डॉ. राधिका विंझे
आईला जिन्यातून जड सामान घेऊन येताना ईशानं पाहिलं. मदत करूया म्हणून ईशा पटकन आईकडे गेली आणि तिच्या हातातली पिशवी उचलली. पण पिशवी एवढी जड की ईशाला काही केल्या उचलवेना. ईशा आईला म्हणाली, ‘‘एवढं जड सामान असूनसुद्धा पिशवी दिसायला छोटी कशी काय? सकाळी आजोबा गावाहून आले त्यांची एवढी मोठी बॅग होती, पण ती मात्र मी सहज उचलली.’’ बोलता बोलता दोघी घरी आल्या. ईशाच्या डोक्यातली ही शंका काही केल्या जात नव्हती. न राहवून तिनं आजोबांना याबद्दल विचारलं. आजोबा म्हणाले, ‘‘अगं ईशू, माझी बॅग दिसायला मोठी होती, पण त्यातलं सामान हलकं होतं. आईची पिशवी दिसायला छोटी, पण त्यातलं सामान जड होतं.’’
ईशा आणखीच विचारात पडली. मग आजोबांनी फोड करून सांगितलं, ‘‘पदार्थाला वस्तुमान ( mass) व आकारमान ( volume) असे दोन गुणधर्म असतात. पदार्थात किती द्रव्य ( matter) सामावलं आहे ते वस्तुमान आणि पदार्थातील द्रव्य किती जागा व्यापतं ते आकारमान. एखाद्या वस्तूचं वस्तुमान कमी, पण आकारमान जास्त असतं. उदा. आपण फुगा हवा भरून मोठा फुगवला तरी आपण तो हातात सहज पकडू शकतो. कारण फुग्यातील हवेचे वस्तुमान कमी, पण आकारमान जास्त आहे. पण त्याच मोठ्या आकाराचा दगड मात्र धरायला कठीण कारण दगडाचे वस्तुमानसुद्धा जास्त आहे.’’
ईशाला तिच्या शंकेबद्दल हळूहळू उकल झाली. मग तिनं आजोबांना विचारलं, ‘‘म्हणूनच, दप्तरात वह्या-पुस्तके भरली की ते जड होतं. किंवा नेहमीच्या हवेच्या फुग्यात होळीच्या वेळी पाणी भरलं की तो जड होतो. पण हवा भरलेला एक छोटा फुगा आणि एक मोठा फुगा यात मात्र फक्त आकारमान वेगळं असतं. तसेच पाण्याची रिकामी बाटली उचलायला सोपी, पण त्यात पाणी भरलं की ती जड होते?’’
आजोबा म्हणाले, ‘‘एकदम बरोबर. हे नवीन काहीतरी समजून घेऊन जड सामान उचलून आणल्याने दमलेली ईशा पाणी प्यायला पळाली.’’
radhikavinze94@gmail.com
