‘आई, मी आज पावभाजी करीन, म्हणाला वरुण
बाकीची तयारी, देशील का करून?
फ्लॉवर नि कांदा, गाजर, टमाटे
झालंच तर बटाटे, बारीक दे चिरून
कुकरमधून भाज्या घे थोडय़ाशा वाफवून
वाफवली का भाजी? घे थोडी घोटून,
पावभाजी मसाला घाल ना गं, वरून!
शिजू दे की थोडा वेळ, घाल थोडं पाणी
मीठ टाक त्यात अन् घाल जरा लोणी
बाबांनी आणले ना, ताजे ताजे पाव?
मधोमध काय अन् मस्का जरा लाव!
तापलं का पॅन? त्यात बटर घे टाकून
पाव घालून दोन्ही बाजू नीट घे भाजून!
काचेच्या डिशमध्ये पावभाजी घालून
लिंबाची फोड दे, कोथिंबीर पेरून
थांब आई, देतो ना मी साऱ्यांना डिश,
यम्मी आहे चव बघा, व्हाल तुम्ही खुश
सगळं सगळं येतं मला, आहे मी हुशार,
अरे, अरे घाईघाईने नका होऊ पसार!