि पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रावर हुकमत असल्याने त्यांच्या लेखनातील आशय बोलका आणि भाषेला धार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील उन्हाचे हे भीषण संकट म्हणजे दरवर्षी येतो हा तप्त उन्हाळा अशीच आहे.
मान्सूनच्या सरी कोसळल्या की या उन्हाच्या तीव्रतेच्या झळांची जागा पाऊस, नापिकी, दुबार पेरणी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ बेमालूमपणे घेतो. एकूणच या तिन्ही प्रदेशांसाठी शासकीय, प्रशासकीय, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था आणि शाळा-महाविद्यालय स्तरावर वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, कुर्हाडबंदी, बारमाही नद्यांचे पाणी व्यवस्थापन, कालव्याच्या पाण्याचे व्यवस्थापन यावर स्वतंत्रपणे विभागाची स्थापना करून सखोलपणे काम करावे लागेल.
दरवर्षी उन्हाच्या तीव्रतेने होणार्या मृत्यूंचे प्रमाण वाढत जात आहे. शारीरिक आणि मानसिक परिणाम होत आहेत. हातावर पोट असणार्या गरिबांना पाणी आणि रोजगार यांच्यात मेळ घालता येत नाही. शिवाय दवाखान्यातून होणारी लूट वेगळीच. राजकीय सत्ताधार्यांकडून नैसर्गिक स्रोत आणि नैसर्गिक संसाधने यांचा होणारा गैरवापर ही समस्याही उन्हाच्या तीव्रतेएवढीच भीषण आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी राज्य पातळीवर मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशबरोबरच कोकणच्या काही भागांत युद्धपातळीवर वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन चळवळ घराघरापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.- डॉ. सुधीर इंगळे, परभणी</p>
उदासीन नेते
‘लोकरंग’मध्ये (१७ मे) आसाराम लोमटे यांचा ‘उभ्या जन्माची रखरख!’ हा लेख वाचताना हे वर्णन देशाच्या सर्वांत प्रगत राज्यातील आहे किंवा सुदान, सोमालियातील आहे हे समजेना. पाच-सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजधानीत येऊ घातलेल्या नवीन हायटेक विमानतळाचे उद्घाटन पाहून, तसेच पंधरवड्यापूर्वीच त्याहून अधिक हायटेक तंत्रज्ञान वापरून लोकार्पण झालेल्या मिसिंग लिंकचा सोहळा डोळ्यापुढे आला. त्याच महाराष्ट्रातील जनतेचे पाण्यावाचून होणारे हाल पाहून प्रश्न पडतो, प्रगतीची आमची व्याख्या काय आहे?
१९७२ सालात महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ पडला होता. तेव्हाचे वर्णन वाचून आजही अंगावर काटा येतो. आज २०२६ मध्ये काय वेगळे चित्रे आहे? राष्ट्रप्रथम, पूछता है भारत तसेच जिहादी मनोविकाराने पछाडलेला संप्रदाय या वास्तवतेपासून दूर आहे किंवा कसे हे समजायला मार्ग नाही. नवनवीन रस्ते, पूल यांच्या कंत्राटांची शेकडो कोटींच्या निविदा कोणतीही चर्चा न करता मंजूर करणारे लोकप्रतिनिधी राज्यातील जनतेस दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यास बांधील नसावेत ही अत्यंत गंभीर बाब; परंतु आज ना उद्या शासनास या परिस्थितीची जबाबदारी घ्यावीच लागेल, तिला सामोरे जावेच लागेल.- शैलेश न. पुरोहित, मुंबई
विकासाचे लोभस चित्र आणि कटू वास्तव
‘लोकरंग’मध्ये (१७ मे) आसाराम लोमटे यांचा ‘उभ्या जन्माची रखरख!’ हा लेख ग्रामीण जीवनाचे वास्तवदर्शी चित्रण करणारा आहे. पाण्यासाठी वणवण भटकणार्या ग्रामीण महिला, मुली, छोटी बालके नजरेस पडली की संवेदनशील व्यक्ती हळवी होते. विकासाचे चित्र लोभस उभे केले जात असले तरी वास्तव मात्र वेगळेच आहे याची प्रचीती ग्रामीण जीवनात पदोपदी जाणवते. पाण्यासाठी भटकणारी जनावरे, त्यांची राखण करणारे गुराखी, ओसाड पडलेली माळराने यांमुळे दूरवर चार्यासाठी भर उन्हात करावी लागणारी पायपीट… घशाला तप्त उन्हामुळे पडणारी कोरड… हे चित्र विचलित करते. आसाराम लोमटे ग्रामीण जीवन ज्या पद्धतीने उभे करतात ते हळव्या मनाला चटका लावणारे असते.
शहरेही आता याला अपवाद नाहीत. रोजगाराच्या शोधात आलेले मजूर, रस्त्यांवर असलेले त्यांचे संसार, कामाच्या ठिकाणी छोटासा पडदा किंवा पाल टाकून त्यात छोटी बालके ठेवली जातात. पोटासाठी आणि जगण्यासाठी त्यांची सुरू आलेली धडपड बघून विकासगंगेच्या तीरापासून हा घटक किती तरी दूर अंतरावर असल्याची जाणीव होते. थंड पाण्याची चैन त्यांना परवडणारी नसते. पंचेचाळीस डिग्री तापमानात घामाच्या धारा अंगावर झेलत आईवडील आणि मूल प्रत्येक कामाच्या जागी आढळतात.
शहर असो की ग्रामीण भाग, विकासक, बिल्डर लॉबीने राज्यकर्ते, प्रशासन व्यवस्थेतील अधिकारी यांच्या संगनमतातून विविध प्रोजेक्टच्या नावावर जमिनी ओसाड करून ठेवल्या आहेत. सावलीसाठी झाडे उरली नाहीत. ग्रामीण जीवनातील लोक आज जे पाण्यासाठी भोगत आहेत तीच स्थिती नियोजनाअभावी शहरांवर येणार नाही अशी खात्री बाळगणे येणार्या काळात मृगजळ ठरावे अशीच सर्वत्र स्थिती आहे.-अनिरुद्ध कांबळे, नागपूर</p>
स्मरणातला दुष्काळ
‘लोकरंग’मध्ये (१७ मे) आसाराम लोमटे यांचा ‘उभ्या जन्माची रखरख!’ हा लेख जनतेचे डोळे उघडणारा आहे. मी स्वत: १९५२ सालचा दुष्काळ अनुभवला आहे. सध्या त्यात फार काही फरक आहे असे जाणवत नाही. जोपर्यंत झाडे तोडणे बंद होत नाही व इतर गरज नसलेल्या योजना थांबत नाहीत तोपर्यंत उन्हाळ्यात लोकांची तहान भागणार नाही. काही ठिकाणी तर धर्माच्या नावावर झाडे तोडणे सुरू आहे. आम्ही तर हिंगाच्या डबीने पाणी बादलीत भरलेले आठवत आहे. पण तेव्हा इतका मीडिया नव्हता म्हणून दुष्काळाबद्दल लोकांना कळले नाही. मनमाड व नगर भागातील जुन्या लोकांना हे आठवत असेल. हे किती वर्षे चालू राहणार देवालाच माहिती. तोपर्यंत लोक तहानलेले असणार.- श्रीधर विष्णू भावे, गोरेगाव
