scorecardresearch

कोकबनची सहल

अवंतीची मनोमन लगबग सुरू झाली. त्यात  न्यायच्या सामानाची यादी करायची जबाबदारी तिच्यावर सोपवलेली.

संध्या ठाकूर sandhyajit@gmail.com

कोकबनला सहलीला जायचं नक्की झालं. धावीर डोंगराच्या पायथ्याशी असलेलं हे टुमदार गाव. डोंगरावरून दिसणारी आसपासची चित्रातल्यासारखी छोटी गावं.. काशिदचा सुमद्रकिनारा.. फणसाडचं पक्षीअभयारण्य.. 

अवंतीची मनोमन लगबग सुरू झाली. त्यात  न्यायच्या सामानाची यादी करायची जबाबदारी तिच्यावर सोपवलेली. मग काय, ती चोख पार पाडायच्या कामी लागली ती. पेन्सिल घेऊन विचारपूर्वक तिची जबाबदारी कागदावर उतरवू लागली.

जायच्या वाटेवर आणि तेथे पोहोचल्यावर लावण्यासाठी झाडांच्या बिया, रोपं, तेथे विविध गोष्टी विकणाऱ्या लोकांच्या मुलांसाठी खाऊ, गोष्टीची पुस्तकं, खेळ, रुमाल, वह्य, पेनं, पेन्सिली, टोप्या.. लिहितानाही तिच्या नजरेसमोर ते अनोळखी लकाकणारे डोळे लख्ख दिसत होते.

‘‘बाबा, किती अंतर आहे इथून कोकबनपर्यंत?’’

‘‘साधारण साडेतीन-चार तास.’’

‘‘कि. मी.मध्ये सांगशील?’’

‘‘१२० कि. मी.’’

‘‘आणि आपल्या घरापासून स्टेशन?’’ 

‘‘बघून सांगतो. रोज जातोय, पण असं अंतरावर लक्ष नाही गेलं.’’ 

सगळी अंतरं कि. मी. आणि वेळेतही अवंतीने टिपून घेतली. कोकबन ते काशिद.. फणसाडचे अभयारण्य.. शिवाय एक दिवस शेतात.. सर्व गावरान भाज्या व दाणे मडक्यात बांधून शेकोटीत भाजून पोपटी..

तीन दिवसांचा छान आराखडा बनवून तिने फेरविचारासाठी सादर केला.

‘‘माझ्या यादीत एवढी औषधं?’’ आईची नजर यादीवर पडली.

‘‘मागच्या सहलीला कोणाचं डोकं दुखतं- घे गोळ्या, कुणाला खरचटलं- लाव टणटणीच्या पानांचा रस, कोणाला ओवा, कोणाला लवंग.. डॉक्टरच झाली होतीस. छान वाटायचं. मलाही पाठ झालीत.’’

मग हातात वर्तमानपत्राचा ध्वनिक्षेपक करून अवंतीने उद्घोषणा सुरू केली..

‘‘कृपया इकडे लक्ष द्या. समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी आपापल्या बॅगेत बर्मुडा घ्या. फणसाडच्या जंगलातील जळवांपासून वाचण्यासाठी गुडघ्यापर्यंत मोजे व शूज घाला. उन्हासाठी..’’ या उद्घोषणेवर मायलेकी खळाळून हसल्या.

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Moral story for kids interesting story for kids funny story for kids zws

ताज्या बातम्या