|| दीपेश जाधव
सुट्टीत रमा, निखिल, राधा, अर्जुन यांच्याबरोबर विआनची चांगलीच गट्टी जमली होती. सगळा दिवस त्यांच्याबरोबर खेळण्यात जायचा.

आता मात्र सगळ्यांची शाळा सुरू झाली होती. छोटा विआन अजून शाळेत जात नव्हता. आज दिवसभर एकटाच घरात बसून त्याला फार कंटाळा आला होता. विआन आजीकडे गेला. तिला म्हणाला, ‘‘आजी, आपण खेळू या ना. मला पायावर घे आणि असं हवेत उडव.’’

‘‘बाळा, भरपूर काम आहे मला. तू लांब तिथं जाऊन एकटय़ाने खेळ.’’ आजी जमीन सारवत म्हणाली.

बाबा तर घरीच नसतो. नेहाताईची तर शाळा असते. तिला फार अभ्यास असतो. तिला विचारलं तर ती पुस्तक तोंडासमोर धरत म्हणाली, ‘‘जा रे बबडय़ा, मला फार अभ्यास आहे. तू एकटाच खेळ.’’

शेवटी विआन आईकडे गेला. आई जेवणाची तयारी करत होती. थोडी वैतागत म्हणाली, ‘‘अरे विआन, बाजूला हो बघू. चुलीशेजारी नको बसूस. पळ बघू बाहेर. खेळ बाहेर जाऊन.’’

विआन मात्र आता जाम वैतागला आणि जोरात ओरडून म्हणाला, ‘‘सगळे जण मला बाहेर जाऊन खेळायला सांगतात. पण बाहेर तर कोणीच नाही. मी एकटा कसा खेळू?’’

विआनचा त्रागा ऐकून आई विआनला जवळ घेत प्रेमाने म्हणाली, ‘‘अरे, किती तरी मित्र आहेत बाहेर. शेजारचा बंडय़ा कुत्रा, मनू मांजर, गोठय़ातला राणा बैल, राणी गाय. रानात तर भरपूर मेंढय़ा आणि बकऱ्या घेऊन गणू मेंढपाळ आला आहे. त्याच्याकडे पांढरा घोडासुद्धा आहे. त्यांच्याशी मैत्री कर.’’

‘‘पण त्यांच्याशी मैत्री करणार कशी? त्यांना माझ्यासारखं बोलता तरी येतं का?’’ विआनने प्रश्न केला.

‘‘विचारून तर बघ त्यांना. काय माहीत कदाचित त्यांना तुझी भाषा कळेलसुद्धा!’’ मग काय, विआन निघाला सगळ्यांशी मैत्री करायला.

शेजारच्या संजूकाकाच्या दरवाजावर बंडय़ा कुत्रा मस्त पडला होता. बंडय़ा कुत्रा सारखा भुंकायचा. विआनला हे माहीत होतं. त्याने लांबूनच विचारलं, ‘‘ए बंडय़ा, मैत्री करतोस का माझ्याशी?’’

बंडय़ा कुत्रा जोर जोरात भुंकायला लागला. भू.. भू.. भू.. त्याचं भुंकणं ऐकून विआनने धूम ठोकली. तो थेट शिरला गोठय़ात. तिथे होती राणी गाय, राणा बैल आणि त्यांचं वासरू. विआन आत शिरला. त्याने तिघांकडे पाहिलं. ते तिघंही त्याच्याकडे बघत होते. विआन थोडा अवघडला. त्याने अवघडतच विचारलं, ‘‘माझ्याबरोबर खेळायला कोणीच नाही. तुम्ही खेळाल का माझ्यासोबत? मित्र बनाल माझे?’’ राणा बैल आणि राणी गाय काहीच बोलले नाहीत. ते संथपणे चारा खाऊ लागले. वासरू तर राणी गाईच्या मागे लपून बसले.

नाराज होऊन विआन निघाला गणू मेंढपाळाकडे. रानात मेंढय़ांचा आणि बकऱ्यांचा कळप होता. विआन त्यांच्याजवळ गेला. ‘‘तुम्ही बनाल का माझे मित्र? खेळाल का माझ्यासोबत? कोणीच नाहीए खेळायला.’’ विआनचा आवाज ऐकून सगळ्या मेंढय़ा आणि बकऱ्यांनी एकच गलका केला. मेह मेह करत दुसरीकडेच पळाल्या.

गणू मेंढपाळाचा पांढरा घोडा उन्हात चांगलाच चमकत होता. विआन त्याच्याजवळ गेला. ‘‘अरे घोडेदादा, तू तरी माझा मित्र हो!’’ घोडेदादाही विआनचं बोलणं ऐकून मोठय़ाने खिंकाळला.

विआनला आता फार वाईट वाटत होतं. तो एका झाडाखाली जाऊन बसला. ‘‘कोणालाच मी काय बोलतोय ते कळत नाहीए. कसं बोलायचं या प्राण्यांशी? बंडय़ा कुत्रा भुंकत अंगावर आला. राणी गाय आणि राणा बैल संथपणे चारा खात बसले. बकऱ्या, मेंढय़ा मेह मेह करत लांब पळाल्या. घोडेदादा तर दोन पाय वर करून खिंकाळला. काय करू मी? कोण खेळणार माझ्याशी?’’ असं म्हणत विआनने आपलं डोकं मांडीत खुपसलं.

मनू मांजर विआनला कधीपासून बघत होती. चोरपावलांनी ती विआनकडे आली. तिनं आपलं डोकं विआनच्या हाताखाली घातलं आणि ‘म्याव’ केलं. विआन चमकला. गोंडस मनूला बघून विआनने तिच्या डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवला. मनूने पुन्हा म्याव केलं. ‘मनू, तुला तर मी विचारलंच नाही. तू कशी काय माझ्याशी मैत्री केलीस?’ मनूच्या मऊ मऊ अंगावरून हात फिरवत विआनने विचारलं. ‘म्याव’.. मनूने डोळे बारीक केले. विआनने मनूला प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणाला, ‘मनूताई, कळालं मला मैत्री कशी करायची ते. थांब आलोच मी सगळ्यांशी मैत्री करून.’

विआन सर्वात आधी गेला पांढऱ्या घोडेदादाकडे. घोडेदादा समोर छोटा विआन उभा राहिला आणि धीटपणे त्याने घोडेदादाच्या अंगावरून हात फिरवला. घोडेदादा खिंकाळले नाही. विआनने विचारलं, ‘‘घोडेदादा, माझा मित्र होशील का?’’ घोडेदादाने मान वर-खाली केली.

विआन पळाला गणू मेंढपाळाकडे. तिथे मात्र जसा तो बकऱ्या आणि मेंढय़ांना हात लावायला जाई तशा त्या दूर दूर पळत. पण विआन आता मागे हटणार नव्हता. त्याने पळत जाऊन बकरीचं लहान कोकरू हातात पकडलं आणि त्याला कुरवाळत विचारलं, ‘‘काय रे, होशील का माझा मित्र?’’ ‘मेह, मेह’ करत त्या कोकराने मान हलवली. हे बघून सगळ्या मेंढय़ा, बकऱ्या विआनजवळ गोळा झाल्या. त्याने त्यांच्या पाठीवर हात फिरवून सगळ्यांचे लाड केले.

गोठय़ातल्या राणी गाय, राणा बैल आणि वासराशी दोस्ती करणं सर्वात सोपं होतं. विआन तर वासराच्या गळ्यात गळा घालून बराच वेळ राहिला.

विआनला मात्र भीती होती ती बंडय़ा कुत्र्याची. होईल का तो माझा मित्र, असा विचार करत विआन बंडय़ा समोर उभा राहिला. बंडय़ा विआनवर गुरगुरत होता, पण विआन मागे हटला नाही. त्याने पुढे जाऊन बंडय़ाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि काय आश्चर्य, बंडय़ा विआनच्या जवळ आला आणि त्याचे हात चाटू लागला. थोडय़ा वेळात बंडय़ा आणि विआनची इतकी गट्टी जमली की दोघं दिवसभर एकमेकांशी खेळत राहिले.

संध्याकाळी दमून विआन घरी आला तेव्हा आईने विचारलं, ‘‘काय रे विआन, मिळाले का नवीन मित्र?’’ विआन मोठय़ाने हसत म्हणाला, ‘हो ऽऽऽ’.

dipesh89jadhav@gmail.co