मैदानातून बाहेर पडल्या पडल्या आकाशने बॅट जोराने आपटली. यशने हे पाहताच त्याची खात्री झाली, माझ्याचसारखा आहे हा आकाश. माझ्यासारखाच विचार करतोय, म्हणूनच आपल्यासारखाच रागावलाय. मीही रोहनदादावर असाच रागावलो होतो आणि रोहनदादाने किती मस्त समजूत घातली होती माझी. तशीच आता आकाशची समजूत घातली पाहिजे, असा विचार करतच यश आकाशपाशी पोहोचला आणि त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला, ‘‘काय यार, राग आला ना तुला पाटणेकाकांचा?’’ पहिल्यांदा आकाश काहीच बोलला नाही ‘रागावलाय पठ्ठय़ा’ असं मनात म्हणत यशने पुढे चालू केलं बोलायला.

‘‘मनासारखा स्कोअर झाला नाही का?’’..

यशच्या बोलण्यावर आकाशनं नुसतं ‘हं’ केलं.

‘म्हणजे आपली गाडी ट्रॅकवर आहे,’ यश मनात म्हणाला. ‘‘मग काय किती विकेट्स?’’ परत यशने गुगली टाकली आणि आकाशची विकेट पडली.

‘‘शीटऽऽऽऽ यारऽऽऽऽ’’ आकाश त्याच्या स्टाइलने म्हणाला. ‘‘मस्त चान्स आला होता, पण पाटणेकाकांची शिट्टी वाजली राष्ट्रगीतासाठी उभं राहायची नि पुन्हा तसा बॉल टाकताच आला नाही.’’ कातावलेल्या स्वरात आकाश नाराजी व्यक्त करत होता

‘‘मी म्हणतो, आपलं ग्राउंड आणि शाळेचं आवार वेगवेगळं आहे ना, मग त्यांच्याकडे राष्ट्रगीत सुरू झाल्यावर आपण का उभं राहायचं? त्यामुळेच माझा यॉर्कर फुकट गेला ना.  नेमका मी तो टाकायला आणि राष्ट्रगीताची वेळ यायला. चांगला चेंडू फुकट गेला.’’

आकाशने आपलं म्हणणं भडाभडा सांगून टाकलं त्यावर अत्यंत शांत स्वरात यश म्हणाला, ‘‘आवार वेगळं आहे रे, पण आपला देश एकच आहे ना. ज्या भारतभूमीवर शाळा आहे त्याच भारतभूमीवर आपलं ग्राउंड आणि त्यामुळे पाटणेकाकांचं एवढंच म्हणणं आहे की राष्ट्रगीत चालू असताना आपण उभं राहावं. यश तुला मोठेपणी क्रिकेटर व्हायचं आहे असं तुझी आई म्हणत होती. तू क्रिकेटर झालास की आपल्या देशाकडूनच खेळशील ना, बक्कळ पैसाही मिळवशील. मग त्या देशासाठी काही सेकंद उभं राहायला का कुरकुरतोयस?’’ रोहनदादाचा चेहरा डोळ्यांसमोर आणत यश म्हणाला. कारण हा प्रश्न रोहनदादाने त्याला विचारला होता. ‘‘राष्ट्रभक्ती काही एकदम मोठ्ठय़ा गोष्टींपासून सुरू होत नाही, तर अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींपासून तिची सुरुवात होते किंवा करायची असते.’’ हे ऐकत असताना आकाशच्या चेहऱ्यावरचे बदलत जाणारे भाव बघून आपली मात्रा हळूहळू लागू पडेल हे यशला जाणवलं. पुढे काय बोलायचं याचा विचार करण्यासाठी तो काही क्षण थांबला त्यावेळीच ‘‘गुड मॉìनग फ्रेन्ड्स’’ असं म्हणत पाटणेकाका आणि मीनल त्यांच्या दिशेनेच येताना दिसले.

‘‘गुड मॉìनग काका, गुड मॉìनग मीनल.. काही नाही, आकाश नवीनच आहे ना खेळायला, त्याला राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहण्याबाबत थोडं सांगतोय.’’

‘‘बेटा आकाश, तुला भावी आयुष्यात आकाशभरारी घ्यायची आहे आणि त्यासाठी तुला तुझ्या मातृभूमीची साथ हवीच हवी, तिची थोरवी काही सेकंदांत जाणून घेण्यासाठी आहे हे राष्ट्रगीत. या काही सेकंदांतूनच पुढे राष्ट्राबाबतचं प्रखर प्रेम निर्माण होतं आणि आपला व्यवसाय कोणताही असेना का आपण आपलं राष्ट्रप्रेम दाखवण्याची एकही संधी दवडत नाही.’’

‘‘कोणत्याही व्यवसायात राहून राष्ट्रप्रेम दाखवता येतं असं तुम्ही म्हणता ना, त्याबाबतचा एक मेसेज काल माझ्या वॉट्स अ‍ॅपवर आला होता तो मी तुम्हाला फॉरवर्ड करणार होते. पण रात्री उशिरा वॉट्स अ‍ॅप वापरते म्हणून तुम्ही ओरडाल ना, म्हणून नाही फॉरवर्ड केला. पण आता सांगू का?’’ मीनलने थोडं लाडात येत विचारलं. तुझ्या रात्री वॉट्स अ‍ॅप वापरण्याबाबत नंतर बघतो.. पण, आता बोल काय ते.’’ पाटणेकाका थोडं रागानेच म्हणाले.

‘‘ही म्हणे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितलेली गोष्ट आहे. ते लंडनला असताना भारतात पाठवण्यासाठी एक पाकीट घेऊन ते इंग्लंडमधील पोस्टात गेले आणि पोस्टातील काउंटरवरच्या मुलीकडून त्यांनी त्यासाठी योग्य त्या रकमेची टपाल तिकिटे खरेदी केली, काही वेळाने ती तिकिटे त्या पाकिटावर चिकटवून ते परत माघारी जाण्यासाठी वळले तर त्यांना त्या मुलीची ‘‘एक्स्यूज मी..’’ अशी हाक ऐकू आली. आता काय हिचं, असं थोडंसं वैतागतच त्यांनी तिच्याकडे पाहिलं, तर ती त्यांना सांगत होती की या पाकिटावरचं तिकीट तुम्ही उलटं चिकटवलंय तेवढं सुलटं चिकटवून द्या. ‘‘रक्कम तर योग्य आहे ना?’’ असं कलाम सरांनी म्हणताच ती म्हणाली, ‘‘रक्कम योग्य आहे, पण हे माझ्या देशाचं टपाल तिकीट आहे. त्यावर माझ्या देशाच्या राणीचं चित्र आहे. आणि माझ्या देशाच्या राणीचं चित्र उलटं लावून त्यावर शिक्का मारणं हे माझ्या देशासाठी योग्य नाही.’’ हे ऐकून कलाम सरांनी मागे वळत पुन्हा ते तिकीट सुलटं लावलं आणि त्या मुलीच्या देशप्रेमाबाबत तिची प्रशंसा केली. तर काका, मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही म्हणता ते खरं आहे, आपला व्यवसाय कोणताही असो, त्यात आपण देशप्रेम दाखवू शकतो.’’

‘‘हो गं बाई, प्लास्टिक बॅग न वापरणे, पाण्याचा सांभाळून वापर करणे, पेट्रोल, डिझेल यांचा अवास्तव वापर टाळणे, सार्वजनिक मालमत्तेचा काळजीपूर्वक वापर करणे, आपण जर सेवाक्षेत्रात असलो तर निरलसपणे व सचोटीने सेवा करणे हे आणि असं बरंच काही म्हणजे सुद्धा एकप्रकारची राष्ट्रभक्तीच.. हे काकांनी आम्हाला सांगितलंय ते आम्ही फक्त तुला सांगतोय.’’ असं म्हणत यश आणि मीनलने एकमेकांना टाळी दिली. आकाशचे डोळे मात्र आपण नवीन काहीतरी ऐकतोय अशा भावनेने विस्फारले होते. ते पाहताच पाटणेकाका म्हणाले, ‘‘या यशनेही एक महत्त्वाची देशभक्तीपर गोष्ट केली. गेल्या वर्षभरात जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या त्या त्या वेळी तो या शहरात जास्तीत जास्त जेवढय़ा लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढय़ा लोकांपर्यंत पोहोचला आणि प्रत्येकाला त्यांच्या मतदानाच्या हक्काबाबत जागृती त्याने करून दिली. त्यांना मतदानासाठी जाण्यास प्रोत्साहित केलं.’’

‘‘आणि रोहनदादा, त्याने तर कमालच केली. नोटाबंदीच्या काळात, तुला माहिती असेलच की अनेक जोक्सचं मोठ्ठं पीक आलं होतं. राष्ट्रपिता महात्मा गांधींनाही सोडलं नव्हतं काहींनी. पण? रोहनदादाने त्याला शक्य होतं तेवढय़ा लोकांपर्यंत पोहोचत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की हे कसं चुकीचं आहे. संत महात्मे यांची चरित्रं, त्यांनी केलेले कष्ट, त्यांची तळमळ यांचा विचार न करता आपण फटक्यात त्यांच्यावर ताशेरे मारून मोकळे होतो. असे ताशेरे सोशल मीडियावरून आपल्यापर्यंत जरी का आले तरी ते पसरवण्याला विरोध करणे म्हणजेसुद्धा खूप मोठ्ठी देशसेवाच आहे.’’ यशने  आपल्या लाडक्या रोहनदादाबद्दलची माहिती तत्परतेने पुरवली.

‘‘मी, आई आणि आजी गॅस काटकसरीने वापरूनही खूप मोठ्ठी देशसेवा करतो. काकांनीच सांगितलंय तसं. हो नं काका?’’ मीनलने काकांचा होकार मिळवला.

‘‘म्हणजे अशी देशसेवा तर आपण सारे करू शकतो.’’ आकाश नि:शंकपणे आपल्या गटात आला हे समजून यशने नि:श्वास सोडला.

‘‘मीही उद्या सुभाषचंद्र बोसांच्या जयंतीनिमित्त, माझ्या मित्रांना सुभाषचंद्र बोसांची महती सांगेन आणि प्रजासत्ताक दिनापासून तुमच्या सर्वासारखा छोटासा वाटणारा, पण परिणामाने मोठ्ठा असा एखादा उपक्रम नक्कीच सुरू करेन.’’ आकाश उत्साहाने म्हणाला.

त्यावर काका म्हणाले, ‘‘त्यासाठी गाणारे हात आणि आशेनं झंकारणारं मन यांची गरज आहे. म्हणूनच आम्ही सारे कवी कांत यांनी त्यांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे मागणं नेहमी मागत असतो,

‘‘त्या हाताला विचार फुटतील

अन् गाण्याचे सूर उगवतील

आज-उद्याची गातील गाणी धडपडणारे हात

प्रभो मज द्या गाणारे हात’’

‘‘काका, आजपासून आकाशलाही गाणारे हात फुटले बरं का आमच्यासारखे.’’ यश आणि मीनलने हसत हसत पाटणेकाकांना टाळी दिली आणि आकाशलाही.

मेघना जोशी joshimeghana.23@gmail.com