आईने आगगाडीची तिकिटं काढलीच होती, पण एक दिवस बाबा बाहेरून आले आणि म्हणाले, ‘‘आपण १४ तारखेला विमानानं जायचं.’’ मग काय, आमची एकदमच गडबड सुरू झाली. मला तर आईसारखंच प्रत्येक गोष्टीत बोलावंसं वाटू लागलं. मी स्वराला लगेचच सांगूनही टाकलं. ती सुट्टीत पनवेलला जाणार होती आणि मी तर एकदमच काश्मीरला. मला तर भारीच वाटत राहिलं. माझं सामान कधीचंच भरून तयार होतं. आता अजून दोन दिवस तयारीला मिळणार होते. मग मी माझी डायरी, पेन सगळं सगळंच घेतलं. माझा गोलूसुद्धा.

बाबांचं सगळंच एकदम भारी असतं. टी-टू म्हणायचं म्हणाले. सांताक्रूज नाही आणि विमानतळपण नाही. आणि हो, विमानही नाहीच म्हणायचं. फ्लाइट… पहाटे तीन वाजता ओलाने आम्ही एकदमच टी-टूला निघालोही.

माझा गोलू गळ्यात घालून मोठ्या ऐटीत चेक इन करून मी बोर्डिंग पास घेतला. मी तशी काय पहिल्यांदा जात नव्हते काही विमानाने… अहं… फ्लाइटने. पण आधीच्या वेळी मी फक्त सहा वर्षांचीच होते ना. पहिलीत! आता एकदमच नववीत गेलेय. मी मोठ्ठं विमान पोटाखालून पाहिलं. सामान भरत होते पोटात पोर्टर… माझी यूनिकॉर्नची सूटकेस त्यांनी विमानात चढवली ती मला एकदमच श्रीनगरला बेल्ट टूवर दिसली. विमान वर उडताना मला काही त्रास झाला नाही. स्वराने मला काहीच्या काही सांगितलं होतं. पण बरं झालं मी डोळे गच्च मिटून घेतले नव्हते ते. नाहीतर मुंबईचा बर्ड आय व्ह्यू सोडून शुभ्र कापूस ढगांचा गालीचाच डायरेक्ट दिसला असता.

काश्मीरमध्ये पोहोचायच्या आधीच हिमालय पर्वतावरचा बर्फ बघून माझे तर डोळे दिपलेच. आणि मग गुलाबाचे केवढे रंग आणि आकार… पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात ना काश्मीरला. हाऊस बोटीत राहायची आईची हौस तर फिटलीच आणि छोट्या शिकाऱ्यातून राइड घेताना मला तर एकदमच भारी वाटायला लागलं. बर्फात खेळताना माझी तर दोनदा घसरगुंडीच झाली. आईचीपण… आणि बाबा म्हणजे एकदम ग्रेटच. शेर्पासारखे ऐटीत बर्फावर चढले. आईने तर एकदा एक छोटंसं लोकरीनं गच्च भरलेलं पिल्लूच धरलं होतं.

काश्मीरचं निसर्गसौंदर्य एकदमच भारी आहे. त्याच्याहून भारी मला वाटले ते आपले जवान. थंडी-वाऱ्याची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावताना नेहमीच दिसत होते. दाललेकच्या काठावर, मुघल-निशात बागांमध्ये, पहलगामच्या उंचीवर, गुलमर्ग-सोनमर्गच्या बर्फात आपले सैनिक आपल्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी तत्पर होते. त्यांच्यामुळे मला एकदमच छान वाटत राहिलं. सगळ्यांहून ग्रेट ग्रेट तर तेच आहेत. मी तसं माझ्या गोलूला, आईला आणि बाबांनाही एकदमच सांगून टाकलं. बाबांनी तर एकदमच जयघोष केला- भारतमाता की जय! मी गोलूला गळ्यात घालून माझे दोन्ही हात वर केले आणि एकदमच दोन्ही हातांनी सॅल्यूट करून टाकला.

इयत्ता- ९वी, बालमोहन विद्यामंदिर, दादर, मुंबई</p>

Story img Loader