सकाळ झाली की आमचा उमेशमामा फिरून त्याच्या घरी परत जाताना आमच्याकडे एक चक्कर टाकतोच. अगदी रोज नाही, पण मूड आला की तो येतो. आम्हालाही आनंद होतो आणि आई तर खूशच होते त्याला पाहून. तिचा धाकटा आवडता प्रेमळ भाऊ आमच्याकडे आला की ती तिच्या माहेरच्या गोष्टी करते. त्यातून तिला माहेरी कोणाला काही हवं-नको ते कळतं व आई आणि उमेशमामा त्यांच्या मदतीला धावतात. दोघेही अतिशय प्रेमळ. उमेशमामा तसा खूपच हळवाही आहे. रस्त्यात एखादी गाय नुसतीच उभी राहिलेली दिसली की तो जवळपासच्या भाजीवालीकडून एखादी पालकची जुडी विकत घेऊन तिला भरवतो. म्हणतो, ‘‘गायीच्या डोळ्यातले ते गरीब भाव पाहून माझं मन द्रवतं.’’ तो दिसला की रस्त्यावरचे कुत्रे धावत येऊन त्याच्या अंगावर उड्या मारतात. त्यांना तो रस्त्यात बिस्किटे टाकत जात नाही तरीही त्यांना उमेशमामा आवडतो.
त्या दिवशी उमेशमामा आमच्याकडे असाच फिरून घरी परत जाताना आला. चहा-नाश्ता करायला बसला. उमेशमामाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो कधीही अन्नाला नावं ठेवत नाही. आम्हीच मीठ कमी असलं, जास्त तिखट झालं की लगेच आईला सांगतो, पण उमेशमामा मात्र काही बोलणार नाही. आई म्हणायचीही पुष्कळदा, ‘‘उमेश म्हणजे साने गुरुजींचाच अवतार आहे.’’ ‘‘काय रे, आज असा उदास का दिसतो आहेस?’’ आईनं विचारलं.
‘‘तसं काही नाही गं, फिरून परत येताना तो एक माणूस दिसला रस्त्यात. खूप गरीब होता. केसांच्या जटा झालेल्या, अंगात फाटके मळकट कपडे घालून शून्यात पाहात बसला होता. त्याला द्यायला माझ्या हातात काहीच नव्हतं. पैसे देऊनही काही उपयोग होणार नव्हता. काही दिवसांपूर्वी मी त्याला एका हॉटेलच्या दारात पाहिला होता. एक फाटकी गोधडी होती त्याच्याजवळ. तिथेच कोणीतरी दिलेला शिळा पावही पडला होता. तो पाव खाऊन काय त्या एवढ्या मोठ्या माणसाचं पोट भरणार!’’ उमेशमामा रडवेलाच झाला होता असं म्हणायला हरकत नाही. त्या दिवशी त्यानं नाश्ता केलाच नाही.‘‘अरे तू उपाशी राहून त्याचं पोट भरणार का? त्याचं नशीबच तसं, असं म्हणून त्या वेळेला जमेल तशी मदत करायची आणि पुढे जायचं. तू असा सगळ्यात गुंतायला लागलास तर कसं होईल तुझं!’’ आई त्याला असं जरी म्हणाली तरी तिनं स्वत:चेच डोळे पुसले.
मामा घरी गेला, पण माझ्याही मनात तो रस्त्यावरचा माणूस घर करून राहिला. एक दिवस मी ब्रेड आणायला गेलो असताना मला मामा त्या माणसाला न्याहाळत उभा असलेला दिसला. पण उमेशमामाला मी दिसलो नाही. मी तसाच झाडाआडून त्या दोघांना बघत उभा राहिलो. उमेशमामाने खिशातून पाचशे रुपयांची नोट काढून त्या माणसाला दिली. त्या माणसाने ती घेतली आणि बाजूला ठेवली. मामाच्या लक्षात आलं असावं बहुधा की त्याला त्याचं महत्त्वच कळलेलं नव्हतं. उगाचच दुसरंच कोणीतरी ती नोट उचलेल असं त्याच्या मनात आलं असावं. मामाने ती नोट उचलून पुन्हा त्याला दिली. पण तो दुसरीकडेच पाहात राहिला आणि त्याने ती नोट घेतलीच नाही. उमेशमामाने ती नोट खिशात घातली आणि तो निघून गेला. त्याला कदाचित त्यातली फोलता लक्षात आली असावी, असं माझ्या मनात आलं. मी घरी आलो आणि आईला सर्व वृत्तांत दिला. आईने कपाळाला हात लावला आणि ती कामाला लागली.
काही दिवसांनंतर मी दूध, ब्रेड वगैरे गोष्टी घेऊन परतत असताना मला उमेशमामा इडली, पोहे वगैरे विकणाऱ्या गाडीजवळ उभा असलेला दिसला. मी त्याच्याजवळ गेलो आणि हसत हसत म्हणालो, ‘‘आता कळलं मला तू आमच्या घरी कधी कधी का खात नाहीस ते!’’ यावर उमेशमामाही हसला आणि म्हणाला, ‘‘तसं नाही रे, मी एक तोडगा काढला आहे त्या गरीब माणसाने खावं म्हणून. मी या खाद्यापेये करून विकणाऱ्याला महिन्याचे पैसे देऊन सांगितले आहे की रोज एक प्लेट इडली किंवा पोहे त्या गरिबाला द्यायला.’’ मामा मान खाली घालूनच म्हणाला. मामाच्या मनातलं दु:ख मी समजू शकत होतो आणि त्यातून तो होता माझ्यापेक्षा मोठा. मी त्याला यावर काय सांगणार! आम्ही दोघे आपआपल्या घरी गेलो. उमेशमामाविषयीचा आदर माझ्या मनात आणखीच वाढला.‘‘हा इतका कसा हळवा!’’ माझ्या मनात आलं. पुन्हा काही दिवसांनी उमेशमामा मला त्या खाण्याच्या गाडीपाशी भेटला. गाडीवाला त्याला त्याने दिलेले पैसे परत देत होता.‘‘काय झालं?’’ मामानं त्याला विचारलं.
‘‘साहेब, तो खात नाही. कधी मनात आलंच तर थोडंसं चिवडतो. तितकं तर मी देतोच त्याला. हे घ्या तुमचे पैसे.’’ गाडीवाला म्हणाला.उमेशमामानं अनिच्छेनं पैसे खिशात टाकले आणि माझ्याकडे बोट दाखवत म्हणाला, ‘‘या माझ्या भाच्याला एक प्लेट पोहे दे. त्याला खूप आवडतात. खा रे,’’ असं म्हणत त्याला त्या प्लेटचे पैसे देऊन तो निघून गेला.असेच काही दिवस सरले आणि उमेशमामा फिरून आमच्या घरी आला. गप्पा मारता मारता माझ्या मनात जे बरेच दिवस खदखदत होतं त्याला वाचा फोडलीच.‘‘उमेशमामा, तुला त्या माणसाविषयी इतकी करुणा का? असे कितीतरी गोरगरीब आपल्याला रोज भेटत असतात. आपण काय त्यांना पैसे, खाणं वाटत फिरत नाही. या माणसाविषयीच तुला इतकी करुणा का?’’ उमेशमामा एकदम गंभीर झाला आणि सांगू लागला.
‘‘अरे, आम्ही शाळेत होतो तेव्हा आमच्या वर्गात एक मुलगा होता तो माझा मित्र होता. आम्ही रोज एकत्र असायचो. एकमेकांच्या बरोबर खेळायचो, एकमेकांच्या घरी जायचो. कितवीत होतो आठवत नाही, पण असू आठवी-नववीत. ‘तो’ एके दिवशी शाळेत आलाच नाही. दुपारी शाळेत ऑफिसच्या दारात त्याचे आई-वडील दिसले. सगळेच थोडे चिंतेत होते. त्याच्या आईनं मला ओळखलं आणि विचारलं, ‘‘तुला ठाऊक आहे का प्रदीप कुठे आहे? तो कालपासून घरी आला नाहीये.’’हे ऐकून मी उडालोच. मला माहीत नसल्याचं मी त्यांना सांगितलं. थोड्याच वेळात प्रदीप गायब झाल्याची बातमी शाळेत पसरली.
शाळेत पोलीस आले आणि चौकशी करून गेले. आम्ही मुलं खूपच घाबरलो होतो. कोणाचंच लक्ष कशात लागत नव्हतं. असे बरेच दिवस गेले, पण प्रदीप काही पोलिसांना सापडत नव्हता. पुढे बरेच महिने गेले. वर्षंही लोटली, पण प्रदीप सापडलाच नाही. माझे डोळे सतत त्याला शोधत असायचे. पण तो मला कुठेच दिसला नाही. कधीच नाही. त्याचे आई-वडीलही त्याला शोधू शकले नाहीत. हळूहळू वर्गातही त्याच्याविषयी बोलणं बंद झालं. आमची शाळा संपली. आमचं कॉलेजचं शिक्षणही आटोपलं आणि आम्ही इथे- तिथे पांगलो. पण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात प्रदीप सदैव होताच. मी त्याला विसरू शकलो नाही.
माझ्या वयाच्याच रस्त्यावरच्या कुठल्याही फाटक्या माणसाला बघितलं की मला वाटतं, ‘‘हा प्रदीप तर नाही ना!’’ उमेशमामा थोडा वेळ शांत बसला. मीही शांत बसून कधीही न पाहिलेल्या प्रदीपचा विचार करू लागलो. उमेशमामा पुढे सांगू लागला, ‘‘तेव्हापासून रस्त्यात मला माझ्या वयाचा रस्त्यावरील फाटका माणूस दिसला की मी तो प्रदीप आहे का ते पाहतो. त्याला त्याचं नावही विचारतो. प्रत्येक वेळी मला वाटतं की तो प्रदीप असेल आणि मला ओळखेल. पण आम्ही एकमेकांना कसं ओळखणार इतक्या वर्षांनी! या माणसाला खाऊ घातलं की प्रदीपला दिल्यासारखं वाटतं मला. म्हणून देतो झालं त्याला.’’ आई स्वयंपाकघरात डोळे पुसताना दिसली. म्हणाली, ‘‘नाही विसरला उमेश प्रदीपला.’’ उमेशमामाने पुढ्यातला चहा संपवला आणि अच्छा करून गेला. मी तसाच उगाचच पाय हलवत बसलो. आता मीही कधी न पाहिलेल्या प्रदीपच्याच विचारात गुरफटून गेलो. प्रदीप इतकी वर्षं बेपत्ताच आहे, पण उमेशमामाच्या मनात मात्र त्यानं कायमचं घर केलं आहे.
vidyadengle@gmail.com