शहराच्या बाहेर एक नवीन इमारत बांधली गेली. तब्बल दहा मजली. अशा तीन-चार विंग बांधून झाल्या होत्या. प्रत्येक इमारतीभोवती शोभेची झाडं लावली होती. रंगीबेरंगी फुलांची, देखण्या पानांची. सगळं कसं सुंदर सुंदर झालेलं होतं. फक्त एकच झाड खूप वेगळं होतं- आंब्याचं. त्या सगळ्या झाडांत ते एकटं आणि विचित्र वाटत होतं. इमारतीतील काही पर्यावरण प्रेमींनी ‘इको क्लबची’ स्थापना केली. ते दर महिन्याला त्या आंब्याच्या झाडाखाली जमत आणि झाडांची गाणी म्हणत. चर्चा करत. झाड सर्व ऐकायचं, पण बोलत काहीच नसे.

‘‘आम्ही हे आंब्याचं झाड नाही तोडू दिलं. सगळंच तोडून कसं चालेल? मग आम्ही इथं फुलांची भरपूर झाडं लावली. बाल्कनीत खूप सारी झाडं लावली. पर्यावरण आपणच नाही जपायचं तर कोण जपणार?’’ एक आजी म्हणाल्या.

मुनमुन मनात म्हणाली, ‘‘मोठी झाडं तोडून फुलांची झाडं लावून पर्यावरण कसं वाचणार?’’ पण ती काही बोलायची नाही. मुनमुन नुकतीच पाचवीत गेली होती. ती आणि तिचं कुटुंब आठवड्याभरापूर्वीच इथं राहायला आलं होतं. आल्यापासून ती त्या आंब्याच्या झाडाला पाहत होती. ते झाड इतकं शांत का असतं? त्याच्यावर कधीच कोणतं पाखरू दिसत नाही. असं का? त्याची पानं मलूल असतात. ते एखाद्या आजारी माणसासारखं दिसतं.
‘‘आजी, हे झाड इतकं शांत शांत का? ते मुकं आहे का?’’ मूनमूनच्या प्रश्नावर सगळेच हसले. काही मुलं कुजबुजली, ‘‘काय बावळट आहे ही!’’
आजी हसत म्हणाल्या, ‘‘अजिबात नाही. हे झाडं खूप आनंदी आहे. मजेत आहे. भरपूर पाणी, निगराणी आहे. काय कमी आहे त्याला?’’
मुनमुन शांत बसली. घरी निघून गेली. एका चांदण्या रात्री झाडाखालच्या छोट्याशा लाकडी बाकावर मुनमुन बसली होती. दोन्ही गुडघे एकत्र करून दोन्ही हातांनी त्यांना विळखा घालून ती झाडाकडे पाहत होती.

‘‘तू बोलत का नाहीस?’’
झाड शांत.
‘‘तू हसतही नाहीस.’’
झाड पुन्हा गप्प.
‘‘बोल ना काहीतरी…’’ ती काकुळतीला येऊन झाडाला विचारत होती. झाड शांतपणे उभं होतं. चंद्राचा प्रकाश पानापानांवर सांडला होता. पण झाड तो उजेड स्वत:जवळ ठेवून घ्यायला तयार नव्हतं. उजेड पानांवरून घरंगळत खाली जमिनीवर पडत होता. उजेड नाराज झाला होता. झाड रडत होतं. अश्रू प्रकाशासोबत सांडत होते. बरेच दिवस गेले. झाड अजून मुकंमुकं होत गेलं. आतल्या आत मिटत गेलं. उन्हाळा जवळ येऊ लागला. निसर्गानं आपलं काम केलं. झाडाला मोहर येऊ लागला. सर्वत्र मोहराचा घमघमाट पसरला. इतक्यात कुठून तरी एक कोकीळ आला. येऊन फांदीवर बसला. त्यानं इकडे तिकडे पाहिलं. पण झाडाचं उदास होणं त्याला खटकत होतं. त्यानं हळूच झाडाला विचारलं, ‘‘गाणं गाऊ का?’’
झाड पटकन म्हणालं, ‘‘नको.’’
त्याचा गंभीर शांत आवाज ऐकून कोकीळ नाराज झाला. हताश होऊन तो उडून गेला. दूर निघून गेला.
झाड पुन्हा शांत शांत.
मग आली सुगरण- पावसाआधी घरटं बांधायला. ती येऊन फांदीवर बसली. झाड अजूनही शांत शांत होतं. झाडाची शांतता सुगरणीलाही खटकली.
‘‘मी… मी… इथं घरटं बांधू का?’’ तिनं घाबरत घाबरत विचारलं.
झाड ठाम आणि शांतपणे म्हणालं, ‘‘नाही.’’
सुगरण निराश झाली. उडून गेली. दूर निघून गेली. झाड पुन्हा शांत शांत.
पावसाळा आला. विजा कडाडू लागल्या. काळ्या ढगांनी वार्‍याचे लोट अंगावर झेलत गोंधळ सुरू केला. झाड वार्‍यानं जोरजोरात हेलकावू लागलं. फांद्या जोरजोरात हलू लागल्या.
मुनमुन खिडकीतून सर्व पाहत होती. ‘‘अम्मी, हे झाड बोलत का नसेल?’’
‘‘अरे पगली, झाडं कुठं बोलतात का? बोलत असतील तर आपल्याला कसं कळणार? आपल्याकडे काय जादू आहे का?’’
‘‘आहे आहे… माझ्याकडे आहे जादू, मी बोलते त्याच्याशी. पण तो काहीही केलं तरी बोलत नाही. फुगून बसतो.’’
‘‘असं का!’’
‘‘हो अम्मी! तो कोणाची आठवण काढत असेल का?’’
‘‘क्या पता. त्याला कुणाची आठवण येत असेल ते?’’
‘‘उसके दोस्तों की. त्याचे मित्र असतीलच की! तो एकटा तर नसणार. त्यालाही मित्र असतीलच- माझे आहेत तसे.’’
‘‘मग ते कुठं गेले असतील?’’
‘‘अम्मी, त्याच्या मित्रांना तोडलं असेल का आपली घरं बांधताना.’’
‘‘हम्म?’’
‘‘हो. इन घरों के नीचे पेड़ों की कब्र होगी.’’ अम्मी एकदम शांत झाली.
अम्मीने मान वर करून पाहिलं. मुनमुन अजूनही खिडकीतून झाडाकडेच पाहत होती. झाड वार्‍यावर डोलत होतं. वारा आणि पाऊस आता वेगानं वाहू लागले. झाड जोरात हेलकावे खात होतं. इतक्यात आकाशात वीज कडाकली. वीज झाडाजवळ येऊन म्हणाली, ‘‘मी तुझ्या फांदीवर बसू का? पानाच्या आड दडू का?’’
झाड एकदम सळसळलं. त्याच्या मनात हळूच आनंदाची लकेर उठली. त्यानं आपल्या फांद्या आनंदात हलवल्या. तो शहारला आणि आनंदल्या स्वरात म्हणाला- ‘‘हो!’’
मोठ्यानं हसत म्हणाला. ‘‘हो! इथं तसं माझं कुणीच नाही. मित्र होते ते तोडले या लोकांनी. आता नाही मन लागत एकट्यानं.’’
त्याचा होकार कळताच विजेनं झाडाकडे धाव घेतली आणि क्षणार्धात…
कडाड असा मोठा आवाज झाला आणि झाडानं पेट घेतला.
खोड- फांद्या तुटून अलग झाल्या.
भिंतीचं सगळं कुंपण पडून गेलं.
मुनमुन अजूनही ते सगळं दृश्य डोळ्यांनी पाहत होती. तिच्या डोळ्यातल्या पाण्यात पिवळसर तांबड्या ज्वाळा उसळताना दिसत होत्या. हळूहळू त्या ज्वाळा तिच्या गालावर ओघळू लागल्या. सगळे लोक अवाक् होऊन पाहत होते. हळहळत होते. मूनमूनला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. झाडाच्या मुकेपणाचं कारण.
(मूळ कल्पना : कुसुमाग्रज)
farukskazi82 @gmail.com