उज्ज्वला देशपांडे
शाळेला मे महिन्याची सुट्टी लागणार म्हणून आमच्या आवडत्या सराफेबाईंनी आम्हाला जास्तीचा अर्धा तास थांबायला सांगितलं. अजून अर्धा तास थांबावं लागणार म्हणून मुलांनी एकच गलका केला. बाईंनी आपल्याला का बरं थांबायला सांगितलं आहे याबाबत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. तितक्यात सराफेबाई म्हणाल्या, ‘‘मला तुम्ही सगळ्यांनी सुट्टीत खूप वाचावं, वाचलेल्या गोष्टींवर खूप विचार करावा, आपापसांत चर्चा करावी, तुमच्यात वादविवाद घडावेत असं वाटतंय.’’
बाईंनी हे सांगितल्यावर मुलांचे हिरमुसले चेहरे बघून त्या पुढे म्हणाल्या, ‘‘आपल्याला अभ्यासाची पुस्तकं वाचावीच लागतात (आणि ती वाचलेलीच बरं असतं हं). तर ही पुस्तकं सोडूनसुद्धा वाचनाची आवड निर्माण होणं, वाचनाची सवय लागणं हे आपल्या आयुष्यासाठी खूप फायद्याचं असतं. आणि हे जे इतर वाचन आहे ना – पूरक वाचन – ते फार छान असतं.’’
रॉबिन लगेच म्हणाला, ‘‘बाई, वाचनात काय आलंय छान?’’
‘‘रॉबिन, त्यासाठी आधी वाचायला हवं ना!’’ रॉबिनला वाचायला आवडत नाही हे बाईंना पक्कं माहीत होतं.
‘‘कोणत्या भाषेत आणि काय वाचायचं बाई?’’ – इति वर्गातली हुशार सिया!
‘‘आपल्या मातृभाषेतील वर्तमानपत्रे, पुस्तके, मासिके… जे जे मिळेल ते ते वाचायचं आणि ते वाचून झाल्यावर मी सांगते ते खेळ खेळायचे.’’
‘‘खेळ?’’ सगळेच एकसुरात ओरडले.
सराफेबाई म्हणाल्या, ‘‘हो खेळ. आपल्या घरात, आजूबाजूला काही वयस्कर लोक म्हणजेच आजी-आजोबा असतात. त्यांना जाऊन भेटायचं. त्यांना म्हणायचं, ‘‘मी हे आज जे वाचलं आहे ते तुम्हाला सांगणार आहे.’’
रॉबिन म्हणाला, ‘‘काय? वाचन आणि तेही आजी-आजोबांसमोर?’’
‘‘हो. एक तर वयोमानानुसार आजी-आजोबांची दृष्टी अधू झालेली असते किंवा मोतीबिंदूचा त्रास झालेला असतो, त्यामुळे त्यांना काही वाचावंसं वाटलं तरी शक्य होत नाही. तुमच्यासारखे मदतनीस मिळाले तर काय भारी वाटेल त्यांना! दुसरं म्हणजे आपण वाचलेले दुसऱ्याला सांगतो तेव्हा ते आपल्याला जास्त चांगलं समजतं. त्यातून आपली वेगवेगळी कौशल्ये विकसित होतात. जसे की- स्पष्ट बोलणे, बोलण्यातले चढ-उतार/ हावभाव सुधारतात, इतरांबरोबर आणि इतरांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास येतो, ऐकणाऱ्या आजी-आजोबांची काही मतं असतील तर ती समजतात, त्यातून दुसऱ्याचं ऐकून घ्यायची, समजून घ्यायची सवय लागते.’’ सराफेबाई जे सांगत होत्या ते रघू लक्ष देऊन ऐकत होता.
‘‘आता दुसरा खेळ, जो आपल्याला आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत खेळायचा आहे. आपण जे वाचलं आहे त्यातलं काय आवडलं, काय खटकलं आणि त्याची कारणे सांगायची, अगदी दोन मिनिटांत. ही वेळ महत्त्वाची आहे या खेळात.’’
‘‘दोन मिनिटं म्हणजे नूडल्स शिजण्याइतकाच वेळ! मी काय बोलणार एवढ्या कमी वेळेत?’’ आशा म्हणाली.
सराफेबाई म्हणाल्या, ‘‘पाल्हाळ न लावता, मुद्द्याला धरून जे बोलायचं आहे ते योग्य प्रकारे सांगता आलं पाहिजे.’’ बाईंच्या उत्तरावर आशानेही मान डोलावली.
शेवटी सराफेबाई म्हणाल्या, ‘‘सुट्टी संपत आल्यावर आपण काय काय पूरक वाचन केलं त्याचा रिपोर्ट द्यायचाय मला. हा रिपोर्ट म्हणजेच अहवाल. तो हाताने किंवा संगणकावर टाइप करून देणं शक्य असेल तर उत्तम. त्याने संगणकाशी निगडित कौशल्ये विकसित होतील. परंतु संगणक नाही, वीज नाही, प्रिंटर नाही म्हणून अडून नाही बसायचं. जास्तीत जास्त चांगल्या शब्दांत, समोरच्याला आवडेल अशा भाषेत, अजिबात ताण न घेता हा अहवाल लिहायचा आहे. शाळा सुरू झाल्यावर आपण सर्वांचे अहवाल एकत्र करून एक अहवाल पुस्तिका तयार करूयात.’’
‘‘बाई, याच्या पहिल्या पानावर आमची नावे आणि फोटो घेऊ.’’ टिनानं सुचवलं.
‘‘नक्की. तुम्ही रिपोर्ट रायटिंग किंवा अहवाल लिखाणासारखं कौशल्य इतक्या लहान वयात शिकलात तर पुढे तुमच्या करिअरमध्ये त्याचे खूप फायदे होतील. अहवाल पुस्तिकेचा प्रकाशनाचा साधासाच कार्यक्रम ठेवायचा का आपण?’’
आशा लगेच म्हणाली, ‘‘यावेळी शाळेतले सर्व विद्यार्थी, ज्या आजी-आजोबांना आपण आपल्या अॅक्टिव्हीटीमध्ये सहभागी केलं ते आजी-आजोबा, आपले घरचे सर्वांना आमंत्रित करायचं, चालेल काबाई?’’
भरत म्हणाला, ‘‘मी अन्य भाषांमधली पुस्तकेही वाचेन.’’
सराफेबाई मुलांचा प्रतिसाद बघून खूशच झाल्या!
‘‘पुस्तिका प्रकाशानाच्या कार्यक्रमानंतर ही अहवाल पुस्तिका शाळेच्या वाचनालयात सगळ्यांना वाचायला म्हणून ठेवून देऊ. सर्व प्रक्रियेत कोणीच, कोणाला, कसलीच सक्ती करणार नाही. मनातून वाटलं म्हणून, आनंद मिळतोय म्हणून वाचनाच्या जगात आपण प्रवेश करणार आहोत.’’
‘‘हो बाई.’’ सगळी मुलं एकासुरात म्हणाली.
अर्ध्या तासाचा एक तास झाला तरी वर्गातून बाहेर पडण्याची कुणाला घाई नव्हती! सगळे एकमेकांना काय वाचणार, कुणाला वाचून दाखवणार, ‘दोन मिनिटांत’चा खेळ कुणाबरोबर खेळायचा… याचं प्लॅनिंग करण्यात गुंग होते!
सराफेबाई हसत म्हणाल्या, ‘‘तुमच्यातलेच कोणीतरी पुढे मोठे लेखक, संवादक, उत्कृष्ट स्क्रिप्ट रायटर झालात की मी तुमचा ऑटोग्राफ मागायला आणि तुमच्या बरोबर सेल्फी काढायला येईन!’’ बाईंच्या या बोलण्यावर सगळी मुलं मनापासून हसली. ujjwala.de@gmail.com