फारूक एस. काझी

एका छोटय़ा शहरातली एक गोष्ट. शहराच्या बाहेर एक छोटं कुटुंब राहायचं. आई-बाबा आणि त्यांचा एक मुलगा. त्याचं नाव तुम्हीच ठरवा. तुम्हाला जे आवडेल ते! तो खूप प्रश्न विचारायचा. पुस्तकं वाचायचा. भरपूर खेळायचा. भांडणंही करायचा. शिक्षकांशी वाद घालायचा. एकदा शाळेत त्याने त्यांच्या शिक्षकांना प्रश्न विचारला. कुठलं तरी पुस्तक वाचून त्याला तो प्रश्न पडला होता.

furnaces of gold and silver factories
मुंबई : सोन्या-चांदीच्या कारखान्यांची भट्टी आणि धुरांडी हटवली, महापालिकेची गिरगाव, मुंबादेवीत कारवाई
kalyan gutkha factory marathi news, malanggad gutkha factory marathi news, gutkha thane marathi news, 7 lakh gutkha seized marathi news
कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी गुटख्याचा कारखाना, सात लाखांच्या गुटख्यासह तीन जण अटकेत
tipeshwar sanctuary, archi tigress, cubs, attracting tourists, viral video, yavatmal, nagpur,
VIDEO : टिपेश्वरच्या जंगलात “आर्ची” आणि तिच्या बछड्याने पर्यटकांना लावले वेड
one labourer killed 4 injured in wall collapse in nalasopara
नालासोपाऱ्यात भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू; ४ मजूर गंभीर जखमी

‘‘देव कुठं असतो? आणि त्याला शोधायचं तर कुठं शोधायचं?’’ शिक्षकांनी त्याचा प्रश्न नीट ऐकून घेतला. त्यावर थोडा विचार केला.

‘‘देव आहे की नाही हे माहीत नाही, पण असं म्हणतात की देव सगळीकडे आहे. तो माणसांत वसतो. पशुपक्षी, झाडं-वेलींत वसतो. मी जिथवर वाचून समजू शकलोय त्यात तर मला एवढंच सापडलंय.’’

मुलगा नुसतं ‘हम्म!’ एवढंच बोलला.

‘‘माझ्या उत्तराने तुझं समाधान झालंय का?’’ शिक्षकांनी त्याच्या जवळ जात विचारलं.

‘‘मला तुमचं बोलणं पटलंय; पण मला स्वत:लाच देव शोधावा लागेल. उद्या रविवार आहे. उद्या वेळ मिळेल. मी उद्याच शोधायला जाईन. यावर तुमचं काय मत आहे?’’

शिक्षकांनी पुन्हा एकदा विचार केला.  काही तरी विचार करून ते म्हणाले, ‘‘मस्त कल्पना आहे. तू शोध घे. माझी मदत लागली तर जरूर सांग. मी तुला पूर्ण मदत करेन.’’ शिक्षकांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत सांगितलं.

‘‘हो. मला तुमच्या मदतीची गरज लागेल,’’ असं म्हणून तो खाली बसला.

शाळेची वेळ संपली आणि तो दप्तर घेऊन घरी निघाला. डोक्यात एकच विचार गरगरत होता.

‘देव कुठं भेटेल? देवाला कुठं शोधायचं?’

सकाळच्या किरणांनी खिडकीतून आत उडी घेतली. डोळ्यांना गुदगुल्या केल्या. गालावर हळूच पापी दिली.

आईची हाक आली नाही, पण तो अजून स्वप्नात होता. स्वप्नातही तो वेगळं काही पाहत नव्हता. तुम्हाला ठाऊक आहे त्याला कोणतं स्वप्न पडलं होतं ते. तो उठला. पटापट तयार झाला. रात्री बनवून ठेवलेली लिस्ट हातात घेऊन त्याने आपल्या सॅकमध्ये साहित्य भरायला सुरुवात केली.

पाण्याच्या दोन बॉटल्स, बनपाव दोन पॅकेट्स, क्रीमरोल दोन पॅकेट्स, छोटा टॉवेल, दोन सफरचंद, चार केळी..

साहित्य भरून झालं की त्याने सॅक उचलली. इतक्यात आई बाहेर आली.

‘‘अरे, एवढय़ा सकाळी कुठं निघाला आहेस?’’

‘‘देवाला शोधायला. तो कुठं राहतो ते शोधायला.’’

‘‘अच्छा! नीट जा आणि लवकर परत ये.’’ आई मिश्कीलपणे हसत म्हणाली.

‘‘निघतो. बाय.’’ असं म्हणून तो बाहेर पडलाही.

काही अंतर चालून गेल्यावर त्याने बस पकडली. शहरातली काही ठिकाणं फिरून झाली. इकडं भटक, तिकडं भटक.. असं करत करत देव शोधला, पण त्याला देव सापडला नाही.

शेवटी थकून तो एका बागेत आला. तो प्रचंड थकला होता. भूक लागली होती. चालता चालता तो एका फरशीवर घसरला आणि पडला. त्याच्या कोपराला लागलं. गुडघ्याला लागलं. खूप दुखलं.

‘‘फार लागलं नाही ना रे? ही फरशी जरा निसरडी आहे. सांभाळून चालावं लागतं.’’  त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं. एक बाई तिथं उभ्या होत्या. केस पांढरे. काहीसे विस्कटलेले. अंगावर जुने कपडे, पण स्वच्छ असलेले. हातात एक पिशवी, छातीशी धरलेली. त्या बाईंचंही एक नाव होतं. काय होतं बरं ते? तुम्हाला ठाऊक आहे का? मग तुम्हीच त्यांना एक छानसं नाव द्या.

त्या बाईंनी त्याला हात दिला आणि शेजारच्या बाकावर बसवलं. त्या स्वत: त्याच्या शेजारी थोडय़ा अंतरावर बसल्या. त्याला कमालीची भूक लागलेली. त्याने एक सफरचंद काढलं आणि खायला सुरुवात केली. तो पहिला घास घेणार इतक्यात त्याला शेजारी बसलेल्या त्या बाईंची आठवण झाली. त्याने हातातलं सफरचंद त्यांना देऊ केलं. त्या बाईंच्या चेहऱ्यावर सुंदर हसू होतं. मुलाला ते हसू फारच सुंदर वाटलं. जगात सर्वात भारी. त्यांनी ते सफरचंद घेतलं, खाल्लं. मग त्याने पाणी दिलं. त्या पाणी प्यायल्या. बाईंच्या सकाळपासून उपाशी असलेल्या पोटाला आराम मिळाला. त्या पुन्हा छानसं हसल्या. खाऊन होताच मुलगा सॅक उचलून जायला लागला. त्या बाईंना त्याने घट्ट मिठी मारली.

‘‘मी जातो आता. संध्याकाळ झाली. बाय.’’ असं म्हणत तो धावतच बसस्टॉपकडे गेला. त्या बाई खूपवेळ त्याच्याकडे टक लावून पाहत होत्या.

मुलगा घरी परत आला.

‘‘सापडला का देव? कुठं राहतो?’’ आईने कुतूहलाने विचारलं.

‘‘हो सापडला. देव हा एक ‘बाईमाणूस’ आहे आणि त्यांच्या हास्याइतकं सुंदर या जगात काहीच नसेल. देव हसतो. तो सर्वाना मदत करतो आणि त्याला कोणतंही एक घर नाही. तो सर्वत्र फिरत असतो.’’

आईने हसून मान डोलावली. मुलगा आत जाऊन शांतपणे झोपी गेला. थकून गेला होता. तरीही त्याच्या चेहऱ्यावर स्मित झळकत होतं.

बागेतून त्या बाई आपली पिशवी सांभाळत सांभाळत एका झाडाखाली आल्या. तिथं दुसऱ्या एक बाई बसलेल्या होत्या. त्यांच्या हातात एक पाटी होती. त्यावर लिहिलेलं होतं. ‘Need money for Food. आपल्याजवळची दोन केळी त्यांना देत त्या बाई म्हणाल्या, ‘‘आज मला देव भेटला बागेत.’’ एवढं बोलून त्या छानसं हसल्या.

‘‘पण, देव खूपच छोटा होता. मी तर समजत होते की, देव खूप म्हातारा असतो म्हणून; पण तो तर एक गोड छोकरा आहे. जो दुसऱ्याची काळजी घेतो, खूप छान बोलतो. मला त्याने भिकारी म्हणून टाळलं नाही. मला घट्ट मिठी मारली. मला खूप खायला दिलं, पण त्याने सगळ्या वस्तू दोघांसाठी आणलेल्या होत्या.’’

‘‘दोघांसाठी? पण तो तर एकटाच होता ना?’’ दुसऱ्या बाईंनी नवलाईने विचारलं.

‘‘हो. एकटाच होता. मी विचारलंसुद्धा त्याला ‘या दुसऱ्या वस्तू कुणासाठी?’ तर तो काय म्हणाला माहितीय?’’ त्या बाई पुन्हा गोड हसल्या.

‘‘काय म्हणाला?’’

‘‘म्हणतो कसा.. तुमच्यासाठीच आणल्या आहेत त्या वस्तू. तुम्हालाच तर शोधायला बाहेर पडलो होतो. खूप गोड होता छोकरा. आज देव पाहिला. धन्य झाले.’’

सांजेचा वारा आता हळुवारपणे चेहऱ्यावर आणि केसांतून वाहत होता. सोनेरी किरणांची झळाळी साऱ्या चराचरावर पसरली होती. त्या बाई पुन्हा एकदा छानसं हसल्या. अंधार आता हळूहळू अंगणभर फेर धरून नाचत होता. सांजेचा पदर धरून अंधाराची पिल्लं जिकडंतिकडं बागडू लागली होती. पश्चिमा लालसर काळ्या रंगात न्हाली होती. जणू त्यांनाही देव गवसला होता.

(एका शॉर्टफिल्मवर आधारित विस्तृत स्वतंत्र कथा)

farukskazi82@gmail.com