scorecardresearch

सोनचाफा

सोनचाफ्याची पाने हिरवी आणि आकाराने मोठी असतात. या पानांपासूनदेखील तेल काढले जाते.

Michellia Champaca Flower
या फुलांना खूप सुंदर सुगंध येतो. फुले सुकली तरी हा सुगंध बरेच दिवस टिकून राहतो.

रूप, रंग आणि गंध या सगळ्याच बाबतीत फुलांमध्ये तुलना सुरू केली तर सोनचाफा  पहिल्या रांगेत आपले मानाचे स्थान राखून असेल यात शंकाच नाही. सोनचाफ्याचे शास्त्रीय नाव- ‘मायकेलीया चंपका’ (Michelia champaca). भारतीय वंशाचा एक सदाहरित वृक्ष. अनादि काळापासून भारतीय साहित्य आणि आयुर्वेदात सोनचाफ्याचे संदर्भ सापडतात. सोनचाफ्याचा सुगंध अक्षरश: वेड लावतो. रूप आणि रंगदेखील तसाच मनाला वेड लावणारा. पिवळ्याधम्मक केशर किंवा हापूसच्या आंब्याच्या रंगाची ही फुले खूप सुंदर दिसतात. सफेद, फिक्कट पिवळा ते गडद पिवळा अशा वेगवेगळ्या रंगछटांमध्ये सोनचाफ्याची फुले आढळतात. गंमत म्हणजे बाजारात आपण सोनचाफ्याची जी फुले पाहतो, ती फुले नसून सोनचाफ्याच्या कळ्या असतात. कळी पूर्ण उमलली की पाकळ्या गळायला सुरुवात होते. म्हणून कळ्यांचीच विक्री केली जाते. उत्तरेला हिमालयात सोनचाफ्याचे वृक्ष आढळतात. भारतात जवळपास सगळीकडेच या वृक्षाची लागवड केलेली दिसून येते. अगदी १० अंश सेल्सियस तापमानापासून ते ३५-४० अंश सेल्सियस तापमानातदेखील सोनचाफ्याचे झाड उत्तम वाढते. त्याची उंची साधारण ५० मीटपर्यंत असू शकते. सदाहरित असल्याने सावलीसाठी तर हा वृक्ष उपयोगी येतोच; परंतु त्याला येणाऱ्या सुगंधी व सुंदर फुलांमुळे घराच्या, शाळेच्या, मंदिराच्या परिसरात तसेच उद्यानात लागवड करताना सोनचाफ्याला झुकते माप मिळते. याची फुले मोठी असून, देठ छोटा असतो. फुले कधीच गुच्छात येत नाहीत. फुलात लहान-मोठय़ा मिळून साधारण १५-२० पाकळ्या असतात. (या पाकळ्यांना खरे तर पाकळ्या म्हणता येणार नाही, कारण त्या फुलाच्या Calyx  (फुलाच्या बाहेरील भाग) आणि Corolla  (पाकळ्या) यांच्या मिळून बनलेल्या असतात. त्यांना वनस्पतीशास्त्रात टेपल (Tepals) असे म्हणतात.)

या फुलांना खूप सुंदर सुगंध येतो. फुले सुकली तरी हा सुगंध बरेच दिवस टिकून राहतो. हार, वेण्यांमध्ये तसेच आरास करण्यासाठी ही फुले वापरली जातात. या फुलांपासून सुगंधी तेल तयार केले जाते. अत्तर, अगरबत्ती, साबण यांमध्ये ते वापरले जाते. शिवाय या तेलाचा पुष्पौषधीमध्येदेखील वापर केला जातो. सोनचाफ्याचा आल्हाददायक सुगंध तणाव दूर करून वातावरण प्रसन्न करतो. या झाडाच्या आसपास हा सुगंध नेहमी दरवळत असतो. सोनचाफ्याची फुले आणि कळ्या औषधी असून ती अनेक रोगविकारांमध्ये वापरली जातात. तापविकारावर ही फुले गुणकारी असून जळजळ, मळमळ यांवरदेखील ती वापरली जातात. याच्या कळ्या काचेच्या बाटलीत भरून त्यात पाणी घालून साठविल्या जातात. त्या वर्षांनुवर्षे टिकतात. शोपीस म्हणून या बाटल्या घरात, कार्यालयात ठेवल्या जातात.

सोनचाफ्याची पाने हिरवी आणि आकाराने मोठी असतात. या पानांपासूनदेखील तेल काढले जाते. पोटात होणारी जळजळ तसेच पोटशूळावर पानांचा रस मधातून दिला जातो. तसेच पानांचा काढा सांधेदुखीवर गुणकारी आहे. याच्या झाडाचे खोड मोठे असून त्याचा रंग काहीसा पांढरट किंवा राखाडी असतो. तापविकारांवर याच्या सालीचे चूर्ण वापरले जाते. तसेच मधुमेहावरदेखील याच्या सालीपासून बनवलेल्या काढय़ाचे प्रयोग केले जातात. सोनचाफ्याची मुळे रेचक असून, पोट साफ होण्यासाठी जी औषधे बनविली जातात त्यात यांचा वापर केला जातो.

याचे लाकूड मजबूत असल्याने त्याचा वापर खेळणी आणि शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी केला जातो. फूल गळून पडले की याला छोटय़ा छोटय़ा फळांचे घोस येतात. प्रत्येक फळात एक बी असते. याच बियांपासून नवीन रोपे तयार केली जातात. सोनचाफ्याचे कलमदेखील करतात. बियांपासून केलेल्या झाडाला फुले येण्यासाठी साधारण १०-१२ वर्षांचा कालावधी लागतो. पण कलमी झाडाला लवकर फुले येतात. साधारण वर्षभर याला फुले येतात. पण पावसाळ्यात विशेष बहर असतो. कळ्या काढायला सोपे पडावे म्हणून याची वाढ नियंत्रित ठेवली जाते. त्यासाठी त्याची छाटणी करतात. पायांच्या टाचांना ज्या भेगा पडतात त्यासाठी  सोनचाफ्याच्या बियांपासून औषध तयार केले जाते. सोनचाफ्याची फुले भगवान विष्णूच्या पूजेत वापरली जातात. शंकराच्या पूजेत मात्र ही फुले वापरत नाहीत असा संदर्भ आढळतो.

वर्षभर फुले येत असल्यामुळे आणि त्यांना मागणीदेखील असल्यामुळे याची शेताच्या बांधावर, घराच्या आवारात, शाळा परिसरात लागवड करून फुलेविक्री केल्यास फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांनी याचा विचार करायला हरकत नाही. आपल्याही सोसायटीची शोभा वाढवायची असेल आणि वातावरण प्रसन्न ठेवायचे असेल तर सोनचाफ्याची एखाद् दोन कलमं लावण्यास काही हरकत नाही.

भरत गोडांबे bharatgodambe@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Michellia champaca flower

ताज्या बातम्या