– राधिका विंझे
रोज सकाळी आजोबा वर्तमानपत्रामध्ये एवढं काय वाचतात, असा प्रश्न ईशाला पडत असे. म्हणून ईशानं आजोबांबरोबर रोज वर्तमानपत्र वाचायचं असं ठरवलं. शाळेत नुकतंच एक विज्ञान प्रदर्शन भरलं होतं. त्यातील एका व्याख्यानात ईशानं नोबेल पारितोषिकाविषयी ऐकलं होतं. हे पारितोषिक खूप मोठं असतं. अतिशय मूलभूत, पण अत्यंत महत्त्वाचं संशोधनकार्य करणाऱ्यांना ते मिळतं, असंही ईशानं ऐकलं होतं. एक दिवस शाळेतून आल्यावर आजोबांनी ईशाला भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक जाहीर झाल्याची बातमी वाचून दाखवली. ईशाला तेव्हा त्याबद्दल ऐकलेली माहिती आठवली.
ईशानं आजोबांना विचारलं, ‘‘आजोबा, या फ्रान्सिस हॅल्झेन या शास्त्रज्ञांना कोणत्या संशोधनासाठी हे पारितोषिक मिळालं?’’
आजोबा म्हणाले, ‘‘आता मी तुला त्याची सगळी गोष्ट सांगतो. मन लावून ऐक.’’ ईशाही एकाग्रतेनं ऐकू लागली.
‘‘ईशा, तू शाळेत कणाद ऋषींची गोष्ट शिकली आहेस. कणाद ऋषींनी अणूचा शोध लावला. पदार्थाचा अविभाज्य कण म्हणजे अणू, अशी समजूत होती. परंतु पुढे संशोधनानंतर लक्षात आलं की अणूचं विभाजन होऊन प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन असे तीन प्रकारचे कण सापडतात.’’
प्रोटॉन धनभारित (पॉझिटिव्ह), न्यूट्रॉन भाररहित, तर इलेक्ट्रॉन ऋणभारित (निगेटिव्ह) असतात. शास्त्रज्ञांनी जेव्हा या कणांचा अभ्यास केला; तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इलेक्ट्रॉनचं पुढे विभाजन होत नाही; परंतु प्रोटॉन व न्यूट्रॉन यांचं विभाजन केल्यावर ग्लुऑन व क्वार्क असे कण सापडतात. मग आजोबांनी ईशाला विचारलं, ‘‘आत्तापर्यंत जे ऐकलंस त्यावरून सांग बरं, मूलभूत, अविभाज्य कण कोणते?’’
ईशा पटकन म्हणाली, ‘‘ग्लुऑन, क्वार्क आणि इलेक्ट्रॉन.’’
आजोबा म्हणाले, ‘‘अगदी बरोबर! अशाच सर्व मूलभूत कणांचा एक तक्ता बनवला आहे. त्याला पदार्थविज्ञानाचं स्टँडर्ड मॉडेल
(Standard Model) असं संबोधतात.’’
‘‘पण मग आजोबा, या स्टँडर्ड मॉडेलचा नोबेल पारितोषिकाशी काय संबंध?’’
‘‘आता खरी गंमत ऐक! स्टँडर्ड मॉडेल मूलभूत असले, तरी ते अनेक प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. डार्क मॅटर, द्रव्य-प्रतिद्रव्य असमानता यांविषयी स्टँडर्ड मॉडेल काहीच भाष्य करत नाही. आपल्या ब्रह्मांडात असे काही प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला या स्टँडर्ड मॉडेलच्या पलीकडे जावं लागेल. तसंच, स्टँडर्ड मॉडेलमधील कणांचा नीट अभ्यास करावा लागेल. त्यांतील एक वैशिष्ट्यपूर्ण कण म्हणजे न्यूट्रिनो.’’
ईशा म्हणाली, ‘‘का विशेष?’’
आजोबा म्हणाले, ‘‘न्यूट्रिनो कणांचा अभ्यास केला तर आपल्याला ब्रह्मांडाविषयी अनेक गोष्टी समजू शकतात. न्यूट्रिनो हे कण पदार्थाशी अतिशय कमी प्रमाणात आंतरक्रिया करतात. त्यामुळे त्यांना ओळखणं आणि त्यांचा अभ्यास करणे कठीण असतं.’’
या न्यूट्रिनोंना ओळखण्यासाठी पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर एक प्रयोगशाळा बांधली आहे, जिचं नाव आइसक्यूब (IceCube) असं आहे. या प्रयोगशाळेसाठी केलेल्या संशोधनातील योगदानाबद्दल फ्रान्सिस हॅल्झेन यांना यावर्षीचं नोबेल पारितोषिक मिळालं आहे.
ईशाला हे ऐकून या विषयाविषयी आणखी वाचावं असा उत्साह वाटला. वेळ न दवडता तिनं पटकन लॅपटॉप उघडला आणि आजोबांबरोबर या विषयावर वाचन सुरू केलं.
