नवीन वर्ष सुरू झालं होतं. नाताळच्या सुट्ट्या नुकत्याच संपून शाळाही सुरू झाल्या होत्या आणि त्याचबरोबर जोमाने सुरू झाल्या होत्या आंतर-शालेय स्पर्धा-बॅडमिंटन, टेबल टेनिस, क्रिकेट, जिमनेस्टिक्स, वगैरे! अशाच एका शाळेच्या मैदानावर एथलेटिक्स, मल्लखांबच्या स्पर्धा सुरू होत्या…
‘‘… आणि सुवर्णपदकाची मानकरी आहे… स्वप्ना मुसळे, शारदा विद्यालय.’’ आयोजकांची घोषणा झाल्यावर स्वप्ना पोडीयम स्टेंडच्या मध्यभागी उभी राहिली. मल्लखांब स्पर्धेतलं तिचं हे दुसरं गोल्ड-मेडल होतं- रोप मल्लखांबचं. दोन दिवसांपूर्वीच तिनं पोल मल्लखांबचं गोल्डही जिंकलं होतं. पारितोषिक वितरण सोहळा झाल्यानंतर स्वप्ना एका बाकावर थोडा वेळ शांत बसली, टेंशन रिलीज झाल्यासारखी! इतक्यात तिची मैत्रीण मीरा तिथे आली. मीरानेही लॉँग-जंप स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. स्पर्धा त्यांच्या शाळेतच असल्यामुळे दोघी एकत्र घरी जाणार होत्या.
‘‘अभिनंदन, स्वप्ना!’’ मीरानं धावत येऊन स्वप्नाला मिठीच मारली.
‘‘थँक्स गं! या वेळी लँडिंग परफेक्ट झालं… तुझं काय?’’
‘‘सेमी-फायनलपर्यंत पोहोचले, पण फायनलला नाही झाले क्वालिफाय, अगदी थोडक्यासाठी!’’
‘‘ठीक आहे, नेक्स्ट टाइम!’’
‘‘हे तू समजावतेस स्वप्ना, पण गेल्या वर्षी रोपवरून लँडिंग करताना तोल गेल्यानंतर स्वत:वरच किती चिडली होतीस तू!’’
‘‘कारण शिस्त पाळली नव्हती मी! चुका होतात, आपण त्यातून शिकतो, पण बेशिस्तीला माफी नाही.’’
‘‘पण त्यानंतर तू केलेलं ते न्यू-ईयर रेझोल्युशन कुणासाठीही प्रेरणा देणारं!’’
इनबिन सातवीतली स्वप्ना तिच्या वयाच्या मनानं वागण्यात आणि विचारांत खूपच प्रगल्भ होती आणि अतिशय शिस्तप्रियही! शाळेचा अभ्यास वेळच्यावेळी करणं, मल्लखांब आणि इतर क्लासच्या वेळांचं नियोजन, नित्यनेमाने गृहपाठ-पाढे-श्लोक, नियमित व्यायाम, पुस्तकं-कपाट-खेळ जागच्याजागी ठेवणं, आवरणं अगदी सगळंच ती नेटानं करायची. पण गेल्या वर्षी थोडं वेगळंच घडलं. दिवाळीनंतर शाळेची दुसरी टर्म सुरू झाली की मल्लखांब आणि इतर आंतर-शालेय स्पर्धा सुरू व्हायच्या. साहजिकच या स्पर्धा खेळण्यासाठी शारीरिक व्यायाम आणि फिटनेस महत्त्वाचा असतो. पण गेल्या वर्षी, दिवाळीनंतर लगेचच स्वप्नाच्या चुलतभावाचं लग्न होतं. घरचंच लग्न आणि त्यातून एकत्र कुटुंब… मग काय? दिवाळीमध्ये ताव मारून खाल्लेला फराळ आणि त्यानंतर लाडक्या दादाचं लग्न! खाण्यापिण्याची सगळीच रेलचेल… साहजिकच स्वप्नाचं वजन वाढलं, तेही तिला समजण्याच्या आतच!
एरवी बारीक आणि सडसडीत असलेली स्वप्ना सगळ्यांना जाणवण्याइतकी स्थूल वाटू लागली. तिला प्रॅक्टिस करतानाही तिचं वाढलेलं वजन जाणवू लागलं. पोलवर किंवा रोपवर कवायती करताना तिची लवचीकता तिलाच कमी झालेली जाणवली. सरही तिला रागावले. ‘‘दिवसभरात कधीही अर्धा तास रनिंग किंवा इतर व्यायाम करशील तर उतरेल वजन.’’ असं ते सारखं स्वप्नाला सांगत होते. पण त्याच वेळी असलेल्या ऑलिम्पियाडच्या परीक्षांमुळे तिला व्यायाम करायला तेवढासा वेळ देता आला नाही. आईने तिला डाएट प्लान आखून दिला, त्यानंतर तिचं वजन अजून वाढलं नक्कीच नाही, पण हवं तेवढं उतरलंही नाही. आणि लगेचच मल्लखांबाच्या स्पर्धा आल्या. रोप मल्लखांबच्या पहिल्या काही राऊंड जिंकून ती अंतिमपूर्व फेरीत पोहोचली. पण यावेळी नेमकं शेवटचं लँडिंग करताना तिचा पाय मुरगळला आणि ती पडली. टाचेला फ्रॅक्चरही झालं. फ्रॅक्चर हलकं होतं, पण पुढचा महिनाभर तिला खेळता येणार नव्हतं.
‘‘आई, यंदाचा अख्खा सीझन गेला.’’ दवाखान्यातून घरी आल्यावर स्वप्ना हताशपणे म्हणाली.
‘‘बरं व्हायला नाताळच्या सुट्टीचे काही दिवस मिळतील खरे, पण नवीन वर्षं सुरू झालं की पुढच्या काही स्पर्धा बुडणार आहेत आपल्या! त्यात जर्मनीला मल्लखांब प्रात्यक्षिकं दाखवायला जायचंय जून महिन्यात! पाय बरा होऊन पुन्हा प्रॅक्टिस करणं हे तर आलंच, पण तोपर्यंत वजनही आटोक्यात आणायला हवंय आपल्याला! तू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेस तिथे, बेटा!’’ आई स्वाभाविक काळजीने म्हणाली.
या जबाबदारीच्या जाणिवेनं स्वप्नाचं मनोबल एकदम वाढलं. देशातल्या काही इतर मुला-मुलींबरोबर तिच्या शहरातून ती एकटीच मुलगी जर्मनीला जाण्यासाठी निवडली गेली होती. ‘‘आई, यंदाचं हेच न्यू-ईयर रेझोल्युशन… हेल्दी खाणे, फिट राहणे!’’ स्वप्ना हिरिरीनं म्हणाली.
आणि खरोखरच स्वप्नानं तिच्या जिद्दीनं सगळंच बंद केलं… हॉटेलला जाणं, बर्थडे पार्टी, घरातली सोहळे, समोसे-वडापाव, आवडती भेळ-पाणीपुरी, कोल्डड्रक्सिं… कमी साखर, कमी भात, कमी तळलेल्या अन्नाची तिने पुन्हा सवय लावून घेतली. पाय बरा झाल्यावर हळूहळू तिने नित्यनियमाने व्यायाम सुरू केला. कितीही अभ्यास असला तरी आता व्यायामाला तिची बुट्टी नसायची-रनिंग, पुश-अप्स, सायकलिंग तिनं जोमानं सुरू केलं. आणि म्हणता, म्हणता स्वप्नाचं वजन आटोक्यात आलंदेखील!
जर्मनीच्या दौऱ्यासाठी ती एकदम फिट होती आणि दौराही यशस्वी करून मायदेशी परतली. १५ जून- जागतिक मल्लखांब दिवसाच्या निमित्ताने हा दौरा आयोजित केला होता. अनेक प्रसारमाध्यमांतून तिचं कौतुक झालं. पुढे नोव्हेंबर-डिसेंबरच्या आंतर-शालेय मल्लखांब स्पर्धांमध्ये शाळेसाठी दोन सुवर्णपदकं मिळवून तिचं आज तब्बल वर्षानं खऱ्या अर्थानं टेंशन रिलीज झालं होतं.
‘‘न्यू-इयर रेझोल्युशन इमानेइतबारे पूर्ण केलंस तू, स्वप्ना!’’ मीरा कौतुकानं म्हणाली.
‘‘न्यू-इयर रेझोल्युशन हे निमित्त, खरी लागते ती जिद्द! तीच कमी पडत होती. एरवी वजन आटोक्यात आणणं अवघड आहे का?’’
‘‘पण तुझं हे जिद्दीचं रेझोल्युशन पाहून मी या नव्या वर्षांत रेझोल्युशन केलंय… लाँग-जंपसाठी भरपूर प्रॅक्टिस करायची, ते थोडक्यासाठी जे जातं नं, तीच असते आपली कमी पडलेली जिद्द!’’
‘‘आणि जिद्द असली की कुठलंही रेझोल्युशन पूर्ण करणं काहीच अवघड नसतं!’’ स्वप्नानं मीराच्या खांद्यावर विश्वासानं हात ठेवला.
आणि अशी जिद्दीची रेझोल्युशनच नवीन वर्षामध्ये नव्या संधी, नवी प्रेरणा घेऊन येतात. तर, ‘हॅप्पी न्यू-इयर रेझोल्युशन्स’ सगळ्यांना!
●mokashiprachi@gmail.com
