|| मुक्ता चैतन्य आई-बाबांचा स्मार्ट फोन हातात आला की तुम्ही फक्त गुगल करता का? तर मुळीच नाही. स्वत:चा असो नाहीतर आई-बाबांचा, स्मार्ट फोन हातात आला की पहिल्यांदा आपण जातो ते प्ले स्टोअरमध्ये. बरोबर ना! मित्रमैत्रिणींशी गप्पा मारताना नवनवीन अॅप्सची माहिती आपल्याला कळते. कुणीतरी मित्र-मैत्रीण एखाद्या गेमबद्दल माहिती देताना सांगतात, ‘हे काय, तुझ्याकडे नाही, तू अजून डाऊनलोड केलं नाहीस,’ असं म्हणून सगळ्यांसमोर तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. मग तुम्हालाही वाईट वाटतं, असा कसा अमुकतमुक गेम आपल्याकडे नाही. किंवा ते अॅप्स नाही. मग घरी आल्यावर तुम्ही तडक फोन हातात घेता. तो गेम किंवा अॅप्स डाऊनलोड करता आणि खेळायला, वापरायला लागता. आता तुम्ही म्हणाल, ‘यात काय धोका असणार आहे? आमचे सगळे मित्र तर वापरतात!’ बरोबर आहे. सगळे मित्र वापरतात ते सगळं वाईट असतं असं नाही, पण त्यात धोके असूच शकत नाहीत असंही मुळीच नाही. त्यामुळे आपण सावधान असणं आवश्यक आहे. आपण दिलेल्या माहितीचा कोण, कसा आणि कुठे वापर करेल हे आपण सांगू शकत नाही. कुठलंही अॅप डाऊनलोड करताना ते अॅप्लिकेशन तुमच्याकडून फोनचा पूर्ण अॅक्सेस मागतं. पूर्ण अॅक्सेस म्हणजे तुमच्या फोनमधले काँटॅक्ट्स, फोटो, लोकेशन आणि इतरही अनेक तपशील वापरू देण्याची परवानगी देणं. जोवर ही परवानगी आपण अॅप्लिकेशनला देत नाही, आपल्याला ते वापरता येत नाही. आता तुम्ही तुमच्या फोनमधली माहिती शेअर केल्यानंतर त्याचा दुरुपयोग होणार नाही याची खात्री देऊ शकता का? खरं तर, तशी कुणीच देऊ शकत नाही, पण मग प्ले स्टोअरमधून अॅप्स डाउनलोड करताना काही मूलभूत गोष्टींची काळजी घेता येऊ शकते. ज्यामुळे तुम्ही तुमचा, तुमच्या आई-बाबांचा फोन आणि त्यातली माहिती सुरक्षित ठेवू शकता. या गोष्टी तुम्हाला कितीही कंटाळवाण्या वाटल्या तरीही त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत हे लक्षात घ्या. सोबतच्या मुलामुलींनी टिंगलटवाळी करू नये म्हणून घाईघाईने अॅप्स डाऊनलोड करू नका. त्यासाठी वेळ घ्या. जो गेम किंवा अॅप्स डाऊनलोड करायचं आहे, त्याचे डिटेल्स नीट तपासा, फक्त कुणीतरी चिडवलं, कमी लेखलं म्हणून नको त्या जाळ्यात आपण का म्हणून अडकायचं? नाही का? तर वाचक मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला एक छोटीशी लिस्ट देणार आहे. प्ले स्टोअरवर जाऊन अॅप्स डाऊनलोड करण्यापूर्वी या गोष्टी तपासा आणि मग खात्री वाटली की मगच अॅप्स किंवा गेम डाऊनलोड करा. मग घेणार ना बेसिक काळजी? आणखीन काही महत्त्वपूर्ण टिप्स पुढच्या लेखात! रेड अलर्ट अॅप्स डाऊनलोड करण्याआधी काय काय तपासून बघा. कुठलाही ऑनलाइन गेम डाऊनलोड करण्याआधी त्याचं रेटिंग बघा. ते चार किंवा अधिक असलंच पाहिजे. शिवाय ते रेटिंग काही हजार लोकांनी दिलेलं असलं पाहिजे. पाच-पन्नास लोकांत चार किंवा अधिक रेटिंगला अर्थ नसतो. अॅप्स चालावं म्हणून बनवणारेही असं रेटिंग निर्माण करू शकतात. त्यामुळे रेटिंग, किती लोकांनी अॅप्स डाऊनलोड केलंय ते तपासा. माहीत नसलेला, कुणीतरी सांगितलेला, फारसं कुणालाही माहीत नसलेला गेम कधीही डाउनलोड करू नका. डाउनलोड करताना समजा काहीतरी अनावश्यक माहिती मागितली जातेय असं वाटलं तर डाउनलोडिंग तिथल्या तिथे थांबवा. गेम किंवा अॅप्स डाऊनलोड करण्यापूर्वी रेटिंग बरोबर रिवूज्ही वाचा. वापरणाऱ्या किंवा ज्यांनी गेम/अॅप्स डाऊनलोड केलेलं आहे अशा लोकांनी त्यांचे अनुभव लिहिलेले असतात. त्यातून गेम / अॅप्सची माहिती आणि वापराबद्दलचा इतरांचा अनुभव समजू शकतो. ज्यावरून ते अॅप्स डाऊनलोड करायचं की नाही हे ठरवता येऊ शकतं. muktaachaitanya@gmail.com (लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)