scorecardresearch

उंदीर, बेडूक आणि घार

‘‘मला तुमच्यासारखे कोणीच मित्र नाही. मी नेहमी एकटीच असते; पण आजपासून मी तुमची मत्रीण.

उंदीर, बेडूक आणि घार

मृणाल तुळपुळे mrinaltul@hotmail.com

तळ्याकाठच्या बिळात एक उंदीर राहायचा आणि तळ्याच्या एका बाजूला बेडूक राहायचा. रोज सकाळी बेडूक उंदराकडे जायचा आणि दोघे दिवसभर तळ्याकाठी खेळायचे. एके दिवशी बेडकाच्या लक्षात आले की, उंदीर त्याच्या घरी कधीच येत नाही. चिडून त्याने उंदराकडे खेळायला जायचे नाही, असे ठरवले.

दुसऱ्या दिवशी बेडूक आपल्या घरीच बसला; पण दुपार झाल्यावर मात्र त्याला उंदराशिवाय करमेना. मग त्याच्या डोक्यात एक कल्पना आली आणि तो दोरीचा एक तुकडा घेऊन उंदराच्या घरी गेला. बघतो तर उंदीर तळ्याकाठच्या झाडाखाली गाढ झोपला होता. बेडकाने त्या दोरीचे एक टोक आपल्या पायाला बांधले आणि दुसरे टोक झोपलेल्या उंदराच्या शेपटाला बांधले. त्यामुळे उंदराला जाग आली आणि समोर बेडकाला बघून तो खूप खूश झाला. दोघे आनंदाने नाचायला लागले. नाचता नाचता बेडकाने तळ्यात उडी मारली. दोरीला हिसका बसल्याने त्याच्याबरोबर उंदीरदेखील पाण्यात पडला.

उंदराला पोहता येत नसल्यामुळे तो पाण्यात गटांगळ्या खायला लागला. बेडकाच्या हे लक्षात आल्यावर तो घाबरून ओरडू लागला. त्याचा आवाज आकाशात घिरटय़ा घालणाऱ्या घारीने ऐकला. खाली बघितल्यावर तिच्या लक्षात आले की आज एकाच झटक्यात उंदीर आणि बेडकाची  शिकार मिळणार. क्षणार्धात खाली येऊन तिने उंदराला आपल्या चोचीत पकडून पाण्यातून वर उचलले. उंदराची शेपटी आणि बेडकाचे पाय दोरीने बांधल्यामुळे उंदराबरोबर बेडूकदेखील वर उचलला गेला. आपल्या मित्राला पाण्यातून बाहेर काढल्याबद्दल बेडूक आणि आपला जीव वाचवल्यामुळे उंदीर असे दोघेही घारीचे आभार मानू लागले. ते ऐकून घारीला खूप आश्चर्य वाटले आणि ती म्हणाली, ‘‘अरे, मी तर तुम्हाला खाऊन टाकणार आहे, मग तुम्ही माझे आभार का मानत आहात?’’ त्याबरोबर दोघांनी काय झाले ते सगळे  घारीला सांगितले. ते ऐकून घार हसायला लागली आणि तिने दोघांना सोडून दिले. दोघांची घट्ट मत्री बघून तिला खूप आनंद झाला. ती म्हणाली, ‘‘मला तुमच्यासारखे कोणीच मित्र नाही. मी नेहमी एकटीच असते; पण आजपासून मी तुमची मत्रीण. मी काही तुमच्याशी खेळू शकणार नाही; पण तुम्हाला खेळताना बघायला आणि तुमच्याशी गप्पा मारायला मला खूप आवडेल.’’  त्यावर उंदीर आणि बेडकाने उडय़ा मारून आपला आनंद व्यक्त केला.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-10-2021 at 01:04 IST

संबंधित बातम्या