चेरी येणार घरी..

मुलांना बघितल्यावर तिने एकदाच मान वर केली आणि पुन्हा डोळे मिटून पडून राहिली

अलकनंदा पाध्ये alaknanda263@yahoo.com

‘‘आई, सांग ना गं, चेरी आता बरी झालीय ना? मग कधी आणणार तिला आपल्याकडे? आता संध्याकाळ पण झालीय.’’ जयने हा प्रश्न मघापासून तिसऱ्यांदा विचारल्यावर, ‘‘हो रे बाळा, चेरीचा पाय पूर्ण  बरा झालाय. आणि रेस्क्यूच्या माणसांना  वेळ मिळाला की ते आजच्या आज तिला नक्की आणून सोडणारेत असा त्यांचा फोन आला होता मघाशी.’’ आईने जय आणि मित्रांची समजूत घातली. काल संध्याकाळपासून गेले २४ तास चेरी मांजरीने जयच्या घरी.. खरं तर पूर्ण बिल्डिंगमध्येच गोंधळ उडवून दिला होता.

काल संध्याकाळी जयच्या टेरेसवर तो आणि त्याचे मित्रमंडळ गाडय़ांची वेगवेगळी मॉडेल्स तयार करत होते. चित्रांतले सगळ्यात कठीण, पण अतिशय सुंदर मॉडेल बनवण्यासाठी सगळ्यांची धडपड चालली होती. बऱ्याच प्रयत्नांनंतर ते जवळपास तयार होत असतानाच चेरी मांजरीने कठडय़ावरून धप्पकन् उडी मारली ती नेमकी त्यांच्या मॉडेलवर. मग काय विचारता? मॉडेलची दुर्दशा पाहून चिडलेल्या जयने चेरीच्या पाठीत सणसणीत रट्टा दिला. पाठोपाठ आर्यन, स्नेह, नेहा सगळेच चेरीच्या नावाने शंख करत तिच्यावर हल्लाबोल करायला गेले. त्यासरशी भांबावलेल्या चेरीने एका झटक्यात पुन्हा कठडय़ावर चढून बाजूच्या पाईपचा आधार घेतला. नक्की काय झालं समजलं नाही, पण काहीतरी विचित्र आवाज आला आणि दुसऱ्या क्षणी चेरी जयच्या टेरेसवरून- म्हणजे थेट सहाव्या मजल्यावरून खाली पडली. त्याबरोबर  सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली. गाडीचे मॉडेल तसेच टाकून सगळेजण खाली धावले. तिथे जाऊन पाहतात तर चेरी मागचा डावा पाय लांब करून वेडीवाकडी पडली होती. मुलांना बघितल्यावर तिने एकदाच मान वर केली आणि पुन्हा डोळे मिटून पडून राहिली. तिला असं बघून सगळ्यांनाच वाईट वाटलं. जयने तिच्या लांब झालेल्या पायाला हात लावल्याबरोबर ती अशी काही विचित्र किंचाळली की सगळेच एकदम दचकले. पंप सोडायला गेलेले वॉचमनकाकाही धावत तिथे आले. त्यांना सगळी हकीकत सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘अरे, याचा अर्थ तिचा तो पाय खूप दुखावलाय. खरं तर मांजराची जात कितीही उंचावरून पडली तरी त्यांना काही होत नाही. पण या पावसाच्या दिवसांत कदाचित बुळबुळीत पाईपामुळे असं काहीतरी झालं असणार.’’ त्यांनीही पुन्हा तिच्या पायाला हात लावायचा प्रयत्न केल्याक्षणी ती त्यांच्यावर एकदम फिस्कारली. नंतर निपचित पडून राहिली. मधूनच डोकं वर करून सर्वाकडे पाहत केविलवाणी ओरडत होती. ‘‘मला खूप त्रास होतोय प्लीज- काहीतरी करा..’’ असंच जणू ती सांगतेय असं जयला वाटलं. यापुढे आपल्याला कितीही राग आला तरी मुक्या प्राण्यांशी असं दुष्टपणे वागायचं नाही असं त्यानं ठरवून टाकलं. आपल्यामुळे चेरीवर अशी वेळ आली, या विचाराने जय रडवेला झाला. त्याला तसं पाहून स्नेहचेही डोळे वाहू लागले. खरं तर सर्वानाच अपराधी वाटत होतं. प्रत्येक जण दुखरा पाय टाळून तिच्या अंगावरून अलगदपणे हात फिरवत ‘आता बरं वाटेल हं चेरीला..’ असं पुटपुटून तिची आणि स्वत:चीच समजूत घालत होते. इतक्यात सायकलवरून आलेल्या मल्हारदादाने झालेली घटना समजल्यावर समोरच्या सोसायटीत राहणाऱ्या प्राण्यांच्या डॉक्टरांकडे सायकल दामटवली. पण ते बाहेरगावी गेल्याचे कळले. चेरी पडून तिचा पाय दुखावल्याची बातमी  हळूहळू सगळ्या बिल्डिंगला समजली. मुलं आणि त्यांचे आईबाबासुद्धा चेरीची अवस्था पाहून ट्रीटमेंटसाठी आपल्या परीने प्रयत्न करू लागले. खरं तर चेरी काही कुणाच्या घरातील पाळलेली मांजर नव्हती. बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये, कधी जिना-लिफ्टच्या आसपास, तर कधी कुणाच्या टेरेस, बाल्कनीत ती भटकत असायची. ना तिला कधी कुणी कौतुकाने खाऊ- पिऊ घालत होते की लाडाने जवळ घेत होते. बिल्डिंगमधली मुलंच अधूनमधून टाइमपास म्हणून तिच्याशी खेळायचे. ‘चेरी’ नावही त्यांनीच ठेवले होते. तर अशी ही चेरी आज मात्र साऱ्यांच्या चिंतेचा विषय झाली होती. कुणाचे आईबाबा कुणा डॉक्टरांना फोन लावत होते, तर कुणी गूगलवर प्राण्यांना सांभाळणाऱ्या संस्थांचा शोध घेत होते. नेमका जोडून सुट्टय़ा आलेला तो रविवार असल्याने बऱ्याच जणांशी संपर्क होत नव्हता. सुदैवाने ‘रेस्क्यू’ नावाच्या प्राणिमित्र संस्थेने मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी चेरीवर इलाज करण्याचे कबूल केले. त्यामुळे सर्वाना थोडं हायसं वाटलं. मुलं मात्र मिनिटभरही चेरीला एकटं सोडायला तयार नव्हती. पावसाची शक्यता वाटल्याने जयने घरून छोटय़ा प्लास्टिक टबमध्ये तिच्यासाठी मऊ अंथरूण-पांघरूण तयार करून आणलं. आर्यनने आजोबांच्या गुडघेदुखीवरचा स्प्रे चेरीच्या पायावर फवारला. नेहा, स्नेहने वाटीत दूध आणि बिस्किटं आणली. इतकंच नाही तर आजारी माणसाजवळ बसतात तसे रात्रभर सर्र्वानी तिच्याजवळ बसून तिला सोबत करायचंही ठरवलं. पण वॉचमनकाकांनी आपणहून तिला सांभाळायची जबाबदारी घेतल्याने नाइलाजाने मुलं झोपायला घरी गेली. जयला सक्काळी जाग आल्यावर मात्र झटक्यात उठून त्याने मित्रांची दारं वाजवत खाली चेरीकडे धाव घेतली. पुन्हा सगळे तिच्याभोवती गोळा झाले. तोवर प्राणिमित्र संस्थेची दोन माणसंही आली. त्यांनी विचारपूस करून चेरीला तपासलं. त्यांनी फारसं काळजी करण्यासारखं काही नाही असं सांगितलं. जयला तर त्यांच्याबरोबर तिला सोबत म्हणून जावंसं वाटलं. पण त्या काकांनी चेरीला बरं करून संध्याकाळपर्यंत आणून सोडायचं प्रॉमिस केल्यावर तो गप्प झाला. बिल्डिंगमधली सर्व बच्चे कंपनी चेरीला टाटा करायला गेटपाशी हजर होती. दिवसभर गप्पांत ‘चेरीला खूप दुखत असेल का? ती आता पहिल्यासारखी नीट चालेल का? ती आपल्यावर रागावली असेल का? तिला आपण सॉरी म्हटलं तर तिला समजेल का?’ इथपासून ‘आता यापुढे तिला प्रत्येकाने एकेक आठवडा आपल्या घरी ठेवायचं. त्यासाठी आईबाबांना कसं पटवायचं? त्याचप्रमाणे सुट्टीत आपणही रेस्क्यूसारख्या संस्थेत प्राण्यांसाठी काम करायला जाऊ या का?’ यावर त्यांची दिवसभर महाचर्चा चालू राहिली. इतक्यात आईने दहा मिनिटांत चेरी येणार असल्याचं सांगितल्यावर सगळ्यांनी पुन्हा गेटपाशी धाव घेत ‘चेरी.. चेरी..’चा घोष सुरू केला. तेवढय़ात मल्हारदादाने धावत येऊन सगळ्यांच्या हातात धरायला एक रंगवलेला पुठ्ठय़ाचा बोर्ड दिला.. ज्यावर मोठय़ा अक्षरांत रंगवलं होतं- ‘वेलकम चेरी’!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Night time stories for kids interesting story for kids moral stories for kids zws

ताज्या बातम्या