माझ्या छोटय़ा मित्रांनो, आज महासागरात खोल खोल बुडी मारून अद्भुत सागरी जीवनाची ओळख करून घेऊ ! याकरता आपण महासागरांच्या पोटात असलेल्या सरकत्या पट्टय़ाचा अर्थातच कन्व्हेअर बेल्टचा वापर करू. ‘फाइंडिंग नीमो’ चित्रपटामध्ये मार्लिन आणि डोरी नीमोच्या शोधादरम्यान स्थलांतर करणाऱ्या कासवांसोबत वेगाने प्रवास करून ऑस्ट्रेलियाला पोहोचतात ती दृश्य आठवतात का? ते अशाच एका महासागरी पट्टय़ामधून किंवा प्रवाहामधून प्रवास करतात; मात्र या प्रवाहाचा भाग होण्याआधी हा कसा आणि काय असतो ते पाहू.

जगभर पसरलेल्या महासागरांमधून सतत प्रवाही असणारा हा सरकता पट्टा प्राणवायू, पोषक तत्त्वं आणि उष्णता यांची वाहतूक करतो आणि त्यायोगे पृथ्वीवरील हवामानही नियंत्रित करतो. महासागराच्या पोटात दडलेला हा प्रवाह वाऱ्यामुळे तयार होत नाही, तर धृवीय सागरांमधील तरणक्षमतेच्या बदलांमुळे हा प्रवाह तयार होतो. धृवीय प्रदेशात शीतल खारं पाणी जड होऊन खाली जातं, तर समशीतोष्ण प्रदेशातील उष्ण, कमी खारं पाणी वर सरकतं. या अभिसरणातून महासागराच पोटात हा कन्व्हेअर बेल्ट तयार होतो. उदाहरणार्थ, आखाती प्रवाह मोठय़ा प्रमाणात उष्ण आणि खारं पाणी उष्ण कटिबंधातून धृवीय प्रदेशांतील उत्तर अटलांटिक महासागरात वाहून नेतात.

पृथ्वीवरचं आपलं अस्तित्व महासागरातील याच विशाल अशा प्रवाहांमुळे किंवा सरकत्या पट्टय़ामुळे शक्य आहे. तेव्हा माझ्या चिमुकल्या मित्रांनो, याच महाकाय आणि महासागरांच्या पोटात दडलेल्या प्रवाहांतून जगभरच्या महासागरांचा पुढच्या प्रवासा करता सज्ज व्हा.

ऋषिकेश चव्हाण – rushikeshc@gmail.com

शब्दांकन: श्रीपाद