प्राची मोकाशी mokashiprachi@gmail.com

‘द ट्रॅफिक लाइट हॅज टर्नड् टू रेड,

टर्नड् टू रेड, टर्नड् टू रेड..’

काकाच्या मोटरसायकलच्या पाठीमागच्या सीटवर बसून चिंगी मोठय़ाने गात होती. 

‘‘चिंगे, आज एकदम बालगीत वगैरे? आणि एवढं ओरडून का म्हणतेयस? तब्ब्येत ठीक आहे नं तुझी?’’ काकाने तिला चिडवलं.

‘‘काका, मी बरी आहे. ही नर्सरी ऱ्हाइम मी खास तुझ्यासाठी गातेय! तुला ऐकू यावं म्हणून मुद्दाम मोठय़ाने गातेय!’’

‘‘का बुवा?’’

‘‘कारण समोरचा लाल सिग्नल पडतोय.. तर थांब थोडा. नाही तर पिवळा आहे म्हणून मोटरसायकलचा स्पीड कमी करायच्या ऐवजी वाढवशील आणि सिग्नल तोडून जाशील भर्रकन् पुढे निघून. काल पण तोडला होतास तू सिग्नल.’’ चिंगी थोडी वैतागून म्हणाली.

‘‘त्यात काय एवढं?’’ म्हणत काकाने खरोखरच ‘वृमऽऽऽरू’ करत मोटरसायकलचा स्पीड वाढवत सिग्नल तोडला. जोरात स्पीडमध्ये मोटरसायकल पुढे नेत त्याने घराच्या बिल्डिंगपाशी पोहोचल्यावरच ती अजस्त्र मोटरसायकल थांबवली.

‘‘आली की नाही मज्जा?’’ काका मोटरसायकल स्टॅंडला लावत म्हणाला.

‘‘मज्जा? काका, मी नाही पुन्हा बसणार कधी तुझ्या मोटरसायकलवर!’’ म्हणत चिंगी धडाधड पायऱ्या चढत घरी गेली. ती भयंकर चिडली होती. आजोबांनी दार उघडलं तसं तिने भराभर चपला काढल्या आणि डोक्यावरचं हेल्मेट काढून कपाटात ठेवलं. तोपर्यंत काका तिथे आलाच होता. त्याला बघून न बघितल्यासारखं करत चिंगी तिच्या खोलीत जायला वळली.

‘‘चिंगे, अशी चिडलीयस का सांगशील?’’ आजोबा तिला थांबवत म्हणाले.

‘‘हा काका..’’

‘‘काय झालं राजू?’’ आजोबांनी विचारलं.

‘‘काही नाही. मी जरा मोटरसायकलचा स्पीड वाढवला तर..’’

‘‘जर्रा..? आजोबा सिग्नल तोडला याने. काल पण तोडला होता. तोही शाळेसमोरचा! आज टीचर मला विचारत होत्या, की काल मला शाळेतून आणायला कोण आलं होतं म्हणून! नेमकं त्यांनी पाहिलं काकाला सिग्नल तोडताना. त्यात हा हेल्मेटसुद्धा घालत नाही कधी!’’ चिंगी वैतागून म्हणाली. एव्हाना आजी तिथे आली.

‘‘अगं चिंगे, तुझ्या काकाला लहानपणापासून सवय होती त्याच्या मित्रांची स्कूटर चालवायची. जेव्हा त्याचं लायसन्ससुद्धा बनलं नव्हतं तेव्हापासून पोलीसमामाला चकवत तो आतल्या आतल्या गल्ल्यांतून चालवायचा स्कूटर. किती ओरडायचो आम्ही त्याला! एकदा त्याची स्कूटर स्किड होऊन चांगलंच खरचटलं, तेव्हा कुठे ते स्कूटर चालवणं थोडे दिवस थांबलं. पण नोकरी लागल्यानंतर मोटरसायकल घरी आली.. आजोबा नको म्हणत होते तरीही! काही लोकांना अनुभव आल्याशिवाय समजत नाही.. आणि दुसऱ्यांच्या अनुभवातून ते शिकत नाहीत!’’ आजी उपहासाने म्हणाली.

‘‘बाबाची पण मोटरसायकल आहे. पण मी बाबाला कधीच नाही बघितलं असं सिग्नल वगैरे तोडताना किंवा स्पीडमध्ये चालवताना..’’ चिंगी उद्गारली.

‘‘चिंगे, तुझा बाबा म्हणजे हरिश्चंद्राचा अवतार आहे! त्याला असलं कधीच जमणार नाही.. ही एक स्टाईल आहे!’’ काका शर्टाची कॉलर ताठ करत म्हणाला.

‘‘राजू, मजामस्ती सोड. चिंगी म्हणते ते अगदी बरोबर आहे. ट्रॅफिकचे काही नियम असतात. आपण ते पाळायलाच हवेत. जरा जपून..’’

आजोबांचा काळजीचा स्वर.

‘‘बाबा, काही नाही होत हो! डोंट वरी..’’ काका त्याची चूक मानायला तयारच नव्हता. मग आजोबा तिथून चूपचाप निघून गेले. ते स्वत: खूप शिस्तप्रिय होते. काकाचं हे वागणं त्यांना नेहमी खटकायचं.

‘‘काका, यू आर इम्पॉसिबल..!’’ चिंगीही हतबलपणे म्हणाली.

चिंगीला घरी सोडून काका पुन्हा बाहेर गेला. आजीने जेवायची पानं घेतली. सगळे जेवायला बसणार इतक्यात दारावरची बेल खणखणली. चिंगीने दार उघडलं. बाहेर काका उभा होता.

‘‘काय रे? कितीदा बेल मारतोस? काही विसरलास का? मित्राबरोबर जाणार होतास नं जेवायला? आत्ताच तर बाहेर पडला होतास?’’

चिंगीच्या प्रश्नांची सरबत्ती. इतक्यात तिला काकाच्या पांढऱ्याशुभ्र शर्टाच्या बाहीवर लाल डाग दिसले. त्याच्या हातातला रुमालही थोडा लाल होता.

‘‘अरे, हे काय? कुठे लागलं का? काय झालं?’’

‘‘काही झालं नाही गं!’’ वैतागलेल्या स्वरात काका घरात गेला आणि तडक कपाटातून त्याचे घरचे कपडे घेऊन तो आंघोळीला पळाला. कुणालाच काही समजेना. थोडय़ा वेळाने काका आंघोळ करून बाहेर आला.

‘‘राजू, तू जातोस काय.. लगेच घरी येतोस काय.. तडक आंघोळीला पळतोस काय! आणि ते लाल डाग कसले होते?’’ आता आजीने काकाला फैलावर घेतलं. काका अजूनच वैतागला.

‘‘आपल्या देशाचं काहीएक होऊ शकत नाही!’’ काका चिडून म्हणाला.

‘‘एकदम देशावर का घसरलास बाबा?’’ आजीचा प्रश्न.

‘‘आत्ता मित्राला भेटायला म्हणून मोटरसायकलवरून बाहेर पडलो. एका सिग्नलला बस उभी होती. तिला पास होताना..’’

‘‘म्हणजे पुन्हा सिग्नल तोडताना..’’ चिंगीने काकाचं वाक्य तोडलं.

‘‘चिंगे..’’

‘‘बरं.. पुढे?’’

‘‘त्या बसला पास होताना बसमधून एका माणसाने पानाची पिचकारी मारली माझ्या चेहऱ्यावर! सगळे कपडे खराब झाले. घाण वाटली ती वेगळीच! छॅ:!’’ काका स्वच्छ झालेला त्याचा चेहरा पुन्हा पुन्हा टॉवेलने पुसत होता. काकाचं ते बोलणं ऐकताच आजोबा आणि चिंगीने एकदम नाकं मुरडली. आजीने तिच्या साडीचा पदर नाकावर घेतला.

‘‘पण तो तुला का मारेल पिचकारी? होळी तर केव्हाच झाली!’’ चिंगी चिडवत म्हणाली.

‘‘चिंगे, शहाणपणा नको करूस! तो मला मारतच नव्हता! तो पिचकारी मारत होता रस्त्यावर. पण मी नेमका मध्ये आलो! अशी किती जणं त्याची टार्गेट झाली असतील देव जाणे! सार्वजनिक ठिकाणी थुंकतात कसले!’’

‘‘काका, ‘लगे रहो मुन्नाभाई’प्रमाणे त्याला ‘थॅंक यू’ नाही म्हणालास? तो तर तुझा आवडीचा सिनेमा आहे!’’

‘‘चिंगे, मार खाशील आता! पण खरंच, इथे स्वच्छतेची कुणाला काहीच पडलेली नाहीये. लोक कुठेही थुंकतात काय, कचरा, बाटल्या फेकतात काय! काल रात्री बारा वाजल्यानंतर त्या मागच्या लॉनवरच्या लग्नात कसली जोरजोरात गाणी लावली होती! रात्री अकरानंतर डॉल्बी वगैरे लावायला बंदी असून! झोप पण झाली नाही पूर्ण. आपल्याकडचे म्हणजे नियम नुसतेच कागदावर असतात.. पाळत कुणीच नाहीत! जस्ट रिडिक्युलस! सिम्पली श्ॉब्बी!’’ हे ऐकून चिंगी आणि आजोबांनी एकमेकांकडे चमकून बघितलं.

‘‘काका इंग्लिशमध्ये बोलतोय म्हणजे खरोखरच चिडलाय आजोबा!’’ चिंगी मिश्किलपणे म्हणाली.

‘‘चिंगे, पण ही सगळी कुरकुर करणारा हा माणूस.. याला काय हक्क आहे ही तक्रार करायचा?’’ आजोबा म्हणाले.

‘‘का? मी या देशाचा नागरिक आहे! मतदान करतो!’’ काका रागाने म्हणाला.

‘‘अरे व्वा! म्हणजे झालं? संपली जबाबदारी? तू इतरांनी नियम पाळावेत म्हणून धुसमुसतोयेस.. आपलं स्वत:चं काय?’’ आजोबा जाम चिडले होते.

‘‘काका! तू स्वत: पाळतोस का ट्रॅफिक सिग्नल किंवा ट्रॅफिकचे नियम? ते तुझ्यासाठीही कागदावरच आहेत!’’ चिंगी म्हणाली.

‘‘चिंगे, ती वेगळी गोष्ट आहे. सिग्नलवर किती वेळ थांबून राहायचं? माणूस आपला उभा असतो वाट बघत. मी सिग्नल तोडला तरी मोटरसायकल जपून चालवतो. असा कुणाला त्रास देत नाही! विचार माझ्यामुळे कुणाला खरचटलंय तरी का आतापर्यंत!’’ काकाचं समर्थन.

‘‘असे किती तास तू उभा असतोस रे सिग्नलला? थांब की थोडा! मुळात सर्वाधिक अपघात सिग्नल तोडल्यानेच होतात. त्या ट्रॅफिक सिग्नलच्या शोधकाला वेड लागलं होतं म्हणून त्याने बनवला का तो? तुला खरंच नाही वाटत की सिग्नल पाळणं हीसुद्धा एक प्रकारची शिस्त आहे? तू बाबाला हरिश्चंद्र म्हणून चिडवतोस. पण तो नेहमी म्हणतो की, जर त्याने शिस्त नाही पाळली, तर मला कुठून ती शिस्त लागणार! लहान मुलं मोठय़ांचं अनुकरण करतात. मग मोठय़ांची जबाबदारी जास्त वाढते!’’

‘‘राजू, या चिमुकलीलासुद्धा हे समजतंय! मी किती वर्ष तुला समजावतोय. पण.. माझा व्यवसाय ‘रोड मार्निंग’चा! कितीतरी रस्त्यांवरचे पट्टे, झेब्रा क्रॉसिंग मी आखले आहेत. त्यांचं महत्त्व मी जाणतो. पण तुला अजूनपर्यंत मी ते शिकवू शकलेलो नाही..’’ आजोबा हताशपणे म्हणाले.

‘‘राजू, स्वत:च्या आधी जर दुसऱ्याचा विचार केला तर नियम आपसूक पाळले जातात. देशाचे चांगले नागरिक होण्यासाठी त्या देशाचे नियम पाळणं हीसुद्धा देशभक्तीच आहे!’’ आजोबा उत्कटतेने म्हणाले.

‘‘एकदम करेक्ट- आजोबा!’’ चिंगी म्हणाली. काका कदाचित पहिल्यांदाच सगळ्यांच्या बोलण्याचा शांतपणे विचार करत होता. आज घडलेला एक लहानसा प्रसंग त्याला मोठी समज देऊन गेला, कारण तो त्याच्यावर बेतला होता. ‘‘बाबा, मला माझी चूक समजलीये. पुन्हा नाही करणार असं. सॉरी!’’ काका कान पकडत म्हणाला. पण आजोबा माफ करायला तयार नव्हते. मग चिंगी आजोबांच्या पुढय़ात गुढग्यांवर येऊन त्यांना विनवू लागली आणि आजोबा हसले. त्यांनी काकाचे कान पिळले. त्यात सगळंच सामावलं होतं. सिग्नल आता ‘ग्रीन’ झाला होता.