सईची माळ

एक होती छोटुशी गोडुली मुलगी. तिचं नाव सई. एक दिवस तिच्या आईने तिच्यासाठी एक खूप छानशी माळ आणली.

एक होती छोटुशी गोडुली मुलगी. तिचं नाव सई. एक दिवस तिच्या आईने तिच्यासाठी एक खूप छानशी माळ आणली. टपोऱ्या शुभ्र मण्यांची. सईला ती माळ खूप आवडली. नवीन नवीन फ्रॉक घालून आणि गळ्यात ती माळ घालून तिने छान गिरक्या घेतल्या. आता एवढी सुंदर माळ आपल्या मत्रिणीला दाखवायला नको का? आईला सांगून ती उडय़ा मारतच पलीकडे राहणाऱ्या आपल्या मत्रिणीकडे निघाली.

वाटेतल्या फुलांना, फुलपाखरांना माळ दाखवत उडय़ा मारत जाताना झालं काय, की अचानक तिचा हात माळेत अडकला आणि झटदिशी माळ तुटली. माळेतले मणी भराभर इकडेतिकडे घरंगळले. गळ्यातल्या तुटलेल्या माळेतून भराभरा मोती खाली सांडत होते. ते पाहून तिला रडूच आलं. तिने भराभर माळेचा दोरा आणि उरलेले मणी तिच्या फ्रॉकमध्ये घेतले आणि ती सांडलेले मणी गोळा करू लागली.

पंचवीस – तीस – पस्तीस मणी तिला मिळाले, पण माळेत तर पन्नास मणी होते. तिचे डोळे भरून आले. आपली सुंदर माळ तर तुटलीच आणि त्यातले मणीही हरवले म्हणजे पुन्हा माळ करताही येणार नाही. थोडय़ा वेळाने रडू आवरून तिने पुन्हा शोधाशोध केली. पानांच्या खाली, दगडांच्या मागे, गवतामध्ये, झाडांच्या बुंध्याजवळ.. सगळीकडे शोधलं.. मग तिला पाच मणी अजून मिळाले. हुश्श.. आता दहाच मणी शोधायचे राहिले होते.

ती पुन्हा शोधू लागली. एवढय़ात तिकडून एक ससा उडय़ा मारत आला. तो म्हणाला, ‘‘सई ग सई, काय शोधतेस?’’

ती म्हणाली, ‘‘अरे ससुल्या, माझी नवीन सुंदर माळ तुटली इथे. बघ ना दहा मणीपण हरवले.’’

ससुल्या तिला म्हणाला, ‘‘रडू नको, मी देतो शोधून.’’ मग ससुल्या गेला गवतात, पानांमध्ये आणि झाडांच्या खाली. आणि काय कम्माल! त्याला चार मणी मिळालेसुद्धा! सईच्या चेहऱ्यावर आता थोडं हसू दिसायला लागलं. आता सहाच मणी राहिले. ते पण छोटे, मधल्या पदकाच्या बाजूचे. पण ते कसे मिळणार?

तेवढय़ात तिकडून आला एक उंदीरमामा. त्याने  त्या दोघांना विचारलं, ‘‘काय शोधताय?’’

सईने त्याला सर्व हकिगत सांगितली. उंदीरमामा म्हणाला, ‘‘एवढंच ना! मी देतो शोधून.’’

मग उंदीरमामा गेला शोधायला. त्यानं दगडांच्या खाली, खडय़ांमध्ये, बिळांमध्ये शोधायला सुरुवात केली. आणि काय कम्माल! त्यालाही छोटे चार मणी सापडले. सईला आनंदाने हसायला येऊ लागलं. आता दोनच मणी राहिले छोटे. ते कसे शोधायचे?

तेवढय़ात तिकडून आली एक मुंगीताई. तिने विचारलं, ‘‘उंदीरमामाला, काय शोधतोयस?’’

उंदीरमामा म्हणाला, ‘‘या सईची तुटलेय माळ आणि हरवलेत मणी. तेच शोधतोय.’’

मुंगी म्हणाली, ‘‘एवढंच ना, मी देते शोधून.’’ आणि मग मुंगीताई तुरुतुरु गेली मणी शोधायला. तिने छोटय़ा दगडांखाली, छोटय़ा पानांखाली पाहिलंच; पण मुंग्याच्या छोटय़ा वारुळांमध्येही पाहिलं. आणि काय कम्माल.. तिला दोन्ही मणी दिसले.

केवढे जड होते ते मणी. बापरे! कसाबसा एक मणी उचलून, घामाने निथळत मुंगीताई आली सईकडे. मणी पाहून सईला खूपच आनंद झाला.

मुंगीताई म्हणाली, ‘‘उंदीरमामा, चल माझ्या मदतीला दुसरा मणी आणायला. मणी खूपच जड आहे रे!’’ उंदीरमामा गेला तिच्याबरोबर. दोघांनी आणला तो मणी.

सगळे मणी मिळाल्यामुळे सईला खूप आनंद झाला. ससुल्या, उंदीरमामा आणि मुंगीचे तिने आभार मानले आणि उद्या माळ घालून मस्त खाऊ घेऊन येते भेटायला, असं म्हणाली.

दुसऱ्या दिवशी काय मज्जाच होती सर्वाची. सई सर्व मित्रांसाठी भरपूर खाऊ घेऊन आली. ससुल्यासाठी गोड गाजरं, कोवळं गवत होतं, तर उंदीरमामासाठी शेंगदाणे आणि खोबऱ्याचे तुकडे, तर मुंगीताईसाठी साखरेचे दाणे, लाडूचा चुरा होता. तिघांनाही खाऊ खूपच आवडला. सर्वानी खूप खूप मज्जा केली.

वैशाली कार्लेकर  vaishali.karlekar1@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Most interesting story for kids

ताज्या बातम्या