scorecardresearch

बागेतली परी

‘‘अरे व्वा! काका तुमची खूपच काळजी घेतात वाटतं?’’ परी उत्साहानं म्हणाली. पण लगेचच तिला काळजी वाटू लागली.

मॅटिल्डा अ‍ॅंथनी डिसिल्वा matildadsilva50@yahoo.co.in

आज सगळ्या बागेतून फिरून झाले तरी परी फुलपाखराला चांगला मध मिळाला नाही. तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी रूपा आणि राणीही होत्या. ‘‘काय करायचं गं? दोन-तीन दिवस झाले, आपल्याला जास्त मध मिळत नाहीए.’’ परी म्हणाली.

‘‘जायचं तरी कुठल्या बागेत.. कळतच नाहीए.’’ उडता उडता रूपा म्हणाली.

असाच विचार करता करता राणीला काहीतरी आठवलं. ‘‘अगं परी, मागे आपण जिथं गेलो होतो त्या मोठय़ा बंगल्याच्या समोर नाही का मोठी बाग आहे.. आठवलं?’’

‘‘ हो.. हो. आता आठवलं! तिथं गुलाब, शेवंती, जरबेरा, मोगरा, जास्वंदी.. सगळ्या प्रकारची फुलं आहेत. तिथं खूप मध मिळतो.’’ परी म्हणाली.

‘‘किती मस्त बाग आहे ना ती!’’ रूपा उद्गारली.

‘‘ हंऽऽऽ सगळी छान हसणारी जरबेरा, आनंदानं गाणी गात डुलणारे गुलाब आणि आपला सुगंध सर्वत्र पसरवून सगळ्यांना खूश करणारा मोगरा आणि शेवंती..’’ राणी म्हणाली.

‘‘हो ना! तिथं गेलं की खूप छान.. अगदी प्रसन्न वाटतं. आपलं किती आनंदानं स्वागत करतात ती फुलं.’’ परी नुसत्या विचारांनीच खूश झाली.

‘‘ चला तर तिथंच जाऊ या.’’ रूपा पंख फडफडवीत म्हणाली.

मग निघाली त्यांची टोळी तिथं.. उडत उडत पोचली एकदाची. जाऊन पाहतात तर काय, सगळी बाग उदासवाणी होऊन बसली होती. आजूबाजूला गवत वाढलं होतं. गुलाबांची झाडं कशीबशी तग धरून उभी होती. मोगऱ्याच्या झाडाला फुलंच नव्हती. आणि जरबेराची फुलं तर सगळी आपल्या लांब माना खाली घालून बसली होती.

‘‘अरेर, तुम्हाला काय झालं?’’ रूपा एका लाल गुलाबाला म्हणाली.

‘‘ काय करायचं.. किती दिवस झाले- आम्हाला नीटसं पाणी नाही मिळालेलं..’’  गुलाब म्हणाले.

‘‘पण का? काय झालं?’’ परीला त्यांना पाहून रडायलाच यायला लागलं.

‘‘या बागेचे मालक आमचे काका-काकू बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे आमच्याकडे लक्ष द्यायला कुणीच नाहीए.’’ गुलाब म्हणाला.

‘‘अरेरे..! मग त्यांनी कुणाला सांगितलं नाही का तुम्हाला पाणी घालायला?’’ रूपा म्हणाली.

‘‘ सांगितलं आहे ना! त्यांचा मुलगा आहे. त्यालासुद्धा आमची खूप काळजी वाटते. पण तो तरी काय करणार बिचारा?’’ शेवंती म्हणाली.

‘‘का बरं? त्याला काय झालं?’’ राणीने विचारलं.

‘‘अगं, तो पहाटे लवकर ऑफिसला जातो- तेव्हा आम्ही झोपलेलो असतो. येतो रात्री उशिरा. तेव्हाही आमचा डोळा लागलेला असतो. काकांनी त्याला सांगितलं आहे की, रात्री झाडांना त्रास द्यायचा नसतो. म्हणून तो रात्री पाणी घालत नाही.’’ इवलासा जरबेरा म्हणाला.

‘‘हो. पण शनिवार-रविवार त्याला सुट्टी असते ना, तेव्हा मात्र तो आम्हाला भरपूर पाणी घालतो.’’ गुलाब म्हणाला.

‘‘पण झालंय काय, की आमच्या सभोवताली हे सगळं तण आणि रानगवत वाढलंय ना.. ते सगळं आमचं पाणी शोषून घेतात. त्यामुळे आम्हाला ते पुरतच नाही.’’ जास्वंदीने तक्रार केली.

‘‘काका असले की कसं आमच्या आजूबाजूचं सगळं गवत ते साफ करतात.’’ शेवंती म्हणाली.

‘‘असं का?’’ परीने उत्सुकतेनं विचारलं.

‘‘आता तर आमचा अगदी श्वास कोंडला आहे.’’ पिवळा जरबेरा डोळ्यात पाणी आणून म्हणाला.

‘‘का बरं?’’ राणी उद्गारली.

‘‘अगं, आम्ही फार नाजूक असतो ना! आमच्या मुळावरची माती घट्ट  झाली की आम्हाला श्वास घेता येत नाही. त्यासाठी काका खुरपणी करतात.’’ सफेद जरबेरा म्हणाला.

‘‘खुरपणी म्हणजे काय?’’ रूपानं विचारलं.

‘‘खुरपणी म्हणजे आमच्या मुळाभोवतालची माती थोडी मोकळी करायची- म्हणजे आम्हाला पाणी चांगलं शोषून घेता येतं आणि हवाही घेता येते.’’ जरबेरा म्हणाला.

‘‘आणखी काय काय करतात काका?’’ परीला बरीच उत्सुकता होती.

‘‘आम्हाला आमचं जेवण देतात..’’ शेवंती म्हणाली.

‘‘जेवण? कसलं जेवण?’’ राणी उडत जाऊन शेवंतीवर बसली.

‘‘अगं, जेवण म्हणजे खत. काका आम्हाला शेणापासून बनवलेलं खत घालतात. ते खत म्हणजे आमचं पक्वान्नच जणू.’’ – इति शेवंती.

‘‘ मग ते खत, पाणी आणि वरून येणारा सूर्यप्रकाश यांनी आम्ही आमचं जेवण बनवतो.. स्वस्थ राहतो.. सुंदर राहतो.’’ जास्वंदीबाई तोऱ्यात म्हणाल्या.

‘‘अरे व्वा! काका तुमची खूपच काळजी घेतात वाटतं?’’ परी उत्साहानं म्हणाली. पण लगेचच तिला काळजी वाटू लागली.

‘‘पण आता काका नाहीत तर तुम्ही काय करणार?’’

‘‘ काका थोडय़ा दिवसांसाठीच गेले आहेत. येतील ते लवकरच.’’ गुलाब म्हणाला.

‘‘त्यांना आमची खूप काळजी वाटत असते. फोनवरून चौकशीदेखील करतात आमच्याबद्दल.’’ मोगरा उत्तरला.

‘‘म्हणूनच तर आम्ही तग धरून राहिलोत कसेबसे! नाहीतर त्यांना वाईट वाटेल ना!’’ मघाचा जरबेरा रडवेल्या स्वरात म्हणाला.

‘‘परी, तुम्ही ना थोडय़ा दिवसांनी परत या.. म्हणजे मग आम्ही तुम्हाला खूप मध देऊ.’’ जास्वंदीनं आश्वासन दिलं.

‘‘बरं! बरं! पण काळजी घ्या हं स्वत:ची काका येईपर्यंत. दम धरा! ’’ परी आणि रूपा उडत उडत म्हणाल्या.

थोडय़ा दिवसांनी काका-काकू परत आले. आपल्या बागेकडे पाहताच त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी पटकन् झाडांना भरपूर पाणी दिलं. मग सगळ्या झाडांकडे पाहून म्हणाले, ‘‘मला माफ करा बाळांनो, मी तुम्हाला सोडून गेलो. पण घाबरू नका; आता मी आलोय.’’ सगळ्या झाडांना मग हुरूप आला.

दुसऱ्या दिवसापासून काकांनी कामाला सुरुवात केली. त्यांनी बागेतलं बेसुमार वाढलेलं सगळं तण साफ केलं. नंतर जरबेराच्या झाडांभोवती खुरपणी करून त्यांच्या मुळांभोवतालची माती मोकळी केली. दुसऱ्या दिवशी जास्वंद, मोगरा, गुलाबांची थोडी छाटणी केली. त्यांच्या बुंध्याभोवती पाण्यासाठी आळी तयार केली. मग सगळ्या झाडांना शेणखत घातलं आणि त्यांना भरपूर पाणी दिलं. नाजूक जरबेराला जास्त ऊन चालत नाही म्हणून त्याच्यावर पारदर्शक कापडाचा मांडव तयार केला. सगळ्या झाडांवर काकांचा मायेचा हात फिरला.

काकांच्या प्रेमानं केलेल्या मशागतीने दोन- तीन दिवसांतच गुलाब, जास्वंदी, मोगरा आणि शेवंती टवटवीत दिसू लागली. छोटय़ा जरबेराच्या जीवात जीव आला. परत ते आपले लांब देठ सरळ करून वाऱ्यावर झुलू लागले.

सगळ्या बागेलाच बहर आला. गुलाब परत गाणी गात डोलू लागले. जास्वंदी मान वर करून हसू लागली. शेवंती व मोगरा आपला सुगंध पसरवू लागले. आणि जरबेरा आनंदाने डोलू लागले. मग ते सगळे परी आणि तिच्या मैत्रिणींची वाट पाहू लागले.

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Moral stories for kids story for kids in marathi zws

ताज्या बातम्या